जीत आरोलकरांच्या याचिकेवरील निवाडा गोवा खंडपीठाकडून राखीव

0
15

धारगळ येथील जमीन घोटाळा प्रकरणी आपणावर दाखल करण्यात आलेली तक्रार रद्द करण्यात यावी, यासाठी मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी काल पूर्ण झाली. त्यावरील निवाडा गोवा खंडपीठाने राखून ठेवला आहे.

गोव्यातील जमीन घोटाळा प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) यासंबंधीची चौकशी सुरू आहे. तसेच एक सदस्यीय चौकशी आयोगासमोर या प्रकरणाची सुनावणी 1 मार्चला होणार आहे.

आरोलकर यांनी धारगळ येथील 1.48 लाख चौरस मीटर जमीन हडप केल्या प्रकरणी अमेरिकास्थित जमीनमालक रवळू खलप यांनी तक्रार दाखल केलेली आहे. ज्या जमिनीचे भूखंड तयार करून विक्री केलेली आहे, त्याचा आपण सहमालक असल्याचे खलप यांनी तक्रारीत म्हटले आहे. ही तक्रार पेडणे पोलिसांत दाखल करण्यात आली होती; मात्र आता हे प्रकरण राज्यभरातील जमीन घोटाळा प्रकरणांचा तपास करणाऱ्या एसआयटीकडे वर्ग करण्यात आले आहे. या खटल्यासंबंधीची सुनावणी काल झाली असता तक्रारदार रवळू खलप यांचे वकील आणि जीत आरोलकर यांचे वकील यांनी युक्तिवाद केला. त्यानंतर गोवा खंडपीठाने या प्रकरणावरील आपला निवाडा राखून ठेवला.