जीएसटीचे नवे दर आजपासून लागू

0
19

पंतप्रधान मोदी यांनी केले देशाला संबोधित

स्वदेशीचा वापर करण्याचे मोदींचे आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी जीएसटीचे नवे दर आज सोमवारपासून लागू होणार असल्याचे जाहीर केले. यामुळे दररोजच्या जीवनातील अनेक गोष्टी स्वस्त होणार आहेत. याचा फायदा देशातील व्यापाऱ्यांना होणार आहे. यावेळी पंतप्रधानांनी स्वदेशीच्या वापरावर आणि आत्मनिर्भर भारत बनवण्यावर भर दिला. देशात आता फक्त 5 आणि 18 टक्के टॅक्स स्लॅब असणार आहे. पंतप्रधान मोदींच्या या घोषणेमुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या निर्णयावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल आपल्या भाषणाच्या सुरुवातीला देशवासियांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या. आज सोमवारी 22 सप्टेंबरपासून भारतात जीएसटी सुधारणा लागू होत असल्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली.

जीएसटी बचत उत्सव
मोदी यांनी यावेळी या सुधारणांना ‘जीएसटी बचत उत्सव’ असे संबोधित केले आहे. या सुधारणांमुळे ग्राहकांना अधिक बचत होईल आणि विविध वस्तू सोप्या दरात खरेदी करता येतील, असा दावा करण्यात आला आहे. गरीब, मध्यमवर्गीय, तरुण, शेतकरी, महिला, व्यापारी आणि उद्योजक या सर्वांना याचा फायदा होईल असे सांगण्यात आले आहे. या सुधारणांमुळे भारताच्या आर्थिक वाढीला गती मिळेल, व्यापार सोपा होईल आणि गुंतवणूक अधिक आकर्षक होईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे. सर्व राज्यांना विकासाच्या दौडेत समान संधी मिळतील असेही सांगण्यात आले आहे.

या नवीन सुधारणांनुसार, रोजच्या वापरातील बहुतेक वस्तूंवर फक्त 5% किंवा 18% टॅक्स लागेल. त्यामुळे घर, टीव्ही, फ्रीज, कार आणि बाईकसारख्या वस्तूंच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. तसेच खाणे-पिणे, औषधे, साबण, कपडे आणि इतर अनेक आवश्यक वस्तू आणि सेवांवरही टॅक्स कमी होईल किंवा त्यांना टॅक्समुक्त करण्यात येईल.

एक राष्ट्र एक कर

पंतप्रधान मोदी यांनी, 22 सप्टेंबर हा नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि याच दिवशी नवीन जीएसटी लागू दर लागू केले जाणार आहेत. त्यामुळे हा केवळ उत्सव साजरा करण्याचा नव्हे तर आर्थिक विकास आणि कर सुधारणांसाठी एक महत्त्वाचा काळ आहे. या निर्णयामुळे प्रत्येक नागरिकाचे पैसे वाचतील. यामुळे प्रत्येक घरात आनंद पसरेल. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. आता ‘एक राष्ट्र, एक कर’ चे स्वप्न पूर्ण होत असल्याचे सांगितले.

टॅरिफचे काय होणार?

अमेरिकेने भारतावर 50 टक्के कर लादला आहे. यामुळे अमेरिकेत जाणाऱ्या भारतीय वस्तू महाग झाल्या आहेत. त्यामुळे भारतीय व्यापाऱ्यांची कोंडी होण्याची शक्यता होती. मात्र आता भारत सरकारने जीएसटीमध्ये बदल केल्यामुळे व्यापारी, उद्योजक आणि सामान्य नागरिकांना फायदा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता भारतात निर्माण झालेल्या वस्तूंचा स्वदेशी बाजारपेठेेतच खप वाढू शकतो. दुसरीकडे यामुळे भारतीय लोकांना कमी दरात वस्तू मिळू शकणार आहेत. त्यामुळे टॅरिफच्या एकाप्रकारे दहशत कमी होण्याची शक्यताही या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केली.

99% वस्तूंवर 5% जीएसटी

पंतप्रधान मोदींनी यावेळी, 99% वस्तूंवर आता केवळ 5% जीएसटी आहे. यामुळे मध्यमवर्गाचे जीवन बदलणार आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा होत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे अनेकांची स्वप्ने पूर्ण होणार आहेत. आपण फक्त भारतात बनवलेल्या वस्तूच खरेदी कराव्यात. स्वदेशी वस्तूंचा वापर करा. याचा फायदा लहान व्यवसायांना होईल असे सांगितले.