काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी केले स्पष्ट
गोवा फॉरवर्ड पक्ष (जीएफपी) आणि रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाने (आरजीपी) त्यांची भूमिका स्पष्ट केल्यानंतरच त्यांच्याबरोबर पुढील विधानसभा निवडणुकीत युती करायची की नाही याचा निर्णय काँग्रेस पक्ष घेणार असल्याचे काल काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
काँग्रेस पक्षाने आगामी जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी सगळी तयारी केली असल्याचे माणिकराव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल हे काँग्रेस पक्षावर टीका व आरोप करू लागल्याच्या प्रश्नावरून यावेळी ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांच्या त्या कृतीद्वारे ते भाजपचाच फायदा करीत असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले.
आम्ही जिल्हा पंचायत निवडणुकांसाठी सज्ज आहोत. आरक्षण, संभाव्य उमेदवार व निवडणुकीसंबंधीचे डावपेच आदींविषयी चर्चा चालू आहे, असे ठाकरे म्हणाले.
यावेळी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार कार्लुस फेरेरा, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर, गिरीश चोडणकर, फ्रान्सिस सार्दिन आदी हजर होते.

