गोवा राज्य निवडणूक आयोगाने आगामी जिल्हा पंचायत निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. उत्तर आणि दक्षिण गोव्यातील जिल्हा पंचायत मतदारसंघांची फेररचना केली जाणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त दौलत हवालदार यांनी मतदारसंघ फेररचनेची अधिसूचना जारी केली आहे. राज्यातील दोन्ही जिल्हा पंचायतींचा कार्यकाळ येत्या मार्च 2025 मध्ये पूर्ण होत आहे. हा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी दोन्ही जिल्हा पंचायतींसाठी निवडणूक घेतली जाणार आहे. राज्यातील उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा अशा दोन्ही जिल्हा पंचायतीमध्ये प्रत्येकी 25 मतदारसंघ आहेत. आगामी निवडणुकीच्या पूर्वी मतदारसंघाची फेररचना केली जाणार आहे. उत्तर आणि दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवडणूक नोंदणी अधिकारी, तसेच संबंधित तालुक्यांच्या मामलेदारांना साहाय्यक नोंदणी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. मतदारसंघांची रचना करताना 1 जुलै 2025 पर्यंतच्या अद्ययावत मतदारयाद्या विचारात घेतल्या जाणार आहेत. प्रत्येक मतदारसंघांचा नकाशा तयार करून 11 सप्टेंबर 2025 पर्यंत सर्व माहिती राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्याचा आदेश देण्यात आला आहे.

