Home Featured जि. पं. निवडणुकीत भाजप-मगो युती विजयी होईल

जि. पं. निवडणुकीत भाजप-मगो युती विजयी होईल

0

भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक व मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांच्याकडून विश्वास व्यक्त

जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजप व मगो युतीचा प्रचंड बहुमताने विजय होईल, असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक व मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी काल येथे घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

भाजप-मगो युतीचे एकूण 43 उमेदवार असून त्यापैकी 40 उमेदवार हे भाजपचे, तर 3 उमेदवार हे मगो पक्षाचे आहेत. त्याशिवाय 7 मतदारसंघांत भाजप व मगो युतीने अपक्ष उमेदवारांना पाठिंबा दिलेला आहे, असे दामू नाईक यांनी सांगितले. मगो पक्षाला केवळ 3 जागा भाजपने दिल्या आहेत. त्याविषयी मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांना पत्रकारांनी विचारले असता, मगोला कमी जागा दिल्या आहेत असे म्हणता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाजपने आमच्या दोघाही आमदारांना त्यांना या निवडणुकीत कोणत्या जागा पाहिजेत असे विचारले होते, तेव्हा त्यांनी तीन जागा सुचवल्या व त्या तिन्ही जागा मगो पक्षाला देण्यात आल्या असल्याचे ढवळीकर यांनी स्पष्ट केले. जेव्हा जेव्हा राज्यात भाजप व मगो पक्षाची युती होत असते तेव्हा तेव्हा या युतीला 45-50 टक्के एवढी मते मिळत असतात. या जिल्हा पंचायत निवडणुकीतही या युतीला तेवढी मते मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी पत्रकार परिषदेतून बोलताना व्यक्त केला.

विधानसभा निवडणुकीत प्रियोळातून
मगोला उमेदवारी मिळणार : ढवळीकर

आगामी विधानसभा निवडणुकीतही भाजप व मगो पक्षाची युती होणार आहे. आम्ही समविचारी पक्ष आहोत. आम्ही एकत्र येतो तेव्हा आम्हाला 45 ते 50 टक्के एवढी मते मिळत असतात, असे काल मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी सांगितले. आगामी विधानसभा निवडणुकीत प्रियोळ मतदारसंघात मगो पक्षाला उमेदवारी मिळणार असल्याचे त्यांनी संबंधित प्रश्नाचे उत्तर देताना स्पष्ट केले. फोंडा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत रवी नाईक यांच्या पुत्राला उमेदवारी द्यावी, अशी मागणी मगोने यापूर्वीच केलेली आहे, असेही ढवळीकर यांनी सांगितले.

केतन भाटीकरांविषयी ढवळीकर काय म्हणाले?
मगो पक्षाचे एक नेते केतन भाटीकर यांनी पक्ष सोडल्याविषयी विचारले असता, त्यांना फोंडा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत मगोकडून निवडणूक लढवायची होती. तशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. मात्र ते शक्य नसल्याचे सांगितल्याने भाटीकर हे नाराज होते, असे दीपक ढवळीकर म्हणाले. आता भाटीकर यांनी राजीनामा दिलेला असून, पक्षाच्या केंद्रीय समितीच्या बैठकीत त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आरोपांविषयी ‘त्या’ नेत्यांकडून स्पष्टीकरण घेणार
पक्षावर आरोप करणाऱ्या अथवा पक्षाच्या विरोधात बोलणाऱ्या भाजप नेत्यांना आरोपांविषयी स्पष्टीकरण द्यावे लागेल, असे काल भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी काल येथे घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. हडफडे येथील अग्निकांडाच्या घटनेनंतर भाजपच्याच काही नेत्यांनी पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्या पार्श्वभूमीवर काल पत्रकारांनी दामू नाईक यांना विचारले असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.