जिल्हा पंचायत निवडणूक, आरक्षण जाहीर

0
5

महिलांसाठी 18 मतदारसंघ राखीव

13 ओबीसीसाठी, 6 एसटी, 1 एससीसाठी राखीव

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण काल जारी केले आहे. राज्य निवडणूक आयुक्त मिनिनो डिसोझा यांनी यासंबंधीची सूचना काल जारी केली. राज्यातील जिल्हा पंचायत निवडणूक 13 डिसेंबर 2025 रोजी घेतली जाणार आहे. यासंबंधीची अधिकृत घोषणा लवकरच केली जाणार आहे.
जिल्हा पंचायतीचे 18 मतदारसंघ महिलांसाठी राखीव आहेत. 13 मतदारसंघ ओबीसी, 6 मतदारसंघ एसटी आणि 1 मतदारसंघ एससीसाठी राखीव ठेवण्यात आला आहे.

उत्तर गोवा जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष धाकू मडकईकर यांचा सेंट लॉरेन्स मतदारसंघ महिला ओबीसीसाठी राखीव झाला आहे. उत्तर गोवा जिल्हा पंचायतीचे माजी अध्यक्ष सिद्धेश नाईक यांचा खोर्ली मतदारसंघ सर्वसामान्यांसाठी खुला आहे. त्यामुळे सिद्धेश नाईक या मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढवू शकतात. जिल्हा पंचायतीच्या विद्यमान अनेक सदस्यांचे मतदारसंघ राखीव झाले आहे.

उत्तर गोव्यात 25 मतदारसंघ
उत्तर गोवा जिल्हा पंचायतीमध्ये एकूण 25 मतदारसंघांचा समावेश आहे. त्यात हरमल, कोलवाळ, कळंगुट, रेईश मागूश, चिंबल, मये हे सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहे. तर, सांताक्रूझ, सेंट लॉरेन्स, मोरजी हे तीन मतदारसंघ ओबीसी महिलांसाठी राखीव आहेत. तोरशे, हणजूण, पाळी, होंडा हे चार मतदारसंघ ओबीसीसाठी राखीव आहेत.

केरी मतदारसंघ एससीसाठी
केरी हा मतदारसंघ एससीसाठी आणि ताळगाव हा मतदारसंघ एसटीसाठी राखीव जाहीर करण्यात आला आहे. तर, धारगळ, शिवोली, हळदोणा, सिरसई, सुकूर, पेन्हा-दे-फ्रान्स, खोर्ली, लाटंबार्से, कारापूर-सर्वण आणि नगरगाव हे 10 मतदारसंघ सर्वांसाठी खुले आहेत.
कवळे, नुवे, दवर्ली, कुडतरी हे चार मतदारसंघ ओबीसीसाठी राखीव आहेत. कुर्टी, राय, गिरदोली, सावर्डे हे मतदारसंघ एसटीसाठी राखीव आहेत. तर, बेतकी खांडोळी, कोलवा, वेलिंग, बाणावली, धारबांदोडा, शेल्डे, पैंगीण, सांकवाळ हे आठ मतदारसंघ खुले आहेत.

दक्षिण गोव्यात 25 मतदारसंघ

दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या 25 मतदारसंघाचा समावेश आहे. वेलिंग-प्रियोळ, बोरी, शिरोडा, बार्से, कुठ्ठाळी आणि उसगाव-गांजे हे सहा मतदारसंघ सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहे. नावेली आणि खोला हे दोन मतदारसंघ ओबीसी महिलांसाठी राखीव आहेत. तर, रिवण हा मतदारसंघ एसटीमहिलांसाठी राखीव आहे.