जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी ३४५ अर्ज

0
128

>> शेवटच्या दिवशी १६८ अर्ज, आज होणार छाननी

राज्यातील उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा या दोन्ही जिल्हा पंचायतीच्या ५० जागांसाठी २२ मार्च २०२० रोजी होणार्‍या निवडणुकीसाठी ३०५ उमेदवारांनी ३४५ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. शुक्रवार ६ मार्च रोजी उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येणार आहे.

उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या २५ मतदारसंघात १७५ आणि दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीतील २५ मतदारसंघात १७० जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल १६८ जणांनी उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकार्‍यांकडे दाखल केले आहेत. त्यात उत्तर गोव्यात ८० आणि दक्षिण गोव्यात ८८ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या रिवण मतदारसंघात प्रत्येकी सर्वाधिक १४ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. तर, उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या धारगळ मतदारसंघात सर्वाधिक १२ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी भाजपने ४२ मतदारसंघात, मगोप १८ मतदारसंघात, तर, कॉंग्रेस पक्षाने ३७ मतदारसंघात उमेदवार उभे केले आहे. आम आदमी पक्षाने निवडक मतदारसंघात उमेदवार उभे केले आहे. जिल्हा पंचायत निवडणुकीत अपक्ष उमेदवारांची संख्या मोठी आहे.

भाजपच्या निष्ठावंत व नवीन कार्यकर्त्यांमधील अंतर्गत संघर्ष जिल्हा पंचायत निवडणुकीत उफाळून आला आहे. अनेक मतदारसंघात भाजपच्या कार्यकर्त्यांनी बंडखोरी केल्याने भाजपसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. बंडखोरांना थंड करण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेत्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

भाजपचे माजी आमदार किरण कांदोळकर यांच्या पत्नी कविता कांदोळकर यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देऊन कोलवाळ मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी जाहीर केली आहे. तसेच माजी आमदार कांदोळकर यांचे समर्थक आनंद टेमकर यांनी शिरसई मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल करून भाजपसमोर आव्हान उभे केले आहे. माजी आमदार कांदोळकर यांनी कोलवाळ मतदारसंघातील उमेदवारी पत्नी कविता यांना देण्याची मागणी केली होती. तथापि, भाजपने कॉंग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आमदार नीळकंठ हर्ळणकर यांच्या समर्थकाला उमेदवारी दिल्याने किरण कांदोळकर नाराज बनले आहेत.
सावर्डे मतदारसंघातील भाजपचे माजी जिल्हा पंचायत सदस्य प्रदीप देसाई यांनी भाजपचा राजीनामा देऊन मगोपतून सावर्डे मतदारसंघात उमेदवारी दाखल केली आहे.

साकवाळमधून भाजपच्या
अनिता थोरात बिनविरोध

सांकवाळ मतदारसंघातून अनिता थोरात यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झालेला असल्याने त्यांची बिनविरोध निवड उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर जाहीर केली जाणार आहे. कॉंग्रेस पक्षाने सांकवाळ मतदारसंघात उज्वला प्रेमानंद नाईक हिला उमेदवारी ४ मार्चला जाहीर केली होती. तथापि, त्यांचा उमेदवारी अर्ज शेवटच्या दिवशी दाखल होऊ शकला नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी सांकवाळ मतदारसंघातील भाजप उमेदवार अनिता थोरात यांच्या होणार्‍या बिनविरोध निवडीबद्दल अभिनंदन केले आहे. उत्तर आणि दक्षिण या दोन्ही पंचायतीवर भाजपची सत्ता आणण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत असेही तानावडे यांनी सांगितले.