निवडणूक प्रक्रियेसाठी सरकारी यंत्रणा सज्ज; पोलिसांकडून गस्त सुरू
राज्यातील उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा या दोन्ही जिल्हा पंचायतींच्या शनिवारी 20 डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या जाहीर प्रचाराची काल सांगता झाली. सरकारी यंत्रणा निवडणूक प्रक्रियेसाठी सज्ज झाली असून, मतदानासाठी नियुक्त सरकारी कर्मचारी मतदान केंद्राचा ताबा शुक्रवारी संध्याकाळी घेणार आहेत. जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी मतदान मतपत्रिकेच्या माध्यमातून घेतले जाणार आहे.
दोन्ही जिल्हा पंचायतींच्या 50 मतदारसंघात एकूण 8 लाख 69 हजार 356 मतदार आहे. राज्यातील दोन्ही जिल्हा पंचायत क्षेत्रात महिला मतदारांची संख्या जास्त आहे. उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या 25 मतदारसंघात एकूण 4 लाख 40 हजार 199 मतदार आहेत. त्यात पुरुष मतदार 2 लाख 13 हजार 704 आणि 2 लाख 26 हजार 492 महिला मतदारांचा समावेश आहे. उत्तर गोव्यातील सुकूर मतदारसंघात सर्वाधिक 24 हजार 312 मतदार आहेत, तर पाळी मतदारसंघात सर्वांत कमी 14 हजार 621 मतदार आहेत.
दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या 25 मतदारसंघात एकूण 4 लाख 29 हजार 157 मतदार आहेत. त्यात पुरुष मतदार 2 लाख 6 हजार 902 आणि 2 लाख 22 हजार 253 महिला मतदारांचा समावेश आहे. दक्षिण गोव्यात सांकवाळ मतदारसंघात सर्वाधिक 28 हजार 405 मतदार आहेत, तर उसगाव-गांजे मतदारसंघात सर्वांत कमी 12 हजार 605 मतदार आहे. उत्तर गोव्यात एकूण 658 मतदान केंद्रे आणि दक्षिण गोव्यात एकूण 626 मतदान केंद्रे आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने विविध मतदारसंघातील निवडणूक प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी 15 निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. तसेच, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी न्यायदंडाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. राज्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर सरकारी कर्मचाऱ्यांसोबत पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यातील जिल्हा पंचायत मतदारसंघात जमावबंदीचा आदेश लागू झाला आहे. निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाईसाठी पोलीस व गस्ती पथकांनी विविध भागात गस्त घालण्यास सुरुवात केली आहे.

