राज्यात होऊ घातलेल्या जिल्हा पंचायत निवडणुका पक्ष पातळीवर घेण्यासंबंधीचा वटहुकूम आज काढण्यात येणार असल्याचे पंचायत संचालक गुरुदास पिळर्णकर यांनी काल या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. जिल्हा पंचायत निवडणुका पक्ष पातळीवर घेण्यासंबंधीचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याच्या पार्श्वभूमीवर पंचायत खात्यातर्फे आज हा वटहुकूम काढण्यात येणार आहे. दरम्यान, या निवडणुका १५ मार्च रोजी घेण्याचा विचार असल्याचे ते यावेळी म्हणाले. या निवडणुकांसाठी मतदारसंघांची फेररचना करण्यात येणार आहे. आतापर्यंत उत्तर गोव्यात ३० तर दक्षिण गोव्यात २० मतदारसंघ होते. मात्र, आता फोंडा तालुक्यातील पाच मतदारसंघांचा दक्षिण गोव्यात समावेश करून दोन्ही जिल्ह्यातील मतदारसंघांची संख्या २५-२५ असा करण्यात येणार आहे. तसेच मतदारसंघांची पुनर्रचना करण्यात येणार आहे. बहुतेक मतदारसंघांचा आकार सारखाच असेल याकडे लक्ष देण्यात येणार असल्याचे श्री. पिळर्णकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

