जिल्हा पंचायतींसाठी भाजपचे १८ उमेदवार जाहीर

0
142

भाजपने जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी आपल्या १८ उमेदवारांची पहिल्या यादीची घोषणा काल केली. उत्तर गोवा जि. पं. साठी १४ आणि दक्षिण गोवा जि. पं. साठी ४ उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. भाजपने पहिल्या यादीत ६ विद्यमान जिल्हा पंचायत सदस्यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. येत्या शनिवार २९ फेब्रुवारीपर्यंत भाजपच्या सर्व उमेदवारांच्या नावांची घोषणा केली जाणार आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी पत्रकार परिषदेत काल केली.

भाजपच्या जिल्हा पंचायत उमेदवार निवडणूक समितीची बैठकीत १८ नावांना मंजुरी देण्यात आली. उत्तर गोवा जिल्हा पंचायतीसाठी १४ आणि दक्षिण गोवासाठी ४ उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. या बैठकीला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांची उपस्थिती होती.

भाजपचा विजय निश्‍चित ः तानावडे
भाजपने स्वबळावर जिल्हा पंचायत निवडणूक लढविण्याबाबत नियोजन केलेले आहे. मागील जिल्हा पंचायत निवडणुकीत मगोपशी जागा वाटप केले होते. या खेपेला मगोपने स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला तरी त्यांचा भाजपच्या उमेदवारांवर कोणताही परिणाम होणार नाही. दोन्ही जिल्हा पंचायतीवर भाजपचा विजय निश्‍चित आहे, असा दावा तानावडे यांनी केला.

मतदार याद्यांशी भाजपचा
संबंध नसल्याचा दावा
भाजपला जिल्हा पंचायत निवडणुकीत राज्य निवडणूक आयोगाकडून झुकते माप दिले जात असल्याचा गोवा प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केलेला आरोप खोडसाळ व दिशाभूल करणारा आहे. जिल्हा पंचायत मतदारसंघ राखीवता, मतदार याद्या तयार करण्याच्या कामाशी भाजपचा काहीच संबंध नाही. कॉंग्रेस पक्षाला नागरिकांकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने चोडणकर वैफल्यग्रस्त बनले असून बिनबुडाचे आरोप करीत आहेत. चोडणकर यांनी जिल्हा पंचायत निवडणूक लढविण्याकडे लक्ष केंद्रित करावे, असा सल्ला तानावडे यांनी दिला.

पहिल्या दिवशी भाजपतर्फे
तीन अर्ज दाखल
राज्यातील जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास कालपासून प्रारंभ झाला असून पहिल्या दिवशी भाजपतर्फे तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या होंडा मतदारसंघात भाजपचे उमेदवार सगुण वाडकर, केरी मतदारसंघात भाजपच्या उमेदवार देवयानी गावस, नगरगाव मतदारसंघात भाजपच्या उमेदवार राजश्री काळे या तिघांनी सत्तरी तालुका निर्वाचन अधिकार्‍याकडे उमेदवारी अर्ज सादर केले आहेत.

गोवा फॉरवर्ड पार्टी पक्षीय
पातळीवर निवडणूक लढणार नाही
गोवा फॉरवर्ड पक्ष जिल्हा पंचायत निवडणूक पक्षीय पातळीवर लढविणार नाही. गोवा फॉरवर्डचे समर्थक वैयक्तिक पातळीवर निवडणूक रिंगणात उतरणार असून पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यांच्यासाठी प्रचार करणार आहेत, अशी माहिती गोवा फॉरवर्डचे आमदार जयेश साळगावकर यांनी पत्रकार परिषदेत काल दिली.

गोव्यात जिल्हा पंचायत निवडणूक पक्षीय पातळीवर घेणे योग्य नाही. जिल्हा पंचायतीचा अध्यक्ष म्हणून आपण काम पाहिलेले आहे. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत गोव्यातील जिल्हा पंचायतींच्या कार्याची पद्धत वेगळी आहे. सरकारकडून जिल्हा पंचायतीला विकास कामांसाठी ठराविक रक्कम दिली जाते. सदर विकासनिधी सर्व मतदारसंघासाठी विभागून दिला जातो. त्यामुळे स्थानिक पातळीवर पक्षीय राजकारण आणणे अयोग्य आहे, असेही आमदार साळगावकर यांनी सांगितले. लोकांच्या भावना समजून न घेता कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष चोडणकर जिल्हा पंचायत निवडणुकीबाबत निर्णय घेऊ पहात आहेत. कॉंग्रेस पक्ष निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न करीत आहे की विरोधकांना निवडणुकीत लाभ मिळवून देण्यासाठी काम करीत आहेत.? असा प्रश्‍न आमदार साळगावकर यांनी उपस्थित केला.

-: भाजपचे जि. पं. उमेदवार ः-
उत्तर गोवा – हरमल – अनंत गडेकर, मोरजी – धनंजय शेटगावकर, धारगळ – मनोहर धारगळकर, तोरर्से – सीमा खडपे, शिवोली – सानिषा तोरस्कर, हळदोणा – मनीषा नाईक, हणजूण – नरहरी मांद्रेकर, कळंगुट – दत्तप्रसाद दाभोलकर, सर्वण कारापूर – महेश सावंत, मये – शंकर चोडणकर, पाळी – गोपाळ सुर्लीकर, होंडा – सगुण वाडकर, केरी – देवयानी गावस, नगरगाव – राजश्री काळे. दक्षिण गोवा – उसगाव गांजे – उमाकांत गावडे, दवर्ली – उल्हास तुयेकर, बार्से – खुशाली वेळीप, खोला – शाणू वेळीप.