जितेंद्र देशप्रभूंच्या मृत्यूची चौकशी निःपक्षपणे करा ः कॉंग्रेसची मागणी

0
123

कॉंग्रेसचे ज्येष्ठ दिवंगत नेते जितेंद्र देशप्रभू यांचे गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळातील काही डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे निधन झालेले असून त्यांच्या मृत्यूची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांद्वारे निःपक्षपणे चौकशी केली जावी, अशी मागणी गोवा प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली आहे. देशप्रभू यांच्या निधनावर प्रदेश कॉंग्रेसने त्याच दिवशी संशय व्यक्त केला होता असे चोडणकर यांनी म्हटले आहे.

या मागणीकडे कुणी राजकीय नजरेने पाहू नये. देशप्रभू यांचा कोरोना चाचणी अहवाल नकारात्मक आला होता असा दाखला देणे हे संशयास्पद वाटत असल्याचे चोडणकर यांनी म्हटले आहे. त्यासंबंधी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आरोग्य मंत्री विश्वजीत राणे, गोमेकॉचे डीन शिवानंद बांदेकर यांना देशप्रभू यांच्या कोरोना चाचणी अहवालासंबंधी परस्परविरोधी विधाने केल्याने संशयाला जागा मिळत असल्याचे चोडणकर यांनी म्हटले आहे.

जितेंद्र देशप्रभू यांना जेव्हा इस्पितळात दाखल करण्यात आले तेव्हा उपचार करण्यासाठी आवश्यक असलेले दोन महत्वाचे डॉक्टर्स इस्पितळातून गायब होते, असा आरोप चोडणकर यांनी केला असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी चोडणकर यांनी केली आहे.

निलंबन स्थगित ठेवण्याची
डॉक्टर संघटनेची मागणी
गोमेकॉच्या निवासी डॉक्टर संघटनेने माजी आमदार देशप्रभू मृत्यूप्रकरणी सखोल चौकशीची मागणी केली असून तोपर्यंत ज्येष्ठ डॉक्टरांचे निलंबन स्थगित ठेवण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी ज्येष्ठ डॉक्टराच्या निलंबनाचा आदेश जारी योग्य प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली नाही, असा दावा संघटनेने गोमेकॉच्या डीनना सादर केलेल्या निवेदनात केला आहे.

गोमेकॉतील डॉक्टर निलंबित

पेडणेचे माजी आमदार जितेंद्र देशप्रभू यांच्यावरील उपचारात निष्काळजीपणा केल्याप्रकरणी चौकशीला सुरुवात झाली असून गोवा वैद्यकीय महाविद्यालयात एका विभागातील प्रमुख डॉक्टराला निलंबित करण्यात आला आहे, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी काल दिली. याबाबत चौकशीच्या अधिक माहितीसाठी गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्यात आला. त्यांच्याकडून कॉलला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.