Home बातम्या जिताजागता पुरावा

जिताजागता पुरावा

0

सन २००८ मधील मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा एक प्रमुख सूत्रधार अबू हमजा ऊर्फ अबू जिंदल याच्या मुसक्या आवळण्यात भारतीय गुप्तचर यंत्रणेला अखेर यश आले. जिंदलचा सौदी अरेबियात माग काढून त्याला भारताकडे सोपवण्यास सौदी अरेबियासारख्या इस्लामी राष्ट्राला भाग पाडणे हे खरेच मोठे यश आहे. भारताच्या ताब्यात असलेल्या अजमल कसाब इतकाच अबू जिंदल हा या हल्ल्यातील महत्त्वाचा माणूस आहे. मुंबईवर हल्ला करणार्‍या दहा दहशतवाद्यांना शस्त्रास्त्र चालवण्याचे प्रशिक्षण देण्यापासून त्यांना हिंदी आणि मराठीतील काही वाक्ये पढवण्यापर्यंत जिंदल याचा सहभाग तर आहेच, परंतु प्रत्यक्ष हे दहा दहशतवादी भारताकडे यायला निघाले तेव्हा त्यांना कराची बंदरावर निरोप द्यायला जे गेले होते, त्यामध्येही जिंदल होता. इतकेच कशाला, प्रत्यक्ष मुंबई हल्ला सुरू झाला तेव्हा कराचीतील नियंत्रण कक्षात बसून हल्लेखोरांला भ्रमणध्वनीवरून प्रत्यक्ष दिशादिग्दर्शन करणाराही तोच होता. जिंदल हा भारतीय नागरिक असल्याने या सार्‍या हल्ल्याच्या कटामध्ये त्याचा आयएसआयने पुरेपूर वापर करून घेतलेला दिसतो. डेव्हीड कोलमन हेडली हा अमेरिकी नागरिक असल्याने आणि जिंदल हा भारतीय असल्याने यदाकदाचित ते सापडले तर पाकिस्तानकडे अंगुलीनिर्देश करता येऊ नये याचा बंदोबस्त आयएसआयने केला होता.

नरीमन हाऊसमधील दहशतवाद्याला भारतीय प्रसारमाध्यमांशी बोलताना आपण हैदराबादच्या तोली चौक भागातील असल्याचे सांगायलाही जिंदल याने सांगितले होते. म्हणजेच हे सगळे दहशतवादी भारतीय असल्याचे भासवण्याचा आयएसआयचा डाव होता. दहशतवाद्यांशी कराचीतून चाललेले भ्रमणध्वनी संभाषण भारतीय गुप्तचर यंत्रणांनी टॅप केले, तिकडे अमेरिकेत डेव्हीड हेडलीही पकडला गेला आणि हा फुगा फुटला. पाकिस्तानने कितीही नाकारले तरी या हल्ल्याचे त्या देशाशी असलेले लागेबांधे इतके स्पष्ट आहेत की ते फार काळ त्यांना नाकारता येणार नाहीत. दहशतवाद हा दोन्ही देशांसाठी तेवढाच गंभीर विषय आहे वगैरे देखावे पाकिस्तान सरकार करीत असले तरी या हल्ल्यातील आरोपींची पाठराखणच एवढी वर्षे त्यांनी चालवली. आजही या कटासंदर्भात उघड झालेले पुरावे ग्राह्य मानण्याची पाकची तयारी दिसत नाही. पण कसाब, जिंदल आणि हेडली या तीन जित्याजागत्या पुराव्यांना पाकिस्तान किती काळ नाकारू शकेल? जिंदल आणि हेडली हे आपले नागरिक नाहीत असे म्हटल्याने पाकिस्तान स्वतः नामानिराळे राहू शकणार नाही. या दोघांनाही पाकिस्तानमध्ये कसे प्रशिक्षण मिळाले, कोठे मिळाले, कोणी दिले, मुंबईवरील हल्ल्याचा कट कसा कोठे आणि कोणी शिजवला याची घडाघडा कबुली या तिघाही दहशतवाद्यांकडून भारतीय आणि अमेरिकी तपास यंत्रणांना मिळालेली आहे. जिंदल हा मूळचा महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील जरी असला तरी औरंगाबादेत २००६ साली मोठा शस्त्रास्त्रसाठा मिळाल्यानंतर बिंग फुटण्याच्या भीतीने तो पाकिस्तानात पळाला. त्यानंतर भारतात झालेल्या विविध दहशतवादी हल्ल्यांमध्ये आयएसआयने तो भारतीय नागरिक असल्याने त्याचा पुरेपूर वापर करून घेतला. मुंबईखेरीज बंगलोर, पुणे, दिल्ली आदी ठिकाणच्या हल्ल्यांमध्ये त्याचा वापर झाला असल्याचा संशय आहे. पुढील तपासात त्याला जरा थर्ड डिग्री लावली की तो पोपटासारखा घडाघडा बोलेल. प्रश्न पाकिस्तानच्या भूमिकेचा आहे. २००८ सालापासून त्यांनी जी नकारघंटा वाजवायला सुरूवात केलेली आहे तीच भूमिका आजही आहे. अशा परिस्थितीत भारत केवळ कारवाईच्या विनवण्या करीत राहणार आहे की आंतरराष्ट्रीय समुदायापुढे पाकिस्तानला या सगळ्या सबळ पुराव्यांच्या आधारे उघडे पाडणार आहे? सर्व प्रकारची आंतरराष्ट्रीय सहानुभूती भारताच्या बाजूने असूनही पाकिस्तानची कोंडी करण्यात सरकार आजवर अपयशीच ठरले आहे. पाकिस्तान काही करीत नाही असा कांगावा केला म्हणून काही हे अपयश लपून राहात नाही. कसाब आणि जिंदलसारखे जितेजागते पुरावे असूनही भारत सरकारला जर मुंबई हल्ल्याच्या पडद्यामागील खर्‍या सूत्रधारांना त्यांच्या त्या अमानुष गुन्ह्याची सजा देता येणार नसेल तर त्याच्यासारखी नामुष्की दुसरी नाही.