जामिनावर सुटलेल्या 25 वर्षीय तरुणाचा रुमडामळ-दवर्लीत खून

0
7

एका खून प्रकरणात अटकेनंतर जामिनावर सुटलेल्या सादिक बळ्ळारी (वय 25) या तरुणाचा काल रुमडामळ-दवर्ली येथे दिवसाढवळ्या खून करण्यात आला. हल्लेखोरांनी सादिकच्या गळ्यावर धारदार शस्त्रांनी वार करत त्याचा खून केला. या प्रकरणी मायणा-कुडतरी पोलिसांनी बेळगाव-कर्नाटकमधून दोघांना ताब्यात घेतले आहे.
सविस्तर माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सादिक बळ्ळारी याचे आई आणि वडील कामानिमित्त घरातून बाहेर पडले होते. तो घरात एकटाच असल्याचे पाहून हल्लेखोरांनी सादिकच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्यारांनी वार केला, त्यात त्याचा मृत्यू झाला. खुनानंतर हल्लेखोरांनी लगेचच पळ काढला, ते पळून जात असल्याचे दृश्य त्या भागातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. सीसीटीव्हीमध्ये दोघे जण पळून जात असल्याचे दृश्य अस्पष्टपणे दिसून आले आहे. पोलिसांकडून त्या आधारे तपास सुरू केला. त्यानंतर बेळगावमधून दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
दरम्यान, माडेल-फातोर्डा येथे 2 दिवसांपूर्वी एका परप्रांतीयाचा खून झाला होता. त्या प्रकरणाचा अद्याप छडा लागलेला नाही.

सादिकची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची
28 मे 2020 रोजी रुमडामळ-दवर्ली येथे भगवती कॉलनी भागात दोन गटांमध्ये झालेल्या भांडणात मुजाहिद खान या युवकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सादिक बळ्ळारी याच्यासह इस्माईल मुल्ला (23) या दोघांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर सादिकची दोन महिन्यांपूर्वीच जामिनावर सुटका झाली होती.