– शंभू भाऊ बांदेकर
जागतिक कीर्तीचे प्रतिभावंत साहित्यिक रुडयार्ड किपलिंग यांनी ‘जंगलबुक’ सारखी कलाकृती निर्माण करून जंगल आणि जंगलातील प्रत्येक घटकासंबंधी थोरा-मोठ्यांना आणि विशेषतः लहान मुलांना जंगल, जंगलातील विविध प्रकारची झाडे आणि पर्यावरण याबाबतीतही माहिती करून देतानाच भारतीय संस्कृतीतील ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे| वनचरे|’ याची यथार्थ जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला.
आपल्या भारत देशाबद्दल सांगायचे झाले तर, या भारतभूमीच्या प्रति आणि येथील प्राणी, फुलपाखरे, मुंग्या इत्यादींविषयी भूतदया जागवून ज्यांनी या धरित्रीवर या सार्या जीवांना जगण्याचा अधिकार देण्यासाठी पहिल्यांदाच आपल्या साम्राज्यात तशा प्रकारचे कायदे बनवून त्यांची हत्या थांबवली व पर्यावरणाची बूज राखली ती सम्राट अशोक यांनी. अर्थात त्यांना या बाबतीत प्रेरणा मिळाली ती बुद्धांमुळे. प्राणीमात्रांची हिंसा माणसांकडून होऊ नये म्हणून बुद्धांनी जे अहिंसात्मक तत्त्वज्ञान मांडले, वृक्षलागवड, वृक्ष संवधर्नासाठी जे कार्य केले, त्याचा परिणाम सम्राट अशोक यांच्यावर झाला आणि त्यांनी आपल्या कारकिर्दीत प्रामाणिकपणे हे कार्य तडीस नेले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे देशाला ज्ञात आहेत, ते भारतीय घटनेचे शिल्पकार व थोर दलितोद्धारक म्हणून. पण बाबासाहेब हे थोर पर्यावरणवादी होते आणि त्यांनी आधुनिक भारताच्या सर्वांगिण विकासासाठी या देशातील पर्यावरण नैसर्गिक स्त्रोत, वन्य प्राणी व सर्व जीवजंतूंना संरक्षण देण्यासाठी आणि त्यांचे संवर्धन करण्यासाठी संविधानात तशी तरतूद करून ठेवली आहे, हे कितीजणांना माहीत असेल बरे?
माझे तर असे स्पष्ट मत आहे की, वृक्षवेलींवर, पर्यावरणावर आणि अहिंसेवर प्रेम करणार्या भारतीयांनी प्रथम कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे ती गौतम बुद्धांबद्दल, कारण माणसाप्रमाणेच प्रत्येक जीव-जंतू, वृक्षवेली आणि प्राणी यांना जगण्याचा मूलभूत अधिकार आहे, असे ठाम प्रतिपादन त्यांनी केले. त्यानंतर दुसरे अभिवादन सम्राट अशोक यांना केले पाहिजे. कारण बुद्धांचा हा बुद्धिनिष्ठ व तर्कनिष्ठ विचार प्रत्यक्ष अंमलात आणण्याचे काम त्यांनी केले आणि तिसरे अभिवादन अर्थातच बाबासाहेब आंबेडकरांना. आज आपण पर्यावरणाचा विचार करतो, त्यावेळी आपल्याला चटकन आठवण येते ती पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांची. निसर्ग, विकास आणि सुराज्य अशी त्रिसूत्री घेऊन ती पश्चिम घाट योजनेंतर्गत प्रत्यक्षात आणण्यासाठी ते वाणी व लेखणीने प्रयत्नशील आहेत. गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्यातील सह्याद्री व तामिळनाडू व केरळ राज्यातील निलगिरी आणि मलयगिरी यांनी बनलेला पश्चिम घाट म्हणजे जैवविविधतेचे एक आगळे वेगळे भांडार आहे. सोबतीला येथे विपुल खनिज संपत्तीही आहे. शिवाय हा प्रदेश सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्याही समृद्ध आहे. त्यामुळे येथे वेगवेगळ्या विकासाचे प्रकल्प मोठ्या जोमाने येथे उभे रहावेत, बेकारीचा प्रश्न सुटावा, पश्चिम घाट योजनेखाली येणार्या राज्यांबरोबरच देशाचाही विकास व्हावा, असे गाडगीळांना वाटते. त्यांची अट फक्त एकच ती म्हणजे हे सारे पर्यावरणाचा समतोल सांभाळून व्हावे. त्यांचे मुख्य म्हणणे असे आहे की, पश्चिम घाटातील कोणकोणत्या टापूंना संवेदनशील परिसर क्षेत्रे म्हणून घोषित करणे आवश्यक आहे, ते ठरवून अशा टापूंना १९८६ च्या पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार संवेदनशील परिसरक्षेत्रे म्हणून घोषित करण्याची शिफारस करणे. पर्यावरणतज्ज्ञ तर याबाबतीत सहमत होतीलच. पण पर्यावरणप्रेमीही जर सहमत होतील तर पद्धतशीर व सुसूत्रबद्ध विकास व्हायला त्याची गरज भासेल, यात काय संशय?
मध्यंतरी गोमंतकीय पर्यावरणतज्ज्ञ कमलाकर साधले यांचा एक लेख माझ्या वाचनात आला होता. श्री. साधले यांनी त्यात लिहिले होते की,‘वैदिक ऋषींनी सांगितलेला सृष्टीच्या पूजनाचा धर्म म्हणजे पर्यावरणधर्म आणि हाच नव्या सहस्त्रकाचा धर्म होय. त्यात स्तवन केलेले सूर्य, वायू, पर्जन्य याचा खर्या देवता होत, ज्या आमच्या जीवनाचे परिपोषण करतात. पर्यावरण संतुलनाच्या संदर्भात साधलेंची जी साधना आहे, ही दुर्लक्षून चालणार नाही.
पर्यावरणाच्या संदर्भात विचार करताना आज गोव्यात काय चित्र दिसते बरे? येथे दिवसेंदिवस लोक सिमेंट-कॉंक्रिटचे जंगल उभारून, वन्य प्राण्यांची मांसासाठी व जास्त पैसे मिळवण्यासाठी शिकार करून, भरमसाट वृक्षतोड करून गोव्याची जंगल संपदा व पर्यावरण कळत-नकळत नष्ट करीत आहोत. कायद्याचा बडगा दाखवूनही यावर योग्य तो परिणाम आलेला दिसत नाही. आज जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने जगभर पर्यावरणाचा संदेश पोहोचवला जाईल. आवश्यक तेवढीच वृक्षतोड करा, एक झाड तोडले तर दोन झाडे लावा. लावलेल्या वृक्षांचे व्यवस्थित संगोपन करा. पर्यावरण हा मानवी जीनव सुखी करण्याचा आधार आहे. वगैरे गोष्टी सांगितल्या जातील. या गोष्टींचा गंभीरपणे विचार सरकारने व लोकांनीही केला पाहिजे व हे विचार प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी झटले पाहिजे हेच या दिनाच्या निमित्ताने सांगावेसे वाटते.