जागतिक ग्रंथदिनाच्या निमित्ताने

0
19
  • – कालिदास बा. मराठे

आज २३ एप्रिल हा जागतिक ग्रंथदिन. या दिनानिमित्त एका दिवसाचे सोहळे करून विसरून जाण्यापेक्षा वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी, फुलविण्यासाठी कोणते उपक्रम व्यक्तिगत वा सामाजिक पातळीवर राबवता येतील याविषयी मार्गदर्शन करणारा गोव्याच्या वाचन चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. कालिदास बा. मराठे यांचा विशेष लेख –

तेवीस एप्रिल हा जगातील ख्यातनाम साहित्यिक विल्यम शेक्सपिअर यांचा जन्मदिन आणि मृत्यूदिन. संयुक्त राष्ट्रसंघटनेने तो जागतिक ग्रंथदिन म्हणून जाहीर केला आहे.
दरवर्षी हा दिवस आपल्याला पुस्तक, पुस्तकवाचन, पुस्तकसंग्रह, पुस्तक प्रकाशन, पुस्तक प्रदर्शन यासंबंधी प्रत्येक व्यक्तीने गेल्या वर्षभरात काय केले आणि काय करायला हवे याची आठवण करून देत असतो असे मला वाटते.

आपल्या देशात ‘राष्ट्रीय पुस्तक न्यास’ (नॅशनल बूक ट्रस्ट) ही संस्था १४ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबरपर्यंत राष्ट्रीय पुस्तक सप्ताह साजरा करण्याचे आवाहन करीत असते. राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे दोन महत्त्वाच्या योजना राबविल्या जातात. एक आहे न्यासाचे वैयक्तिक सभासद होऊन न्यासाच्या पुस्तकांवर २० टक्के सूट मिळवणे. सदस्यांना घरपोच न्यासाचे मुखपत्र मिळते.

दुसरी योजना आहे शाळाशाळांमधून पुस्तक मंडळ स्थापन करून दरवर्षी पाठकमंच बुलेटिन आणि मंडळाला ५०० रुपयांची पुस्तके भेट मिळण्याची सवलत.
अर्थात, यासाठी वाचनप्रेमी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन असे वाचक पुस्तक मंडळ स्थापन करायचे आणि महिन्याला किमान एक उपक्रम राबविण्याचे आव्हान स्वीकारायला हवे.
आपल्या गोव्यात ही योजना राबविण्याची गरज आहे. आपल्या शाळा यावर्षीच्या शैक्षणिक वर्षात या दोन्ही योजना अंमलात आणतील, अशी मी आशा करतो.

राष्ट्रीय धोरण २०२० मध्ये वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी खालील प्रमुख गोष्टी सुचविल्या आहेत त्याचाही विचार करायला हवा. (नवे शिक्षणमंत्री जे पूर्ण वेळ शिक्षणमंत्री असतील, ते शिक्षणधोरणात सुचविलेल्या सर्वच गोष्टी त्वरित अंमलात आणण्यासाठी पुढाकार घेतील अशी अपेक्षा आहे.)
(१) सर्व शाळांमध्ये वाचन कोपरे, वर्ग ग्रंथालय, शाळेचे ग्रंथालय, शाळासमूहाचे ग्रंथालय असेल ज्यात अवांतर वाचनासाठी स्थानिक भाषांतील नियतकालिके, पुस्तके असतील.
(२) प्रत्येक आठवड्याला, महिन्याला विद्यार्थी वाचलेल्या, आपल्याला आवडलेल्या पुस्तकांसंबंधी चर्चा करतील.
(३) राष्ट्रीय पुस्तक संवर्धन/प्रोत्साहन धोरण तयार केले जाईल.
(४) स्थानिक भाषांतील/भारतीय भाषांतील उत्तम साहित्य एका भाषेतून दुसर्‍या भाषेत अनुवादित करण्यासाठी राष्ट्रीय अनुवाद व विवेचन संस्था स्थापन करण्यात येईल.
वाचनाविषयी/पुस्तकाविषयी राष्ट्रीय शिक्षण धोरणात सुचविलेल्या बाबी पूर्णपणे अंमलात आणण्यासाठी माझ्या वाचनात आलेल्या काही महत्त्वाच्या गोष्टी पुढे देत आहे –
१) प्रा. डॉ. वैशाली कुलकर्णी यांनी ‘सुसंस्कृत समाजासाठी वाचनसंस्कृती’ या ‘आरती’ मासिक सावंतवाडीच्या जुलै-ऑगस्ट २०२१ मधील लेखात वाचन संस्कृती विकासासाठी खालील उपाय सुचविले आहेत. –
(१) वाचन शिबिरे आयोजित करणे.
(२) पुस्तक भिशी.
(३) ग्रंथदिंड्या आयोजित करणे.
(४) वाचकस्पर्धा आयोजित करणे.
(५) डीअर टाइम (ऊीेि र्एींशीूींहळपस रपव ीशरव) सारखे प्रकल्प राबविणे.
(६) ग्रंथालयात विद्यार्थ्यांना पुस्तकापर्यंत जाण्याचे स्वातंत्र्य.

२) ‘जडणघडण’ मासिक, पुणेच्या फेब्रुवारी २०२२ मधील लेख – ‘वाचक विकासातील महाविद्यालयीन ग्रंथपालाची भूमिका’ या डॉ. राजेंद्र कुंभार यांनी महाविद्यालयातील ग्रंथपालांनी खालील उपक्रम राबविण्याचे आवाहन केले आहे. अर्थात हे उपक्रम सार्वजनिक ग्रंथालयांचे आणि शाळांतील ग्रंथपाल पण राबवू शकतील –
(१) वाचनाचे मार्केटिंग करणे. यासाठी ग्रंथपालांनी प्राध्यापक/शिक्षक म्हणून वाचनाचे महत्त्व, त्याचे फायदे सांगायला हवेत.
(२) दररोज एकेक विषय निवडून ग्रंथप्रदर्शन भरविणे. त्यात ४० ते ५० पर्यंत ग्रंथ. त्यांच्यासारख्या याद्या पण कराव्यात (यासाठी थोर पुरुषांच्या जयंत्या/पुण्यतिथ्या, महत्त्वाचे दिवस उपयोगी पडतील.)
(३) प्रत्येक मोकळ्या जागी वाचनसाहित्य प्रदर्शित करणे.
(४) वाचक मंडळ स्थापन करावे.
(५) वाचकांना सल्ला देणे – वाचनगुरू होऊन नेमके काय वाचावे याचा सल्ला देणे.
याच डॉ. राजेंद्र कुंभार यांनी जिम ट्रिलीज यांच्या इंग्रजी ग्रंथाचा मराठीत अनुवाद केला आहे – ‘मुलांना वाचून दाखवा व त्यांचे आयुष्य घडवा’
(तुमच्या गावातील ग्रंथालयात हे पुस्तक आहे का हे तपासा.)

३) ‘घार हिंडते आकाशी’ या पालकांसाठी असलेल्या शेफाली वैद्य यांच्या पुस्तकात ‘पण पुस्तकदेखील वाचा’ हा लेख आहे.
‘हसा, खेळा, वाचा, पुस्तक नंतर वाचा,’ या मुलांच्या आवडीच्या गाण्यात लेखिकेने ‘हसा, खेळा, नाचा आणि पुस्तकदेखील वाचा’ हा बदल सुचविला आहे. जगण्यासाठी माणसाने श्‍वास घ्यायचा असतो. त्याच सहजतेनं त्याने पुस्तकही वाचायचे असते. अवांतर वाचनात खूप गोष्टी साध्य होतात- (१) मुलांची भाषा सुधारते. (२) त्यांची वैयक्तिक प्रगल्भता वाढते. (३) ती सर्जनशील बनतात. (४) त्यांची कल्पनाशक्ती वाढते. (४) चांगल्या मूल्यांवरची श्रद्धा वाढते. मुख्य म्हणजे हे सगळे कसे घडते, तर झाडावरचा एखादा आंबा पिकत जावा इतक्या सहजतेने! असे लेखिका म्हणते.

४) माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम (ज्यांचा १५ ऑक्टोबर हा जन्मदिन ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून आपण साजरा करतो.) यांनी इंदूर येथील पुस्तक प्रदर्शनात ११ ऑगस्ट २००९ रोजी लोकांना जी शपथ दिली ती महत्त्वाची आहे. ‘मी आजपासून माझ्या घरात किमान २० पुस्तकांचे एक ग्रंथसंग्रहालय सुरू करीन, त्यातील १० पुस्तके मुलांसाठी असतील. माझी मुले त्यात भर टाकून त्यांची संख्या २०० च्या वर नेतील. माझी नातवंडे त्यात आणखी भर घालून ती २ हजारांवर नेतील. हे ग्रंथसंग्रहालय आमच्या जीवनाचा अमूल्य ठेवा असेल. आमच्या कुटुंबाची संपत्ती असेल. आम्ही दिवसातील किमान एक तास आमच्या कुटुंबीयांसमवेत या ग्रंथालयात व्यतीत करू.’
आजच्या पालकांसाठी ही प्रतिज्ञा आहे. सर्व पालकांनी मनावर घेतले तर हे अशक्य नाही.

अशा ग्रंथसंग्रहालयात मुलांसाठी आणि प्रौढांसाठी कोणती पुस्तके निवडावीत यासंबंधी व्यक्तींनी आणि संस्था आणि नियतकालिकांनी याद्या तयार केल्या आहेत.

साहित्य अकादमी, राज्य शासन, इतर साहित्यविषयक संस्था, ज्ञानपीठ, सरस्वती सन्मान, आंतरभारती, महाराष्ट्र साहित्य परिषद, ‘ललित’ सारखे ग्रंथलेखन, ग्रंथप्रसार, ग्रंथसंग्रह यासाठी काम करणारे मासिक दर महिन्याला चांगल्या पुस्तकांचा परिचय करून देत असते. एप्रिलच्या अंकात ‘चोखंदळ वाचक निवड’ प्रसिद्ध करीत असते.
(गावच्या ग्रंथालयात ते यायला हवे. वाचकांनी शोध घ्यावा. हे मासिक गावच्या ग्रंथालयात आणत नसतील तर आणावे.)
यावर्षी ‘ललित मासिकाच्या चोखंदळ वाचक निवडीत खालील पुस्तके आहेत – २०२१ सालात प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांसंबंधी ही निवड आहे.
१. त्रिपर्ण – मोनिका गजेंद्रगडकर
२. कालकल्लोळ – अरुण खोपकर
३. पुस्तकनाद – जयप्रकाश सावंत
४. मोरी मोर नींद नसानी होय – जयंत पवार
५. भुयपर्मळ – रश्मी कशेळकर
६. गोठण्यातल्या गोष्टी – हृषिकेष गुप्ते
७. चिद्गगनाचे भुवनदिवे – मिलिंद बोकील
८. कोलाहल – वसंत गुर्जर
९. प्राप्तकाळ – मधु मंगेश कर्णिक
१०. मुक्काम पोस्ट सांस्कृतिक फट – सतीश तांबे
११. अवलिये आप्त – सुहास कुलकर्णी
१२. पिवळ पिवळा पाचोळा – अनिल सावळे
१३. नाटक -रंगभूमी परिभाषा संग्रह – ऐतिहासिक विवरणात्मक पर्यालोचन – विलास खोले
१४. बटरफ्लाय इफेक्ट – गणेश मतकरी
१५. मी संदर्भ पोखरतोय – पवन नाबर
१६. लेखकाचा मृत्यू आणि इतर गोष्टी – जयंत पवार.

पुस्तकासंबंधी आणि वाचनासंबंधी खालील पुस्तके महत्त्वाची आहेत –
(१) पुस्तकनाद – जयप्रकाश सावंत – मॅजेस्टीक (हे पुस्तक वरील यादीत आहे.)
(२) वाचनसंस्कृती – लेखनसंस्कृती – डॉ. सुरेश सावंत – साकेत प्रकाशन
(३) वाचलं….. लिहिलं – देवदत्त साने – संगत प्रकाशन
(४) जग बदलणारे ग्रंथ – दीपा देशमुख – मनोविकास प्रकाशन
(५) ग्रंथ स्पर्श – प्रदीप कर्णिक – अनघा प्रकाशन
(६) ग्रंथ विवेचन – प्रदीप कर्णिक – अनघा प्रकाशन
(७) ग्रंथ प्रेमी – रामदास केळकर – मित्रसमाज प्रकाशन
(८) वाचनप्रेमी – रामदास केळकर – एकाक्षर, कुंकळ्ळी.

वरील सर्व पुस्तके प्रत्येक ग्रंथालयात उपलब्ध व्हावीत यादृष्टीने प्रयत्न ग्रंथपाल, वाचक यांनी करायला हवेत.
दरवर्षी कृष्णदास शामा राज्य ग्रंथालय, पणजी प्रत्येक वर्षात आपल्या राज्यात प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांची भाषावार यादी प्रसिद्ध करीत असते. याही वर्षी २०२१ सालात प्रसिद्ध झालेल्या व राज्य ग्रंथालयाकडे आलेल्या पुस्तकांची यादी राजपत्रमाला तीन मध्ये १७ फेब्रुवारीच्या अंकात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

२०२१ साली देवनागरी कोंकणीत ५९, रोमन कोंकणीत ३४ एकूण ७३, मराठीत ९५ तर इंग्रजीत १३४ पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. यातील बहुतेक पुस्तके राज्यातील ग्रंथालयात पुरवली जातात. लेखक व प्रकाशक यांनी प्रसिद्ध झालेले पुस्तक राज्य ग्रंथालयात द्यायला हवे.
लोकसत्ता दैनिक दर शनिवारच्या अंकात ‘बुकमार्क’ सदरात विशेष पुस्तकांची ओळख करून देत असते. रविवारच्या ‘लोकरंग’ पुरवणीत पण अशी ओळख करून दिली जाते. शनिवारच्या ‘चतुरंग’ पुरवणीत ‘वाचायलाच हवीत’ अशा पुस्तकांची ओळख करून देणारे सदर दर पंधरवड्याने प्रसिद्ध होत असते. इतरही वृत्तपत्रे अशा पुस्तकांची ओळख व पोच देत असते.

दूरचित्रवाणी वाहिन्यांनी पण पुस्तकाच्या ओळखीचा, लेखक भेटीचा कार्यक्रम सुरू केला आहे. एपीबी माझा या मराठी वृत्तवाहिनीने दर रविवारी सकाळी १२॥ ते १ व सायंकाळी तोच कार्यक्रम ५॥ ते ६ या वेळात ‘आनंदाचे पान’ या शिर्षकाखाली प्रसारीत केला जातो.
वरील सर्व माहिती मिळाल्यानंतर वाचकाला आवडलेले पुस्तक कसे मिळवायचे हा यक्षप्रश्‍न उभा राहतो, परंतु आजकाल ‘गुगल’वर जाऊन असे पुस्तक सहज मिळविता येते. परंतु गावच्या ग्रंथालयात असे पुस्तक मिळवून देण्याची सोय करावी अशी काहीजणांची सूचना आहे, ज्यामुळे वाचकांना व ग्रंथपालांना काही फायदा होईल. या सूचनेवर ग्रंथपालांनी आणि वाचकांनी मोकळेपणाने आपले मत मांडावे अशी मी विनंती करतो.
महाराष्ट्रात तीन वर्षांपूर्वी पाचगणीजवळ भिलार गावी ‘पुस्तकांचे गाव’ महाराष्ट्र सरकारने गाव उभारले. यावर्षी अशीच आणखी चार पुस्तकांची गावे तयार करण्याचा महाराष्ट्र सरकारचा मानस आहे. पेडण्याला झालेल्या गोमंतक मराठी साहित्य संमेलनात अध्यक्ष श्री. विजय कापडी यांनी आपल्या गोव्यात ‘पुस्तकाचे गाव’ स्थापन करावा अशी मागणी केली आहे. वाचकांनी यासाठी नव्या कला आणि संस्कृती मंत्र्याकडे ही मागणी लावून धरायला हवी. अर्थात कोणता गाव यासाठी तयार आहे हे ग्रामसभेत हा प्रस्ताव मांडून ठरवायला हवे. जून २०२२ मध्ये होणार्‍या ग्रामपंचायत निवडणुकीनंतरच हे ठरविणे योग्य ठरेल. नव्या दमाचे नवीन पंचसदस्य व नवीन सरपंच याबाबतीत पुढाकार घेतील अशी आशा करूया.
बर्‍याच लांबलेल्या या लेखनाचा शेवट श्री. चंद्रकांत निफाडे – कोल्हापूर यांच्या ‘पुस्तक वाचून मिळतं काय?’ या कवितेने करतो. –

‘नका विचारू कधी मित्रहो
पुस्तक वाचून मिळतं काय?
गंमतगाणी, मधुर वाणी
छान छान गोष्टी, विवेक दृष्टी
हसण्यासाठी, जगण्यासाठी
एक टॉनिक, दुसरं काय?
पुस्तक खाण ज्ञानाची
जिवंत चळवळ मनाची
पुस्तक म्हणजे जगणं
भविष्याकडे बघणं.
नाश तमाचा, श्‍वास दमाचा
रसाळ, मधाळ, दुधाळ गाय!
आनंदाचा ठेवा, बुद्धीला मेवा
वाचणारा दंग, जीवनाला रंग
पळतील दुःख, येतील सुखं
पुस्तक आपला गुरुच हाय.

——***——-