जहाल नेता गणेश उईकेसह 5 नक्षलवादी ठार

0
12

ओडिशाच्या सीमावर्ती भागात कारवाई; मोठ्या प्रमाणावर शस्त्रे व नक्षल साहित्य जप्त

ओडिशा राज्यातील कंधमाळ आणि गंजाम जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात गुरुवारी झालेल्या चकमकीत जहाल नक्षल नेता व केंद्रीय समिती सदस्य गणेश उइकेसह दोन महिला आणि दोन पुरुष असे एकूण पाच नक्षलवादी ठार झाले. उइकेवर विविध राज्यात दोन कोटींहून अधिक बक्षीस होते.

24 डिसेंबर रोजी गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीनंतर ओडिशा सुरक्षा दलांनी कंधमाळ जिल्ह्यातील चक्रपाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणि गंजाम जिल्ह्याच्या सीमेवरील रामभा जंगल परिसरात नक्षलविरोधी मोहीम राबविली होती. या ठिकाणी नक्षलवाद्यांचे मोठे शिबिर असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे विशेष अभियान गटाचे 20 पथके, केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्या आणि सीमा सुरक्षा दलाचे एक पथक अशा एकूण 23 पथकांनी या घनदाट जंगलाला वेढा घातला. जवानांची चाहूल लागताच नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला. मात्र, चहुबाजूंनी जवानांनी दिलेल्या चोख प्रत्युत्तरापुढे नक्षलवाद्यांचा टिकाव लागला नाही. चकमकीनंतर करण्यात आलेल्या शोधमोहिमेत दोन पुरुष आणि दोन महिला नक्षलवाद्यांचे मृतदेह हाती लागले. घटनास्थळावरून दोन ‘इन्सास’ रायफल्स, एक 303 रायफल आणि मोठ्या प्रमाणावर नक्षल साहित्य जप्त करण्यात
आले आहे.

ठार झालेल्यांमध्ये ओडिशा राज्याचा सर्वेसर्वा आणि नक्षल संघटनेचा केंद्रीय समिती सदस्य गणेश उइकेचा समावेश आहे. त्यामुळे सुरक्षा दलांना मोठे यश मिळाल्याचे मानले जात आहे. मूळ तेलंगणातील रहिवासी असलेला गणेश उइके गेल्या चार दशकांपासून नक्षलवाद्यांच्या धोरणात्मक निर्णयांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असे. विशेषतः छत्तीसगड आणि ओडिशाच्या सीमावर्ती भागात त्याची मोठी दहशत होती. 2008 मधील नायगड येथील शस्त्रागार लूट असो वा 2012 मधील हिंसाचार, अनेक मोठ्या कारवायांमध्ये त्याचा थेट सहभाग होता.
उर्वरित नक्षलवाद्यांची ओळख पटवण्याचे काम अद्याप सुरू असून या कारवाईमुळे नक्षलवाद्यांच्या ‘लाल कॉरिडॉर’मधील कणा मोडला गेल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.