भारताच्या ऐतिहासिक अशा सेंट्रल हॉलमध्ये भारताचे २६ रोजी अधिकृत शपथ घेणार असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाजप संसदीय गटाचे नेते म्हणून निवड करण्यात आली. ‘लोकशाहीच्या मंदिरात’ पायरीवर नतमस्तक होऊन त्यांनी प्रवेश केला. मोदींना सुरुवातीला विरोध दर्शविणार्या लाल कृष्ण अडवाणींनी व सुषमा स्वराज यांनी मोदींच्या निवडीचा प्रस्ताव अनुक्रमे सूचित व अनुमोदीत केला. नरेंद्र मोदी यांनी केलेले ‘स्वीकृती’चे भाषण त्यांच्या प्रचारादरम्यानच्या प्रतिमेपेक्षा वेगळी प्रतिमा निर्माण करणारे होते. त्याचबरोबर एका राष्ट्रीय नेत्याची परिपक्वता दाखवणारेही ते होते. प्रचारादरम्यान, आक्रमक दिसणारे-कणखर बोलणारे मोदी देशाने भावूक होताना पाहिले. कॉर्पोरेट जगताशी जवळीक असल्याचा आरोप झालेले मोदी, नवी शहरे, उद्योगधंदे, आयआयटी इत्यादी उभारण्याविषयी सातत्याने बोलणारे मोदी तळागाळातील लोकांसाठी बोलताना दिसले. गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांनी सरकारची व्याख्या ‘गरिबांचा विचार करणारे, गरिबांचे ऐकणारे व गरिबांसाठी अस्त्त्विात राहणारे’ अशी केली. प्रचारादरम्यान कॉंग्रेसवर कठोर टीका करणार्या मोदींनी गत सरकारनेही काही चांगली कामे केली आहेत असा उल्लेख केला व चांगली कामे आपले सरकार पुढे नेईल असे बोलून दाखवले.
कुठल्याही यशस्वी देशाच्या विकासात धोरणात्मक सातत्य ही महत्त्वाची बाब असते. मोदींच्या भाषणात ‘रिपोर्ट कार्ड’चा उल्लेख होता. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचा प्रचार थांबला त्या दिवशी आपण पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांची भेट घेऊन आपल्यावर टाकलेली जबाबदारी कशी पार पाडली त्याचा अहवाल त्यांना सादर केल्याचे त्यांनी सांगितले व एकाअर्थी मंत्री, खासदारांना आपापल्या जबाबदारीचे भान राखण्याचे सुचवून तशी अपेक्षा असेल असे ध्वनित केले. १२५ कोटी लोकांनी एक एक पाऊल टाकल्यास देश १२५ कोटी पावले पुढे जाईल असे गणित मांडून सगळ्यांना सोबत येण्याचे निमंत्रण दिलेे. सरकार मागास-वंचितांच्या अपेक्षापूर्तीसाठी झटणार असल्याचे सांगून कुठल्याही घटकाने सरकारकडून भीती बाळगण्याचे कारण नाही असे स्पष्ट केले. यूपीए सरकार काळातील घोटाळे, जागतिक मंदी, रोजगार संधींचा अभाव, महागाई यामुळे देशाच्या सर्वच घटकांत एकप्रकारचे नैराश्य निर्माण झाले होते. काल मोदींनी लोकांना आशावादी आणि सकारात्मकतेने वावरण्याचे आवाहन केले. ही सकारात्मकता निर्माण करण्याचे व टिकवून ठेवण्याचे आव्हान मोदींना पेलावे लागणार आहे. मोदींच्या नेतृत्वावर देशाच्या बहुतेक भागांतून विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. दक्षिणेत चंद्राबाबू नायडू यांनीही मैत्रीचा हात दिला आहे, जयललिता यांनीही केंद्रातील सरकारला ‘सहकार्य’ बोलून दाखवले आहे. इशान्येतूनही मोदींना पाठिंबा व्यक्त झाला आहे. काश्मीरातही भाजप निवडून आला आहे. या परिस्थितीचा लाभ घेत येत्या पाच वर्षांत अंतर्गत मतभेद दूर सारून भारताला एक मजबूत राष्ट्र म्हणून विकसित करण्याची संधी मोदींकडे आहे. शिवाय शेजारील राष्ट्रांबरोबर विशेषत: पाकिस्तानबरोबरच्या संबंधांबाबत मोदी काय नवीन/वेगळी पावले उचलतात हेसुद्धा पाहण्यासारखे ठरेल. मोदी पंतप्रधान बनल्याशनंतर जुलैमध्ये ‘ब्रिक्स’ परिषद व सप्टेंबरमध्ये संयुक्त राष्ट्र संघाचे अधिवेशन होणार आहे. यावेळी चीन, रशिया, अमेरिका या देशांच्या नेत्यांशी मोदींचा राष्ट्रप्रमुख म्हणून पहिला संपर्क होईल. भारताच्या विदेश नितीबाबत मोदींच्या विचाराबाबत त्यावेळी सूतोवाच होईल. देश विकसित होताना आर्थिक आकांक्षापूर्तीची गरज आहे. पण त्याचबरोबर या देशाने गौरविलेली व संविधानाने स्वीकारलेली मूल्ये व संस्कार विस्मरणात जाणार नाहीत हेही पहावे लागेल. मोदींनी गौरव केलेल्या घटनेच्या शिल्पकारांचेही तेच स्वप्न होते. या देशाच्या भावी पंतप्रधानांनी भारताच्या ऐतिहासिक सेंट्रल हॉलमधून – जिथे पंडित नेहरूंचे स्वातंत्र्याच्या मध्यरात्री भाषण झाले, जिथे भारताचे संविधान तयार झाले – ‘जबाबदारीच्या पर्वा’ची सुरुवात केली आहे. आपल्या भाषणातून व्यक्त केलेले विचार आगामी काळात कार्यपद्धतीतून कृतीत आणण्याचे आव्हान मोदींच्या नेतृत्वासमोर आता आहे.

