- डॉ. मनाली महेश पवार
आयुर्वेदशास्त्रात पाणी पिण्याने आळशीपणा, मंदत्व, थकावट दूर होते. उलट्या, अपचन हे विकार नष्ट होतात आणि मन ताजेतवाने होते, समाधान मिळते, असे म्हटले आहे व पाण्याला अमृताची उपमा दिली आहे. मग अशा या अमृताचे पान योग्य प्रकारे नको का व्हायला?
सोशल मीडियावर बरेच शिक्षण न घेताच डॉक्टर, आयुर्वेदतज्ज्ञ बनले आहेत. सगळेच शास्त्राविना स्वघोषित तज्ज्ञ! रुग्ण तपासताना, रुग्णाच्या आहार-विहाराचा तपशील जाणताना बऱ्याच सोशल मीडियांवरच्या गोष्टी समोर आल्या. बरेच रुग्ण सकाळी उठल्या-उठल्या दोन ते तीन लिटर पाणी पितात. काही रुग्ण जेवताना अजिबात पाणी पित नाहीत. काही रुग्ण लठ्ठपणा कमी करण्यासाठी जेवणाअगोदर भरपूर पाणी पितात. काही रुग्ण दिवसातून पाच-सहा लिटर पाणी अगदी घड्याळावर वेळ लावून पितात. या सगळ्या समज-गैरसमजांबाबत आयुर्वेदशास्त्रामध्ये काय सांगितले आहे हे जाणून घेऊ…
संस्कृतमध्ये पाणी म्हणजे जल किंवा जीवन. पृथ्वीच्या उदरात निर्माण झालेला जीव. पाण्याशिवाय या ग्रहावर जीवन अशक्य आहे. साऱ्या प्रकारचे भरण- पोषण- सृजन हे पाण्यामुळेच शक्य होते. पृथ्वीच्या पृष्ठभागावरचा दोन तृतीयांश भाग पाण्याने व्यापलेला आहे.
आयुर्वेदशास्त्रामध्ये पाणी आणि त्याच्या उपयोगांबाबत संपूर्ण विवेचन दिलेले आहे. आकाश आणि पृथ्वी असे पाण्याचे दोन स्रोत आहेत. आकाशातून चार वेगवेगळ्या मार्गांनी पाणी आपल्यापर्यंत येते. नद्या, सागर यांच्या बाष्पीभवनानंतर पडणारा पाऊस, दव, वितळणारे बर्फ आणि गारा ही त्याची चार रूपं आहेत. जमिनीतून मिळणारे पाणी नद्या, विहिरी, तलाव, झरे अशा अनेक रूपांमध्ये दिसते.
कोणते पाणी आरोग्यास चांगले?
अनेक प्रकारच्या पाण्यामध्ये उपचाराचे वेगवेगळे गुणधर्म आहेत. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांतल्या पावसाचे पाणी शुद्ध आणि आरोग्याला उत्तम असते. वर्षाच्या अन्य काळात पडणाऱ्या पावसाच्या पाण्यात क्षार किंवा अन्य अशुद्धी असण्याची शक्यता असते. त्यामुळे ते शुद्ध मानले जात नाही. वेगाने वाहणाऱ्या नदीचे पाणी आरोग्याला चांगले आणि पचायला सुलभ असते.
सूर्य, चंद्र अथवा वाऱ्याच्या संपर्कात न आलेले- साठवलेले, तसेच अकाली आणि भर पावसाळ्यात पडणाऱ्या पावसाचे पाणी अशुद्ध मानले जाते. म्हणजेच साठवलेले प्लास्टिक बाटलीतील पाणी हे आरोग्यास हितकारक नाही. वातावरणात धूलीकण, कार्बनचे सूक्ष्म कण, कार्बन मोनॉक्साइड किंवा तत्सम प्रदूषके नेहमीच असतात. बऱ्याच कालावधीनंतर पाऊस पडतो तेव्हा ते सारे पहिल्या पावसाबरोबर खाली येतात. या अशुद्धी धुतल्या गेल्यानंतरच्या पावसाचे पाणी शुद्ध समजले जाते.
पाणी शुद्ध कसे करावे?
हल्लीच्या पाणी शुद्ध करणाऱ्या उपकरणांनी पाण्यातली प्रदूषके, कचरा, जीवाणू दूर होत असतील, पण पाणी उकळल्याशिवाय पाण्यात औषधी गुणधर्म येत नाहीत.
- अशुद्ध पाणी उकळून किंवा सूर्याच्या उष्णतेने तापवून शुद्ध करावे.
- सोने, चांदी, लोखंड किंवा स्फटिक तापवून सात वेळा पाण्यात बुडविण्यानेही पाणी शुद्ध होते.
- उकळून अर्धे, चतुर्थांश किंवा अष्टमांश केलेले पाणी पचण्यास अधिकाधिक सुलभ व जीवनदायी होते.
- पाण्यात माती किंवा अन्य काही अशुद्धी असली तर कमळाची मुळे, मोती, स्फटिक किंवा तुरटीच्या खड्याचा वापर करून ही अशुद्धी तळाशी स्थिर करून, मग साध्या स्वच्छ फडक्यातून पाणी गाळून घेता येऊ शकते.
शरीरात पाणी पचण्यासाठी किती तापमान हवे?
- अन्नाप्रमाणे पाणीही पचवण्यासाठी अग्नी, ऊर्जा लागते. थंड पाणी पचण्यासाठी सहा ते आठ तासांचा कालावधी लागतो, तर कोमट पाणी तासा-दीडतासात पचते.
- गरम करून थंड केलेले पाणी थंड पाण्याच्या निम्म्या वेळात पचते.
- उकळलेले पाणी सर्वात उत्तम. रोगप्रतिकार क्षमता कमी असल्यास किंवा काही आजार असल्यास नेहमी असेच पाणी प्यावे.
- थंड पाणी प्यायचेच असेल तर पाणी उकळून ते मातीच्या मडक्यात भरून ठेवावे, जेणेकरून भांड्याभोवतालच्या खेळत्या हवेने ते नैसर्गिकरीत्या थंड होईल.
- पाण्याला उष्णता मिळते तेव्हा त्याच्या रेणूंवर अग्नीचा संस्कार होतो. वहन होणे, शोषले जाणे आणि प्रवेश करणे अशा क्रिया असे पाणी अधिक प्रभावीपणे करू शकते.
- चंदन, वाळा, मंजिष्ठा, आले अशी द्रव्ये वापरून उकळलेले पाणी पिण्यास अधिक चांगले.
- सोने अथवा चांदीच्या छोट्या मुद्राही पाण्यासोबत उकळलेल्या चालतात.
- पाणी साठवण्यासाठी आणि पिण्यासाठी सोने, चांदी, तांबे किंवा मातीची भांडी उत्तम.
दोष संतुलनासाठी पाणी कसे तयार करावे?
- पाच ते दहा मिनिटे उकळलेल्या दोन लिटर पाण्यात चिमूटभर चंदनाचे चूर्ण, काही पुदिन्याची पाने आणि बडिशेपेचे काही दाणे टाकल्यास त्या पाण्याने वातविकाराचे संतुलन करता येते.
- उकळत्या पाण्यात गुलाबकळ्या, काही बडीशेपीचे दाणे आणि थोड्या वाळ्याच्या मुळ्या घातलेल्या पाण्याने पित्तदोषाचे संतुलन होते.
- उकळलेल्या पाण्यात तुळशीची चार-पाच पाने, ताज्या आल्याचा छोटा तुकडा आणि अर्धा चमचा लवंग घातल्यास कफाचे संतुलन होते.
पाणी कसे प्यावे?
- पाणी तोंड लावून प्यावे. म्हणजेच पाण्याला ओठ, दात व जीभ यांचा स्पर्श व्हायला हवा. तोंडातील ताळ पाण्यामध्ये मिसळल्यास पाण्याचे पचन योग्य तऱ्हेने होते. तसेच पाणी नेहमी बसून प्यावे.
पाणी कधी प्यावे?
याचे सोपे व शास्त्रीय उत्तर म्हणजे, जेव्हा आपल्याला तहान लागते तेव्हा पाणी प्यावे. आयुर्वेदशास्त्रानुसार निरोगी राहण्यासाठी मल, मूत्रादी वेगांचे धारण करू नये किंवा वेगाचे मुद्दामहून उदीरणही करू नये असे सांगितले आहे. तृष्णा (तहान) हाही एक वेग आहे. त्यामुळे तहान लागलेली असताना या वेगाचे धारण करू नये. अशावेळी पाणी प्यावे, पण तहान लागलेली नसताना उगाचच भरपूर पाणी पिऊ नये. सोशल मीडियावरचे ऐकून शरीराला यांत्रिक सवय लावू नये.
- पित्त प्रकृतीच्या लोकांना तहान जास्त लागते तेव्हा त्यांनी जास्त पाणी प्यावे. उन्हाळ्यात शरीरावाटे घाम जाऊन पाणी जाते तेव्हा उन्हाळ्यात जास्त पाणी प्यावे.
- कोरडी त्वचा आणि बद्धकोष्ठाची प्रकृती असलेल्यांनी थोडे अधिक पाणी प्यावे.
जेवताना पाणी प्यावे का?
- जेवताना पाणी प्यावे का पिऊ नये याबद्दल सोशल मीडियावर बरीच मतमतांतरे आहेत. आयुर्वेदशास्त्राप्रमाणे जेवताना मध्ये मध्ये पाणी पिणे हे अमृताप्रमाणे आहे. मध्ये मध्ये जेवताना पाणी पिल्यास पचनामध्ये उपयोग होतो.
- जेवणापूर्वी पाणी पिल्यास प्रदीप्त झालेला अग्नी मंदावतो किंवा विझतो, त्यामुळे पाण्याचे वा जेवणाचे व्यवस्थित पचन होत नाही.
- जेवणानंतर लगेच पाणी पिल्यास ते विषाप्रमाणे ठरते असे आयुर्वेदशास्त्रामध्ये सांगितले आहे. याने अग्नी पूर्ण विझतो. पचन मंदावते, मधुमेहासारखे विकार वाढीस लागतात. लठ्ठपणा वाढतो, सांधेदुखी, मूळव्याधासारखे रोग बळावतात.
- उन्हाळ्यात पदार्थ जास्त कोरडे असल्यास पित्त प्रकृतीच्या माणसांनी- ज्यांना जास्त तहान लागते त्यांनी- पाणी जेवताना मध्ये मध्ये प्यावेच प्यावे.
- जेवताना खूप पाणी पिणे किंवा अजिबात पाणी न पिणे हे पचनाला हानीकारक असते. ठराविक काळाने सतत थोडे थोडे पाणी पीत राहणे श्रेयस्कर.
- जेवण झाल्यानंतर पाऊणएक तासाने हवे तितके पाणी पिण्यास हरकत नाही.
पाणी किती प्यावे?
- उषःपान करणाऱ्यांनी चार ओंजळ म्हणजे साधारण 300 ते 350 मिली लिटर पाणी प्यावे.
- जेवताना मध्ये मध्ये पाणी प्यावे व जेवणानंतर एक तासाने.
- कोरडे पदार्थ खाताना पाणी प्यावे.
- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्या शरीराला जेवढी गरज आहे तेवढे म्हणजे तहान भागेपर्यंत पाणी प्यावे.
पाण्याचे प्रमाण योग्य आहे हे कसे ओळखावे?
- त्वचा कोरडी होत असेल, डोळ्यांची आग होत असेल, लघवीला कमी प्रमाणात होत असेल, ओठ कोरडे पडत असतील, हातापायांना क्रॅम्स येत असतील तर आपल्या शरीराला पाण्याची अजून जास्त गरज आहे हे जाणावे.
सकाळी उठल्यावर तांब्या-तांब्या पाणी प्यावे का?
- आयुर्वेदशास्त्रामध्ये कुठेच सकाळी उठल्यावर भरपूर पाणी प्यावे असे नमूद नाही. उषःपान हे उषःकाळी म्हणजे सूर्य उगवण्याची वेळ झाली आहे, पण सूर्य उगवलेला नाही अशा वेळी करावे आणि ते प्रमाण म्हणजे स्वतःच्या चार ओंजळी एवढेच पाणी प्यावे. सकाळी भरपूर पाणी पिल्याने अग्नी मंदावतो, चयापचयाच्या क्रिया मंदावतात. त्यामुळे उठल्यावर साधारण एक कप कोमट पाणी प्यावे आणि तेही चहाप्रमाणे.
आयुर्वेदशास्त्रात पाणी पिण्याने आळशीपणा, मंदत्व, थकावट दूर होते. उलट्या, अपचन हे विकार नष्ट होतात आणि मन ताजेतवाने होते, समाधान मिळते, असे म्हटले आहे व पाण्याला अमृताची उपमा दिली आहे. मग अशा या अमृताचे पान योग्य प्रकारे नको का व्हायला?