जलदगती निकालासाठी केंद्रांच्या संख्येमध्ये वाढ

0
11

गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका जलदगतीने तपासण्यासाठी यावर्षी उत्तरपत्रिका तपासणी केंद्रांची संख्या तीन वरून आठ केली आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी काल दिली. राज्यात दहावीच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी केवळ तीनच केंद्रे होती. त्यामुळे शिक्षकांना धावपळ करावी लागत होती. ही बाब लक्षात घेऊन यंदा उत्तर गोव्यात पेडणे, म्हापसा, कुजिरा आणि डिचोली येथे, तर दक्षिण गोव्यात केपे, कुंकळ्ळी, फोंडा आणि मडगाव येथे केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. अनिवार्य विषयांच्या पेपर तपासणीसाठी पुरेसे शिक्षक देण्यात आले. हिंदीच्या पेपर तपासणीसाठी राज्यात सुमारे 500 शिक्षकांची नियुक्ती केली आहे. या शिक्षकांना जवळच केंद्रे मिळाल्याने त्यांच्याकडून सकाळी 8 वाजल्यापासूनच पेपर तपासणीचे काम सुरू होत आहे. डिचोली केंद्रासाठी सध्या पुरेसे शिक्षक देण्यात आले आहेत. दोन दिवसांत तेथे अतिरिक्त सहा शिक्षक नियुक्त केले जाणार आहेत, असेही शेट्ये यांनी सांगितले.