– सुरेंद्र शेट्ये
रस्त्याच्या दुतर्फा पसरलेले हिरवे हिरवेगार गालिचे मन प्रसन्न करून सोडतात. ह्या वातावरणात पाण्यात बुड्या मारत आंघोळ करणार्या ‘बालांना’ न्याहाळणेही मोठे आल्हाददायक असते. एक तर पाण्यात सूर मारण्याचे आमचे स्वप्न स्वप्नच राहिलेले असते. मग असे हे इवलाले बाल – या बालांनो या रे या… मधले बाल जेव्हा जलाशयात उंचावरून झेपावतात ते डोळे भरून पाहण्यातली मजा काही औरच असते. पाण्यात मनसोक्त डुंबताना त्या मुलांना मिळणारा आनंद त्यांना पाहणार्यांनाही मिळून जातो.
……….
घन ओथंबुनी आल्यावर बरसतात त्या जलधारा वातावरणात एक प्रकारचा तजेला घेऊन येतात. हवेतला गारवा – तरारून येणारी जीवसृष्टी – धरित्री हिरवाकंच शालू नेसून – नद्या नाले तुडुंब भरून ओसंडून वाहू लागतात. कडेकपारींतून कोसळणारे जलप्रपात, झर झर वाहणारे निर्झर-हिरवाई – ती तुडवत जाणारी तरुणाई – फेसाळत उंचावरून कोसळणारे धबधबे… ते पाहण्यात तहानभूक हरपण्यातली मजा – तुषार अंगावर झेलण्यातली अनावर ओढ – तशात चाहूल लागते ती व्रतवैकल्ये अन् धार्मिक सणांनी पवित्र बनलेल्या श्रावण मासाची. एव्हाना हिरव्या हिरव्यागार गालिचांमधून रंगबिरंगी रानफुले डोकावू लागतात. सारी सृष्टी एक नवोद्गत सजून धजून यौवनांचे रंग उधळून राहते.
एव्हाना धो धो कोसळणार्या पावसाने थोडी उसंत घेतलेली असते. श्रावणातला घननीळा रिमझिम रिमझिम रेशीमधारा बरसत येतो. क्षणात मग शिरशिर शिरवे येते; क्षणात फिरूनी ऊनही पडते. तशातच क्षितिजावर सप्तरंगी इंद्रधनुष्यही उमटते अन् वन सर्व सुगंधित होऊन सर्वांची मने मोहवून टाकते. पिसारा नाचवीत बागडणारा मयूरही याच दिवसांत तर दर्शन देतो. थुई थुई नाचणार्या मोराचं विहंगम दर्शन दुरून होत असलं तरी अंगावरून मोरपीस फिरल्यागत अंग मोहरून जाते. अन् मग मनरूपी मोराचा पिसारा फुलून येतो. भावविभोर होण्याचे हेच ते दिवस. रस्त्याच्या दुतर्फा पसरलेले हिरवे हिरवेगार गालिचे मन प्रसन्न करून सोडतात. ह्या वातावरणात पाण्यात बुड्या मारत आंघोळ करणार्या ‘बालांना’ न्याहाळणेही मोठे आल्हाददायक असते. एक तर पाण्यात सूर मारण्याचे आमचे स्वप्न स्वप्नच राहिलेले असते. मग असे हे इवलाले बाल – या बालांनो या रे या… मधले बाल जेव्हा जलाशयात उंचावरून झेपावतात ते डोळे भरून पाहण्यातली मजा काही औरच असते. पाण्यात मनसोक्त डुंबताना त्या मुलांना मिळणारा आनंद त्यांना पाहणार्यांनाही मिळून जातो. भले मग पाहणार्याला पाण्याचा स्पर्श होत नसला म्हणून काय झालं? पाण्यात उड्या मारण्याचे प्रकार तरी किती? कुणी येतो हातपाय जवळ घेऊन एका हाताने नाक धरून अंगाची मुरचुंडी करून धाडकन पाण्यात कोसळतो. उडीसरशी उसळणारे पाणी बघणार्यांनाही भिजवून जाते. कुणी दुसरा येतो ‘ताडासन’च्या आविर्भावात पाय सरळ जोडून हात नमस्कारच्या स्थितीत डोक्यावर धरून पाण्यात ‘खलबली’ न माजवू देता सुळकन आत जातो. तिसरा कुणी येतो डोक्याने आत आत सूर मारून राहतो – एवढा खोलवर जातो की परत वर येईपर्यंत जिवात जीव नाही राहत पाहणार्याच्या. पोटावर पालथे पडून उड्या मारणे – पाठीवर उड्या मारणे – एकावर एक उड्या टाकत बॉम्ब फोडणे सारखा प्रकारही पाण्यावर प्रचंड हलचल निर्माण करून राहतो. एकेकाचे उत्स्फूर्त चिंब भिजलेले चेहरे – पाण्यातला त्यांचा किलबिलाट – उधळमाधळ – आदळआपट पाण्यातली – ओसंडून वाहणारी त्यांच्यामधली ऊर्जा – सळसळणारे ते चैतन्य – उत्साहवर्धक वाटते. त्यांची ती चाललेली जलक्रीडा तासनतास पहात रहावी असे वाटून जाते. थंडगार पाण्यातली त्यांची ती मुशाफिरी हर्षभरित करून जाते. पाण्याला जीवन म्हटलं जातं. कारण ते जीवनदायी असते. पाण्याची अथांगता – पाण्याची खोली – रंगहीन – जिसमें मिलाये लगे उस जैसा वाटणारे ते पाणी – त्याचा स्पर्श त्यातला ओढाळपणा खळाळणार्या त्यातल्या लहरी – उसळणार्या लाटा – फेसाळणार्या धडका सगळेच नावीन्यपूर्ण अन् त्यातली मुलांची जलक्रीडा ती तर त्याहूनही आल्हाददायक भावविभोर करून सोडणारी!
……………