जमीन विक्रीविरोधात काँग्रेसची मोहीम

0
11

राज्यातील भाजप सरकारच्या कार्यकाळात वाढलेल्या जमीन विक्रीच्या विरोधात जनजागृतीसाठी गोवा प्रदेश काँग्रेस पक्षाने राज्यव्यापी मोहीम कालपासून सुरू केली असून, नागरिकांना जमीन विक्रीबाबत विरोध नोंदवण्यासाठी ‘मिस्ड-कॉल’ हेल्पलाईन सुरू केली आहे. या हेल्पलाईनचा क्रमांक 8080963939 असा आहे, अशी माहिती गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी आयएमबी सभागृहात प्रमुख काँग्रेस कार्यकर्त्यांच्या घेतलेल्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत काल दिली.

भाजप सरकारच्या कार्यकाळात टीसीपी कायद्याच्या कलम 39-अ सारख्या तरतुदींचा वापर करून राज्यातील जमीन विकण्याचे आणि ती बाहेरील लोकांच्या हवाली करण्याचे प्रयत्न वाढले आहेत. राज्यातील जमीन वाचविणे हा सर्वात ज्वलंत मुद्दा बनला असून, आपली जमीन, अस्मिता आणि जीवनशैली यांच्या पद्धतशीर ऱ्हासाबाबत गोव्यातील जनतेमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे, असेही चोडणकर
म्हणाले.

अखिल भारतीय काँग्रेस समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने 17 ऑगस्ट 2026 रोजी गोवा विकायला देणार नाही, भाजपला जिंकायला देणार नाही, अशी मोहीम सुरू केली आहे. याच मोहिमेचा एक भाग म्हणून ही मिस्ड कॉल मोहीम सुरू करण्यात आली आहे.

काँग्रेस पक्षाने या मोहिमेचा एक भाग म्हणून 8080963939 हा एक नावीन्यपूर्ण मिस्ड-कॉल क्रमांक सुरू केला आहे. राज्यातील कानाकोपऱ्यातील नागरिक राज्यातील जमीन विक्रीच्या विरोधात आपला निषेध नोंदवू शकतात, असे गिरीश चोडणकर यांनी सांगितले.