जमीन घोटाळ्यातील मंत्र्याची हकालपट्टी न केल्यास नाव जाहीर करणार ः गिरीश

0
17

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील जमीन घोटाळा प्रकरणात गुंतलेल्या मंत्र्याची मंत्रिमंडळातून त्वरित हकालपट्टी करावी. अन्यथा, आपण १० दिवसात त्या मंत्र्याचे नाव जाहीर करणार आहे, असा इशारा गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे माजी अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी काल दिला.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडे राज्यातील जमीन घोटाळा प्रकरणात गुंतलेल्या मंत्र्याची हकालपट्टी करण्याची मागणी ४५ दिवसांपूर्वी केली होती. तथापि, मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी अद्याप काहीच कारवाई न करता त्या मंत्र्याला वगळलेले नाही. किंवा मुख्यमंत्र्यांनी याबाबत जाहीरपणे काही स्पष्टीकरण केलेले नाही. जमीन घोटाळा प्रकरणाची निःपक्षपाती चौकशीसाठी मंत्र्याला वगळण्याची मागणी केली होती, असे चोडणकर यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी याप्रकरणी कारवाई न केल्यास आपणाला त्या मंत्र्याचे नाव पुराव्यासह जाहीर करावे लागणार आहे. आगामी १० दिवसांत मंत्र्याची हकालपट्टी न केल्यास जमीन घोटाळा प्रकरणात गुंतलेल्या मंत्र्याचे नाव जाहीर केले जाणार आहे, असे चोडणकर यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या पहिल्या कार्यकाळात लैंगिक छळप्रकरणात एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागलेला आहे. आपणच सदर मंत्र्याचे नाव जाहीर केले होते. त्यामुळे सरकारची नाचक्की झाली होती, असेही चोडणकर यांनी म्हटले आहे.