मांद्रे मतदारसंघाचे आमदार जीत आरोलकर यांच्यावर धारगळ येथील जमीन घोटाळा प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या खटल्यावरील पुढील सुनावणी गुरुवार दि. 23 मार्च रोजी सकाळी 11 वाजता न्यायमूर्ती व्ही. के. माधव यांच्या आयोगासमोर होणार आहे. आरोलकर यांच्यावर रवळू खलप या अमेरिकेत राहणाऱ्या व्यक्तीची धारगळ-पेडणे येथील 1,48,800 चौरस मीटर एवढी जमीन हडप केल्याचा आरोप आहे. रवळू खलप हे या जमिनीचे सहमालक आहेत. यासंबंधी ॲड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी गेल्या 4 जुलै रोजी रवळू खलप यांच्यावतीने आरोलकर यांच्याविरुध्द जमीन घोटाळा प्रकरणातील विशेष तपास पोलीस पथकाकडे तक्रार नोंदवली होती. दरम्यान, जीत आरोलकर हे मांद्रे मतदारसंघातून मगो पक्षाच्या उमेदवारीवर निवडून आले असून, त्यांनी आपला पाठिंबा भाजप सरकारला दिलेला आहे.