जमीन घोटाळाप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी बोलावली आज उच्चस्तरीय बैठक

0
7

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील जमीन घोटाळा प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी सोमवार २७ जून २०२२ रोजी एक उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत राज्यात ज्या जमिनींना मालक नाहीत, जमिनींचे मालक हयात नाहीत किंवा स्थलांतरित झाले आहेत. त्या जमिनींबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

या उच्चस्तरीय बैठकीला महसूलमंत्री, मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, महसूल सचिव, एसआयटीचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. एसआयटीने जमीन घोटाळाप्रकरणी केलेल्या कामकाजाचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच, पुढील कृतीबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

एसआयटीने आसगाव येथील जमीन घोटाळाप्रकरणी केलेल्या तपास कामाचा उच्चस्तरीय बैठकीत आढावा घेतला जाणार आहे. एसआयटीने आसगाव म्हापसा येथील जमीन हडपप्रकरणी तपासाला सुरुवात केली आहे.

आतापर्यंत चौघांना अटक
या जमीन हडपप्रकरणी आतापर्यंत ४ जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी १८ जूनला विक्रांत बाळकृष्ण शेट्टी (मडगाव) याला अटक करून पाच दिवसांचा रिमांड घेतला होता. संशयित विक्रांत शेट्टी याला जामीन मंजूर झालेला असून सध्या कोलवाळ येथील कारागृहातील न्यायालयीन कोठडीत आहे. त्यानंतर महम्मद सुहैल (सांताक्रुझ पणजी) याला अटक करून पाच दिवसांचा रिमांड घेतला आहे. त्यानंतर पुरातत्त्व खात्याचे कर्मचारी धीरेश नाईक (बांदोडा फोंडा) आणि शिवानंद मडकईकर (मडकई) यांना अटक करून रिमांड घेण्यात आलेला आहे.

राज्यातील बनावट कागदपत्रांच्या साहाय्याने हडप करण्यात आलेल्या जमिनीचे मालक हयात नाहीत किंवा स्थलांतरित झाले आहेत, अशी माहिती संशयित आरोपींनी एसआयटीला दिली आहे. जमीन हडप करणार्‍या टोळक्याने बनावट कागदपत्रांच्या आधारे ७० च्या आसपास जमिनी हडप करून विकल्या आहेत. या बहुतांश जमिनींचे मालक हयात नाहीत किंवा जमिनींबाबत कायदेशीर सोपस्कार न करता स्थलांतरित झाले आहेत.