जमीन घोटाळाप्रकरणी आणखी काहींना अटक होणार : मुख्यमंत्री

0
11

राज्यातील जमीन घोटाळ्याची चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) आसगाव-म्हापसा येथील जमीन घोटाळा प्रकरणाच्या तपासाला गती दिली असून, या प्रकरणी आणखी काही जणांना अटक केली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल भाजप कार्यालयात एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना दिली.

एसआयटीने आसगाव येथील जमीन घोटाळा प्रकरणाच्या तपासाला गती दिली आहे. या प्रकरणी आतापर्यंत दोघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात गुंतलेल्या कुणाचीही गय केली जाणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

विदेशात असलेले गोमंतकीय नागरिकांच्या, तसेच हयात नसलेल्या जमीनमालकांच्या जमिनी बनावट कागदपत्रांच्या आधारे हडप करायला मिळणार नाही. नागरिकांनी जमीन हडपल्या प्रकरणी तक्रारी एसआयटी किंवा पोलीस स्थानकावर नोंद कराव्यात. सर्व तक्रारीची दखल घेऊन चौकशी केली जाणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सखोल तपास सुरू : महासंचालक
जमीन व्यवहारात घोटाळ्याची शक्यता असलेली प्रकरणे एसआयटीकडे पाठविली जात असून, एसआयटीकडून या प्रकरणाचा सखोलपणे तपास करून संबंधितांच्या विरोधात कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांनी काल दिली. बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन घोटाळा प्रकरणी तपास करणार्‍या एसआयटीवर कुठल्याही प्रकारचा दबाव नाही. मुख्यमंत्र्यांनी जमीन घोटाळा प्रकरणी गुंतलेल्यांची गय केली जाणार नसल्याचे सांगितले आहे. एसआयटीकडून जमीन घोटाळ्याची प्रकरणी यापुढे घडू नये, म्हणून आवश्यक सूचना केल्या जाणार आहेत, असेही सिंग यांनी सांगितले.

मोहम्मदला पाच दिवसांची कोठडी
एसआयटीने आसगाव येथील जमीन घोटाळा प्रकरणी अटक केलेल्या मोहम्मद सुहैल शफी याला पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश म्हापसा येथील प्रथम श्रेणी न्यायालयाने काल दिला. त्याला जमीन घोटाळा प्रकरणी २२ जूनला अटक करण्यात आली होती.