जमावासमवेत ३ डान्सबारची मोडतोड

0
150

आमदार मायकल लोबो आक्रमक
कळंगुट मतदारसंघाचे आमदार मायकल लोबो यांच्या नेतृत्वाखाली सुमारे ४०० लोकांच्या जमावाने काल दुपारी १ वाजण्याच्या सुमारास खोब्रावाडा येथील २ आणि उमतावाडा कळंगुट येथील १ मिळून तीन डान्स बारची मोडतोड केली. दरम्यान अनैतिक व्यवसायाविरुद्ध पोलिसांनी कारवाई न केल्यास सोमवारपासून उपोषण करण्याचा इशारा आमदार लोबो यांनी दिला आहे.काल दुपारी हा जमाव प्रथम आमदार मायकल लोबो यांच्या घरी जमा झाला. लोकांनी आमदारांना डान्सबार प्रकरणी धारेवर धरून तुम्ही कळंगुटमध्ये डान्सबार कसे चालविण्यास देतात, यावर तुमचा काहीच ताबा नाही का? असे सवाल करून लोकांनी आमदारांसह मोर्चा डान्सबारकडे वळविला. यावेळी संतप्त झालेल्या लोकांनी काही प्रमाणात डान्स बारची मोडतोड केली. हे तिन्ही डान्स बार गोव्याबाहेरील व्यावसायिकांचे आहेत. हे डान्स बार पाडत असताना डान्सबारचे मालक आमदार लोबो यांच्याकडे आले आणि त्यांनी हे फक्त रेस्टॉरंट आहे, डान्स बार नाही असे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी काहींनी आत जाऊन पाहिले असता ते डान्स बार असल्याचे उघडकीस आले.
यावेळी आमदार लोबो यांनी हे डान्स बार कळंगुटमध्ये चालविण्यास देण्यात येणार नाही असे स्पष्ट सांगून आपण लोकांबरोबर असल्याचे सांगितले. येथील युवक अशा डान्स बारमध्ये जाऊन वाममार्गाला लागले असल्याची आमदार लोबो यांची तक्रार आहे. दरम्यान, यासंबंधी कळंगुट पोलीस स्थानकाशी संपर्क साधून याप्रकरणाची माहिती करून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलीस उपनिरीक्षक पेडणेकर यांनी याप्रकरणी तपास चालू असल्याचे सांगून माहिती देण्यास टाळाटाळ केली.