जमशेदपूरला नमवून गोवा उपांत्य फेरीत

0
214
Manuel Lanzarote Bruno of FC Goa takes a kick during match 89 of the Hero Indian Super League between Jamshedpur FC and FC Goa held at the JRD Tata Sports Complex, Jamshedpur, India on the 10th February 2018 Photo by: Deepak Malik / ISL / SPORTZPICS

एफसी गोवा संघाने इंडियन सुपर लीगच्या चौथ्या मोसमाच्या उपांत्य फेरीत धडाक्यात प्रवेश केला. येथील जे. आर. डी. टाटा क्रीडा संकुलाच्या मैदानावर गोव्याने काल रविवारी जमशेदपूर एफसी संघाला ३-० असे गारद केले.

उपांत्य फेरीसाठी या दोन संघांमध्ये थेट चुरस होती. गोव्याला बरोबरी पुरेशी होती, तर जमशेदपूरला निर्णायक विजय अनिवार्य होता, पण अनुभवी गोलरक्षक सुब्रत पॉल याला घोडचुकीमुळे सातव्याच मिनिटाला लाल कार्डसह मैदान सोडावे लागले. मध्यंतरास गोव्याकडे एका गोलची आघाडी होती. फेरॅन कोरोमिनास (२९वे व ५१वे मिनिट) याने दोन , तर मॅन्युएल लँझारोटे (६९वे मिनिट) याने एक गोल केला.
गोव्याने १८ सामन्यांत नववा विजय मिळविला असून तीन बरोबरी व सहा पराभव अशा कामगिरीसह त्यांचे ३० गुण झाले. उपांत्य फेरीतील प्रवेश यापूर्वीच नक्की केलेल्या एफसी पुणे सिटीने सुद्धा १८ सामन्यांत नऊ विजय, तीन बरोबरी व सहा पराभव अशा कामगीरीसह ३० गुण मिळविले. पुण्याविरुद्ध गोवा घरच्या मैदानावर ०-२ असा हरला होता, पण पुण्यात त्यांनी ४-० असा विजय मिळविला. हीच सरस कामगिरी निर्णायक ठरली. याशिवाय गोव्याचा गोलफरक सरस ठरला. पुण्याचा गोलफरक ९ (३०-२१) असा होता. गोव्याचा गोलफरक १४ (४२-२८) असा सरस ठरला.

यंदा पदार्पण केलेल्या जमशेदपूरला निर्णायक लढतीत प्रोत्साहन देण्यासाठी २३ हजार ३८६ प्रेक्षक उपस्थित होते, पण अखेरीस त्यांना निराश व्हावे लागले. जमशेदपूरला १८ सामन्यांत सहावा पराभव पत्करावा लागला. सात विजय, पाच बरोबरी अशी कामगिरीसह त्यांनी २६ गुण मिळवून पाचवे स्थान मिळविले. एकूण विचार करता ही कामगिरी उल्लेखनीय ठरली.

सातव्याच मिनिटाला सामन्यातील निर्णायक क्षण आला. मॅन्युएल लँझारोटे याने चेंडूवर ताबा मिळविला होता. त्याचवेळी कोरोमिनास नेटच्या दिशेने जोरदार घोडदौड करीत असल्याचे त्याला दिसले. त्यामुळे त्याने लांबवर पास दिला. कोरोमिनासचा धोका ओळखून जमशेदपूरचा अनुभवी गोलरक्षक सुब्रत पॉल पुढे सरसावला. पेनल्टी क्षेत्राबाहेर उडी घेत त्याने चेंडू हाताने अडविला. पंचांनी हे स्पष्टपणे पाहिले. त्यामुळे त्यांनी सुब्रतला लाल कार्ड दाखविले. या निर्णयावर सुब्रत नाराज होता, पण त्याला मैदान सोडावे लागले. परिणामी संजीबन घोष याच्याकडे गोलरक्षणाची जबाबदारी देण्यात आली, तर एक खेळाडू कमी करण्यासाठी बिकाश जैरू याचा बळी देणे जमशेदपूरचे मुख्य प्रशिक्षक स्टीव कॉप्पेल यांना भाग पडले.

जमशेदपूरचा एक खेळाडू कमी झाल्यामुळे एरवी आक्रमक खेळ करणार्‍या गोव्याचे पारडे आणखी जड झाले. २९व्या मिनिटाला त्यांनी खाते उघडले. उजव्या बाजूने ह्युगो बौमौस याने चाल रचत सेरिटन फर्नांडिसला पास दिला. सेरिटनने चेंडूवर ताबा मिळवित पेनल्टी क्षेत्रात घोडदौड केली आणि पलीकडील बाजूला चेंडू मारला. हा चेंडू अडविण्यासाठी जमशेदपूरच्या टिरीने घसरत केलेला प्रयत्न अपयशी ठरला.

त्याचवेळी घोषला परिस्थितीचा अंदाज आला नव्हता. त्यामुळे जमशेदपूरच्या मोकळ्या पडलेल्या नेटमध्ये कोरोमिनासने चेंडू मारला. कोरोमिनास याचा हा मोसमातील १७वा गोल ठरला. उत्तरार्धात गोव्याची सुरवात आक्रमक होती. ५१व्या मिनिटाला लँझारोटेने उंच मारलेला चेंडू प्रतिस्पर्ध्याच्या बचाव फळीवरून पुढे गेला. कोरोमिनासने कौशल्य पणाला लावत त्यावर नियंत्रण मिळवित अप्रतिम फटका मारला. १८ मिनिटांनी मग कोरोमिनासने डावीकडून चाल रचत दिलेल्या पासचे लँझारोटेने सोने केले.
७५व्या मिनिटाला गोव्याचा गोलरक्षक नवीन कुमार याने पेनल्टी क्षेत्राबाहेर चेंडू डाव्या दंडाने ढकलला. त्यामुळे त्याला लाल कार्डसह मैदान सोडावे लागले. गोव्याने लक्ष्मीकांत कट्टीमणी याला पाचारण करताना प्रोणय हल्दरला बाहेर पाठवून एक खेळाडू कमी केला. आता दोन्ही संघांचे प्रत्येकी दहा खेळाडू मैदानावर होते, पण याचा फायदा घेणे जमशेदपूरच्या आवाक्याबाहेरचे ठरले.

वास्तविक जमशेदपूरने घरच्या मैदानावर सुरवात सकारात्मक केली होती. दुसर्‍याच मिनिटाला त्यांनी थ्रो-इन मिळविला. वेलिंग्टन प्रिओरीने पेनल्टी क्षेत्रात चेंडू टाकला, पण त्याचा सहकारी आंद्रे बिके याने प्रतिस्पर्ध्याला फाऊल केले. पुढच्याच मिनिटाला बिकेने फ्री-किकवर मारलेला चेंडू बाहेर गेला. सहाव्या मिनिटाला जमशेदपूरने पुन्हा गोव्याच्या क्षेत्रात मुसंडी मारली. इझु अझुकाने आगेकूच करीत पेनल्टी क्षेत्रात चेंडू मारला, पण गोव्याच्या अहमद जाहौह याने आपले क्षेत्र सुरक्षित राखले. जमशेदपूरने अशाप्रकारे गोव्यावर दडपण आणले होते, पण सुब्रतच्या घोडचुकीमुळे त्यांना फटका बसला.