जन्मशताब्दी ः नामवंतांची

0
43
  • – डॉ. सोमनाथ कोमरपंत

असामान्य स्त्रीपुरुषांनी कालपटलावर आपल्या कर्तृत्वाची तेजस्वी नाममुद्रा उमटविली आहे. त्यासाठी त्यांचा आपण सामाजिक कृतज्ञतेच्या पोटी गौरव करतो. आमच्या पिढीपुरते हे भावस्मरण नसते. त्यांनी हा दिवा येथवर आणला तो नव्या पिढीच्या हातांत देण्यासाठी.

विराट विश्‍वचक्राचा फेरा अविरत चाललेला आहे. उत्पत्ती-स्थिती-लय या त्याच्या अवस्था आहेत. पृथ्वीतलावर जल, जंगल, जमीन आणि वृक्षराजी आहे. येथे अनेक प्राणी, पक्षी, जलचर, जीवजंतू आणि मानव वस्ती करून आहे. प्राणिमात्र आपापल्या परीने जीवन जगत असतात. आपली उपजीविका करतात. त्यांचे जीवन, जीवनशैली, दुर्बलांवर मात करून सबलांनी वर्चस्व प्रस्थापित करणे ही प्रक्रिया सहस्रावधी वर्षांपासून चालत आलेली आहे. त्यांच्या या धडपडीकडे पाहताना, विविधता अनुभवताना मनुष्यप्राणी विस्मयाने भारला जातो. या वसुंधरेचे प्रभावी आणि प्रमाथी रूप, सामर्थ्य मानवी मनाला थक्क करणारे आहे. सृष्टिनिर्मितीचे रहस्य मानवाला अजून उलगडलेले नाही. पृथ्वीच्या या चक्राला सारथ्य करणारे घटक तेवढेच सामर्थ्यवान आहेत. असीम आकाश, ग्रह, तारे, नक्षत्रे आणि त्याचा क्षितिजविस्तार अमर्याद आहे. पर्यावरणाचे अभेद्य कवच या विश्‍वचक्राला प्राप्त झाले आहे. मनुष्यप्राणी या सर्वांचा कुतूहलाने शोध घेत आहे. आपण अमर्त्य नाही, आपले पृथ्वीगोलावरचे जीवन क्षणभंगुर आहे याची त्याला पुरेपूर जाणीव आहे. म्हणून काही त्याची जीवनेच्छा क्षीण झालेली नाही. आपल्याला लाभलेली बुद्धिमत्ता, तर्कशक्ती, कल्पनाशक्ती, भावनाशालित्व आणि सर्जनशीलता या बळावर विश्‍वचक्राच्या समान्तरप्रक्रियेतून आपण आपली धडपड चालविली आहे. तिला आपण ‘संस्कृती’ या संज्ञेने संबोधतो. संस्कृती म्हणजे काय हे नेमके काय हे सांगणे अवघड आहे. प्रख्यात मानववंशशास्त्रज्ञ डॉ. इरावती कर्वे यांनी अन्य संशोधकांप्रमाणेच संस्कृतीची व्याख्या सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तिला अनुसरून आपल्या विचारांची विस्ताराने मांडणी केली आहे. त्या म्हणतात, ‘प्रगमनशील, प्रयत्नवादी अशा मानवप्राण्याचे पृथ्वीवरील उन्नत जीवनाचे चित्र म्हणजे संस्कृती.’ त्यापुढे असेही म्हणतात, ‘मनुष्यसमाजाची डोळ्यांना दिसणारी भौतिक वस्तुरूप निर्मिती व डोळ्यांना न दिसणारी, पण विचारांना आकलन होणारी मनोमय सृष्टी म्हणजे संस्कृती.’ संक्षेपाने आणि सुलभतेने सांगायचे झाल्यास आदिकालापासून आजमितीला मनुष्यमात्राने केलेल्या धडपडीची गोळाबेरीज, असे त्यांच्या विचारांचे प्रतिपादन आहे.

आपल्याला या पार्श्‍वभूमीवर विचार करायचा आहे तो उन्नत माणसांच्या जन्मशताब्दीचा. मानवाचे आयुष्यही सर्वसाधारणतः शंभर वर्षांचे मानले जाते. आपण जन्मशताब्दी साजरी करतो ती असामान्य कर्तृत्व दाखविलेल्या व्यक्तिमत्त्वांची. मानवांमधील महामानवांची. कुणी विचारेल, तर मग हे नमनालाच घडाभर तेल कशाला? तर त्याला एक प्रयोजन आहे. शंभर वर्षांचा कालखंड अमर्याद विश्‍वचक्राचा एक अल्पसा अक्ष आहे. या अंशमात्र कालखंडातील त्या-त्या व्यक्तीचे एवढे स्तोम कशाला? त्याचे उत्तर असे आहे की असामान्य स्त्री-पुरुषांनी कालपटलावर आपल्या कर्तृत्वाची तेजस्वी नाममुद्रा उमटविली आहे. त्यासाठी त्यांचा आपण सामाजिक कृतज्ञतेच्या पोटी गौरव करतो. आमच्या पिढीपुरते हे भावस्मरण नसते. त्यांनी हा दिवा येथवर आणला तो नव्या पिढीच्या हातांत देण्यासाठी. आपल्या भारतातील थोर तत्त्वज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांनी म्हटले आहे, ‘मॅन डाईज; बट् ह्यूमॅनिटी लिव्हज्.’ मानव मरतो, पण मानवता जगते. ऐहिक जगतात जगताना असामान्य माणसांनी आपल्या कर्तृत्वरूपाने इतिहासावर आपल्या पाऊलखुणा उमटविलेल्या असतात. हे त्यांनी आपले नाव मागे उरावे म्हणून केलेले नसते, तर समर्पणशीलतेने आणि निःस्वार्थ बुद्धीने केलेले असते. पण जे भव्य, उदात्त, मंगल आणि श्रेयस्कर आहे ते मागे राहतेच. ऋग्वेदाच्या १० व्या मंडलात अशा अमर्याद शक्ती असलेल्या व्यक्तींविषयी म्हटले आहे ः
सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्षः सहस्रपात|
स भूमिं सर्वतः स्पृत्वाऽत्चतिष्ठद्यशाङ्‌गुलम्‌॥
जीवनाची क्षेत्रे अनेक आहेत. वाङ्‌मय, चित्रकला, नाट्य, नृत्य, गायन, वादन, वास्तुशिल्पकला, मूर्तिकला, शिल्पकला, लोकसाहित्य आणि लोकपरंपरा आणि आता नव्याने ज्यांचा प्रवेश झाला अशा कित्येक हस्तकला इत्यादी कलांनी आणि त्यांची निष्ठेने साधना करणार्‍या कलावंतांनी आपले राष्ट्रीय जीवन समृद्ध केले आहे. ‘दुर्लभं भारते जन्म’ या वचनात सार्थ अभिमान अभिव्यक्त झाला आहे. ‘आसेतुहिमाचल’ आणि कच्छपासून कामरूपपर्यंत आपल्या खंडप्राय राष्ट्राने या क्षेत्रांत मोठा वारसा निर्माण केलेला आहे. एक संगीतकला घेतली तरी त्यात अभिजात, सुगम आणि लोकसंगीत या शाखांत प्रवीण व्यक्ती प्राचीन काळापासून समकाळातही कार्यरत आहेत.

राजकारण, समाजकारण, अर्थकारण, शिक्षण आणि पत्रकारिता ही पंचसूत्री समाजधारणेला बळ आणि दृढ अधिष्ठान देत असते. स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्योत्तर नवनिर्माणपर्वात या क्षेत्रांना नेतृत्व देणारी दिग्गज मंडळी हिरिरीने वावरली म्हणून आपण आज स्वातंत्र्याची मधुर फळे सेवन करीत आहोत. विसाव्या शतकाच्या मध्यावधीला मिळालेल्या स्वातंत्र्यामुळे सारा मनू बदलून गेला आहे. विज्ञानक्षेत्रात आपली गतिमान पावले पडत आहेत. तंत्रज्ञानाने तर जीवनाची सर्व क्षेत्रे व्यापून टाकली आहेत. विसाव्या शतकाच्या दृढ कोनशिलेवर एकविसाव्या शतकात पावशतकाच्या उंबरठ्यापर्यंत वाटचाल करणार्‍या भारताची ‘आशियातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र’ म्हणून गणना होत आहे. या पार्श्‍वभूमीवर या सर्व क्षेत्रांत समर्पित भावनेने कार्य करणार्‍या व्यक्तींचा स्मृतिजागर करण्याची संधी आपल्याला लाभत आहे. २०१० या संवत्सरात मराठी साहित्यक्षेत्रातील जवळजवळ पस्तीस व्यक्तिमत्त्वांची जन्मशताब्दी आपण साजरी केली होती. जनमानसात आदराचे स्थान असलेल्या आणि सर्जनशील साहित्याच्या क्षेत्रात लक्षणीय कार्य केलेल्या प्रज्ञावंतांची आणि प्रतिभावंतांची जन्मशताब्दी आपण साजरी केली. पु. ल. देशपांडे, ग. दि. माडगूळकर, सुधीर फडके, डॉ. सरोजिनी बाबर यांची स्मृती आपण अलीकडेच जागविली. १९२२ साली कविवर्य वसंत बापट, प्रा. ग. प्र. प्रधान, कविवर्य शंकर रामाणी इत्यादिकांची स्मृती महाराष्ट्रात, बृहन्महाराष्ट्रात आणि गोव्यात नुकतीच साजरी झाली.

आता ज्यांची जन्मशताब्दी सुरू झालेली आहे, त्यांत व्रतस्थ पत्रकार आणि सिद्धहस्त साहित्यिक यदुनाथ थत्ते आहेत. कुशल संसदपटू, निष्णात घटनातज्ञ आणि झुंजार वृत्तीचे स्वातंत्र्यसेनानी बॅरिस्टर नाथ पै आहेत. एवढ्याने त्यांची ओळख पूर्ण होणार नाही. ‘वक्ता दशसहस्रेषु’ म्हणता येईल अशी अमोघ वाणी लाभलेले ते प्रभावी वक्ते होते. ग्रंथप्रेमी आणि रसिकाग्रणी होते. त्यांचा संसदेतील स्पष्टवक्तेपणा, निर्भय वृत्ती आणि चिकित्सक अभ्यास सर्वज्ञात आहे. जगातील अनेक राज्यघटनांचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. अटीतटीच्या प्रसंगीचे त्यांचे श्रुतयोजनकौशल्य वाखाणण्यासारखे होते. मतभेद असले तरी मनभेद नसावेत असे त्यांना प्रांजळपणे वाटायचे. पंडित जवाहरलाल नेहरूंशी तात्त्विक मतभेद व्हायचे; पण पं. नेहरू त्यांना सकाळच्या अल्पोपहारासाठी निमंत्रण द्यायचे. बॅ. नाथ पै त्यांच्याकडे आवर्जून जायचे. त्यांच्या विविध विषयांवर गप्पा-गोष्टी व्हायच्या. झेकोस्लोव्हाकिया आणि हंगेरी या देशांतील रशियन सैनिकी कारवायांविरुद्ध त्यांनी लोकसभेत भाषणे केली होती, ती उल्लेखनीय होती. त्यांची महत्त्वाची भाषणे ‘लोकशाहीची आराधना’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध झाली होती.

गोवामुक्तीसाठी रोममध्ये पोर्तुगीज वकिलातीसमोर त्यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करण्यात आली होती. बेळगावच्या प्रश्‍नावर त्यांनी सातत्याने लढा दिला. त्यांचे जीवनच संघर्षमय होते. महाविद्यालयीन शिक्षण घेताना भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात त्यांनी धडाडीने भाग घेतला होता. सर्वसामान्य जनतेविषयी त्यांना कणव होती. त्यांनी आयुष्यभर त्यांच्यासाठी आपली वाणी आणि प्रखर बुद्धिमत्ता यांचा उपयोग केला. कोकण रेल्वे व्हावी हा त्यांचा ध्यास होता. कोकणविकासासंबंधी ते सदैव तत्पर होते.

बॅ. नाथ पै यांच्या व्यक्तिमत्त्वाला रसिकतेची किनार होती. कारावासात असताना कुसुमाग्रजांच्या ‘क्रांतीचा जयजयकार’ या कवितेच्या आशयाने त्यांना मनोधैर्य दिले. १८ जून १९४६ मध्ये मडगावला डॉ. राममनोहर लोहिया यांनी गोवामुक्ती आंदोलन छेडले. त्यावेळी बा. भ. बोरकरांनी ‘स्वातंत्र्याची सिंहगर्जना’ ही कविता लिहिली. तिच्यातील ः
त्रिवार मंगल वार आजला त्रिवार मंगल वार
स्वातंत्र्याची सिंहगर्जना अतां इथें उठणार
या ओळी बॅ. नाथ पै यांना आवडायच्या. १९ डिसेंबर १९६१ रोजी गोवा मुक्त झाल्यावर त्यांनी त्या ओळी उद्धृत केल्या. तोही मंगळवार होता.
१९७० मध्ये महाबळेश्‍वर येथे झालेल्या विभागीय मराठी साहित्यसंमेलनाचे ते उद्घाटक होते. १८ जानेवारी १९७१ मध्ये बेळगाव येथे वयाच्या अवघ्या ४९ व्या वर्षी त्यांना मृत्यूने गाठले.
यदुनाथ थत्ते आणि बॅ. नाथ पै हे साने गुरुजींच्या ‘धडपडणार्‍या मुलां’मधील अग्रणी होते. दोघांची जडणघडण राष्ट्रसेवादलात झाली होती. बालवयातच यदुनाथजींवर राष्ट्रप्रेमाचा संस्कार झाला. अन्यायाविरुद्ध झगडण्याची जिद्द निर्माण झाली. स्वातंत्र्याच्या आंदोलनात भाग घेतल्यामुळे त्यांचे महाविद्यालयातील विज्ञानशाखेचे शिक्षण खंडित झाले. १९४२ च्या ‘छोडो भारत’ आंदोलनात त्यांनी भाग घेतला. कारावासात त्यांना साने गुरुजींचे सान्निध्य लाभले. त्यांनी तेथे विनोबाजींची ‘गीता प्रवचने’ ऐकली.

‘चंदनाचे हात पायही चंदन’ ही तुकारामांची वाणी यदुनाथजींच्या व्यक्तिमत्त्वाला तंतोतंत लागू पडेल. त्यांचे हात नेहमीच क्रियाशील आणि शुभंकर राहिले. साधनशुचितेचे व्रत त्यांनी जन्मभर आचरले. भारतवर्षाचा ‘आत्मा’ कळावा म्हणून पायांना भिंगरी लावून त्यांनी अखंडितपणे भ्रमंती केली. ‘आपला मान आपला अभिमान’ आणि ‘मस्तकी हिमालय अंतरंगी अंगार’ ही पुस्तके तिचीच फलश्रुती होय. आंतरभारतीचा मंत्र त्यांनी ‘साधना’ साप्ताहिकाच्या माध्यमातून सर्वत्र सर्वांपर्यंत नेऊन पोचविला. ‘मीरा बहन’ या पुस्तकाबद्दल त्यांना ‘गांधी शांती प्रतिष्ठान’कडून स्वामी प्रणवानंद साहित्य पुरस्कार प्राप्त झाला. १९५६ ते १९८२ पर्यंतच्या प्रदीर्घ काळात ‘साधना’ साप्ताहिकाचे संपादक म्हणून त्यांची विधायक सेवा जनमानसासमोर आहे. वास्तविक ती सविस्तरपणे सांगणे गरजेचे आहे. कुमारवयीन वाचकांसाठी त्यांनी उपक्रमशीलता दाखविली. युवाशक्तीलाही योग्य ते वळण त्यांनी लावले. ऐन आणीबाणीत जेव्हा अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आली तेव्हा त्यांनी बाणेदारपणा प्रकट केला. जगाच्या अभ्युदयासाठी झटणार्‍या शास्त्रज्ञांची त्यांनी पुस्तकरूपाने ओळख करून दिली. ‘प्रकाश वाटणारा फकीर’ आणि ‘चालता बोलता आशेचा किरण’ असे त्यांना उद्देशून गौरविले जाते. अबोल आणि निःसंग वृत्तीने कार्य करणे हा त्यांचा स्थायी भाव.
द्वितीय महायुद्धोत्तर कालखंडात मराठी साहित्यात नवी संवेदनशीलता आली. या परिवर्तनशीलतेचे अध्वर्यू आणि वाङ्‌मयीन संस्कृतीचे निस्सीम उपासक म्हणून प्रा. श्री. पु. भागवत यांचे नाव गौरवाने घ्यावे लागेल. ‘मौज’ साप्ताहिक आणि ‘सत्यकथा’ या वाङ्‌मयीन स्वरूपाच्या मासिकांतून आत्मभान आणि समाजभान यांची तरफ सांभाळून त्यांनी ‘साहित्ययज्ञ’ मांडला. वि. स. खांडेकर, वि. द. घाटे, श्री. बा. रानडे या जुन्या पिढीतील मातब्बर लेखक- कवींपासून ‘जहाज’कार बाळकृष्ण प्रभुदेसाईंपर्यंत जुन्या-नव्या पिढीमध्ये त्यांनी साहित्यसेतू निर्माण केला. ‘मौज प्रकाशन गृहा’तर्फे दर्जेदार पुस्तकांचा मानदंड निर्माण केला. ‘साहित्याची भूमी’ त्यांनी किती निष्ठेने आणि वृत्तिगांभीर्याने नांगरली होती याचा स्वतंत्रपणे विचार करावा लागेल.

या नववाङ्‌मयीन कालखंडात प्रा. गंगाधर गाडगीळ, प्रा. के. ज. पुरोहित (शांताराम), जी. ए. कुलकर्णी या लखलखत्या तार्‍यांनी ‘सत्यकथा’मधून सकस कथालेखन केले. कथा- कविता- कादंबरी- समीक्षा- लोकसाहित्य- रंगभूमी- चित्रपटसृष्टी या सार्‍याच प्रकारांना ‘सत्यकथा’मधून सामावून घेतले गेले. प्रा. श्री. पु. भागवत, प्रा. राम पटवर्धन यांच्याकडे कालभान होते, म्हणून वाङ्‌मयीन अभिसरणाचा नवा प्रवाह मराठीत सुरू झाला. उपरोल्लिखित नामवंत कथाकारांची जन्मशताब्दी लगोलग यावी हा एक योगायोग. त्यांच्या कथासाहित्याचा समग्रतेने मागोवा घेण्याचे हे स्थान नव्हे. म्हणून त्यांच्या नामोल्लेखावर थांबावे लागते. पण एक, हा स्मृतिजागर न होता, वर्षभर अभ्यासाचा विषय व्हावा. त्यातून निश्‍चित नवे काही निघेल. साक्षेपाने आणि समतोलपणे जुनी परंपरा आणि नवे साहित्य यांची व्यासंगपूर्ण समीक्षा करणारे मराठीचे नामवंत प्राध्यापक गुरुवर्य डॉ. व. दि. कुलकर्णी यांचीही जन्मशताब्दी सुरू होत आहे. या आनंददायी पर्वणीला या सर्व प्रज्ञावंतांना आणि प्रतिभावंतांना विनम्रतेने वंदन!