जत्रोत्सवातील ‘जुगार’ कायमचे बंद पाडा

0
74

रमेश सावईकर

गोमंतभूमी ही देवदैवतांची भूमी. त्यामुळे येथील लोक धार्मिकवृत्ती उपासक नि भागवत, भक्तीभाविक. गावोगावीची मंदिरे हे एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल. देवदेवतांचे वार्षिक उत्सव मोठ्या भक्तिभावाने, परंपरागत साजरे होतात. सारा गाव त्यात सहभागी होतो. गावामधील एकतेचे मनोज्ञ दर्शन त्या निमित्ताने घडते.

गोव्यातील मंदिरे ही धार्मिक श्रद्धास्थानेच नव्हेत, तर गावची सामाजिक केंद्रे ठरली आहेत. पोर्तुगीज काळातले गावचे गावपणमंदिराच्या ठिकाणी व्हायचे. मोठ्या देवस्थानांत वार्षिक जत्रोत्सवांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. या जत्रांना त्या संबंधित देवतांचे भक्तगण नव्हे तर अन्यत्र विखुरलेले कुलदेवता उपासक आपली वार्षिक हजेरी लावतात.

गोव्यातील लहान गावात, खेड्यात ग्रामदेव किंवा ग्रामदेवतांचे छोटेखानी मंदिर हे असणारच. मोठ्या देवस्थानासारखे वार्षिक जत्रोत्सव नसले तरी छोटा उत्सव हा पूर्वांपार परंपरागत चालत आलेला आढळतो. अशा उत्सवात दशावतारी नाट्यप्रयोग हे हमखास ठरलेलेच. विशेशतः उत्तर गोव्यातील महाराष्ट्र राज्याच्या सीमेलगत असलेल्या पेडणे, बार्देश, डिचोली व सत्तरी तालुक्यातील अनेक गावांत दशावतारी नाट्यप्रयोग परंपरागत आढळतात. कोकण भागातील मोचेमाड गावची मोचेमाड दशावतार नाट्यकंपनी ही प्रसिद्ध. या कंपनीचे नाट्यप्रयोग अजूनही न चुकता साखळी येथील श्री पांडुरंग देवस्थानच्या वार्षिक चैत्री उत्सवात पाच किंवा सहा रात्री होतात.

दशावतारी नाट्यप्रयोगाची वेळ ही सर्वसाधारणपणे रात्रौ बारानंतर ते पहाटेपर्यंत. गावचे लोक आवडीने तन्मयतेने हे नाट्यप्रयोग पूर्णपणे पाहायचे. या उत्सव प्रथेबरोबरच एक वाईट प्रथाही पडून गेली. ती म्हणजे अशा उत्सवाच्या ठिकाणी जुगारखेळ चालायचा. तो आजही चालतो, चालूच आहे. धार्मिक स्थळी एका बाजूने भगवंताची भक्ती नि दुसर्‍या बाजूने जुगारासारखा अनिष्ट प्रकार, योग्य नव्हे असा विचार सध्या पुढे येऊ लागला आहे. ही फार चांगली बाब आहे.

जुगाराचे पट चक्क उत्सवाच्या ठिकाणी मंदिराच्या प्रांगणात चालतात. त्यांना पोलीस कारवाईची भीती वाटत नाही. कारण हे जुगार पट मांडणारे लोक पोलिसांशी संधान बांधून फिक्सिंगकरून जुगाराला सुरवात करतात. काही जुगार व्यसनाधीन लोक न चुकता गावातील खेडेगावांतील उत्सवांना हजेरी लावतात, ती जुगारभक्तीपोटी. तेथील ग्रामदेवदेवतांच्या भक्तीसाठी नव्हे.

हा जुगार उत्सवाच्या ठिकाणी अशा थाटात चालतो की काही विचारू नका. गावातील शालेय मुले कुतूहलापोटी या जुगाराच्या पटाकडे धावतात. गावातील बरेच युवकही त्यात सहभागी होतात. उत्सवाच्या ठिकाणी जुगार चालता कामा नये असा विचार कोणी मांडला तर त्याविरुद्ध युवाशक्ती एकत्र येते. गावचे वयस्क, जाणते मंडळीही त्याबद्दल काही बोलण्याचे धाडस करीत नाहीत. मौन धारण करून गप्पच राहणे अधिक पसंत करतात. कोणी त्याला विरोध केला तर त्यांच्यावरच तुटून पडायचे. हा सारा प्रकार कोठेतरी थांबायला हवा.

धार्मिक उत्सवाच्या ठिकाणी चालणार्‍या गैरप्रकारांना पूर्णपणे पायबंद घातला गेला पाहिजे, कारण यातून ना धार्मिक भावनेची जपणूक, ना भगवत भक्तीची संवर्धना! उलटपक्षी नवीन पिढी जुगाराच्या व्यसनात ओढली जाऊन बरबाद होण्याची भीतीच अधिक संभवते.

देवस्थान समित्यांनींही अधिक कडक धोरण स्वीकारले पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत देवस्थानचे उत्सव चालतात त्या ठिकाणी देवस्थानच्या आसपास जुगारास पूर्णपणे प्रतिबंध घालण्यासाठी ठोस पावले उचलायला हवी. स्थानिक पोलीस अधिकार्‍यांशी संपर्क साधून असे प्रकार घडू नये यासाठी आवश्यक उपाय घेण्याची मागणी करून ती धसास लावायला हवी. वास्तविक सरकारने हे प्रकार घडू नयेत म्हणून प्रत्यक्ष कारवाई करण्याची गरज आहे. कायदे आहेत. पण त्यांची अंमलबजावणी होत नाही. गावच्या काही ठराविक लोकांना जुगार हवा म्हणून तो वार्षिक ग्रामउत्सव ठिकाणी चालू द्यायचा हे बरोबर नव्हे. त्यासाठी लोकजागृती होण्याची खरी गरज आहे. काही गावांतून ही लोकजागृती होऊ लागली आहे, ही चांगली बाब आहे.

सत्तरी तालुक्यात जत्रोत्सवांत जुगाराला बंदी यावी म्हणून संघटना स्थापन करण्यात आली आहे. या संघटनेला अभिनंदनीय असे यश मिळाले आहे. उत्तर गोव्यातील डिचोली, बार्देश, पेडणे या तालुक्यांतील सर्व गावांतून अशा प्रकारची लोकजागृती व्हावी म्हणून समविचारी लोकांनी एकत्र येऊन संघटना स्थापन कराव्यात. जत्रोत्सवात व उत्सवात जुगाराला पूर्णपणे बंदी घालणे हे सरकारच्या,पोलिसांच्या नव्हे तर लोकांच्या हाती आहे. जुगारातून पैसा मिळतो म्हणून ठराविक मूठभर लोकांच्या दबावाला बळी न पडता लोकांनी भावी पिढीच्या भल्यासाठी एकत्र येऊन ही अनिष्ट प्रथा बंदच पाडावी.

देवस्थान समित्यांनाही जुगारासारखे गैरप्रकार धार्मिक स्थळी चाललेले नको आहेत. पण त्यांना पाठिंबा देण्याऐवजी विरोध करण्याचे प्रकार सर्रास घडतात आणि सगळी मंडळी आपल्याच गावातील आहेत म्हणून देवस्थान समिती, सदस्य व पदाधिकार्‍यांनाही गप्प राहण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही. गावच्या उत्सवाच्या ठिकाणी कोणत्याही अनिष्ट प्रकाराला थारा मिळता कामा नये. वार्षिक उत्सवाच्या निमित्ताने गावातील मंडळी एकत्र येते ती आपली सामुदायिक भक्ती करण्यासाठी. संगीत, नाट्य आदी कलांना प्रोत्साहन मिळावे, स्थानिक कलाकारांना कला प्रदर्शनासाठी वाव मिळावा हा निव्वळ, प्रांजळ उद्देश ठेवून कार्यक्रमाचे आयोजन व्हावे. त्यातून पैसा कमावण्याचा वाईट उद्देश असू नये.

ज्या वाईट प्रथापरंपरा पडलेल्या आहेत, असतील त्यांना मूठमाती देणे अत्यावश्यक आहे. नव्या पिढीसाठी आपण काय देणार आहोत? हा विचार करण्यासारखा महत्त्वपूर्ण प्रश्‍न आहे. विविध ठिकाणची जी देवदेवता स्थाने आहेत, त्यांना फार मोठा इतिहास आहे. ऐतिहासिक पार्श्‍वभूमी लाभलेल्या या स्थळांचे धार्मिक, सांस्कृतिक महत्त्व आणखी किती व कसे वाढेल त्यादृष्टीने विचार व्हायला हवा. जुन्या पिढीतील लोकांनी या स्थळांचे ऐतिहासिक महत्त्व जपलेच. नि त्याचबरोबर तेथील पावित्र्यही ढळू दिले नाही. ही बाब आजच्या तरुण पिढीने विसरता कामा नये.

पाश्‍चिमात्य संस्कृतीचा पगडा आजच्या युवा पिढीवर बसू पाहत आहे. त्यामुळे त्या पाश्‍चिमात्य भोगविलासाकडे ढळलेल्या संस्कृतीतल्या पठडीतले प्रकारकृतीत आणण्यात काही गैर नाही, असा समज आजची पिढी करीत आहे. त्यामुळे धार्मिक उत्सवाच्यावेळी भजन, कीर्तन कशाला? त्यापेक्षा ऑर्केस्ट्रा किंवा डान्स सारखे कार्यक्रम चांगले. अशी धारणा बनत चालली आहे. वरकरण त्यातून फक्त मनोरंजनापुरताच भाग जाणवत असला तर त्यामुळे नीतीमूल्यांचा र्‍हास होत आहे, याची जाणीव होणे आवश्यक आहे.

या एकूण पार्श्‍वभूमीवर गावच्या देवस्थानी उत्सव प्रित्यर्थ धार्मिक विधीकार्यक्रमांना अधिक स्थान देण्याची गरज वाटते. गावोगावच्या देवळांनी, देवस्थानांनी गावच्या उत्सव परंपरा पूर्वांपार जतन केल्या आहेत. त्यांचे नीट जतन, संवर्धन व्हावे. त्यात विद्रुपीकरण होऊ नये. अनिष्ट प्रथापरंपरा निर्माण करू नये. काही अवाजवीगैर प्रथा असतील तर त्यांना खतपाणी न घालता त्यांना पूर्णपणे मूठमाती द्यावी.