देशाचे बारावे पंतप्रधान बनण्याचे भाग्य लाभलेले इंद्रकुमार गुजराल यांच्या निधनाने भारतीय राजकारणातील एका परिवर्तनशील कालखंडाचा जवळचा साक्षीदार काळाच्या पडद्याआड गेला. आर्थिक उदारीकरणाचे वारे सुरू होण्यापूर्वीचा हा कालखंड. जागतिकीकरणाची पूर्वपीठिका या कालखंडामध्ये घडत असताना भारतामध्ये मात्र राजकीय अस्थिरता देशाला वेढून राहिलेली होती. अशावेळी काही काळ देशाच्या पंतप्रधानपदाची धुरा स्वीकारून गुजराल यांनी या अस्थिरतेमध्ये देशाचे तारू सावरून धरण्याची धडपड केली. शेजारील राष्ट्रांशी चालत आलेले पिढीजात वैर आणि त्यातून बिनसलेले संबंध सुधारून संपूर्ण दक्षिण आशियामध्ये शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न आजवर ज्या मोजक्याच नेत्यांनी प्रामाणिकपणे केले, त्यामध्ये गुजराल यांचे नाव घ्यावे लागेल. पंतप्रधानपदाची त्यांची कारकीर्द तशी छोटीच. पण तत्पूर्वी परराष्ट्रमंत्री म्हणून त्यांनी दक्षिण आशियामध्ये शांतता आणि मैत्री प्रस्थापित करण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी सुचवलेली सैद्धान्तिक पंचसूत्री भारतीय परराष्ट्र धोरणाचा भाग बनून राहिली होती. गुजराल यांच्या या पंचसूत्रीची नंतरच्या काळात बदलत्या प्रादेशिक परिस्थितीत टरही उडवली गेली, परंतु तरीही पाकिस्तानसह सर्व शेजारील राष्ट्रांशी भारताचे मैत्रिपूर्ण संबंध प्रस्थापित व्हावेत असा गुजराल यांचा प्रयत्न होता.
स्वतः गुजराल यांचा जन्मच मुळी लाहोरचा. ऊर्दू साहित्याची त्यांना मनापासून आवड. ते स्वतः निवांतपणा मिळाला तर शेरोशायरीही लिहायचे. गेल्या वर्षीच निधन झालेल्या त्यांच्या पत्नी शीला या साहित्यिक. त्यांची तर पुस्तकेही प्रसिद्ध झालेली आहेत. इंद्रकुमारांचे बंधू प्रसिद्ध चित्रकार. त्यामुळे साहित्य, कलांनी समृद्ध झालेले एक संयमी, परिपक्व व्यक्तिमत्व अशीच इंद्रकुमार गुजराल यांची प्रतिमा होती. मात्र, आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेकदा ही प्रतिमा डागाळणारे निर्णय राजकीय तडजोडीपोटी त्यांना घ्यावे लागले. लालूप्रसाद यादवांना चारा घोटाळ्यात वाचवण्यासाठी त्यांनी सीबीआयचे तत्कालीन संचालक जोगिंदर सिंग यांना तेथून हटवले. या उपकारांची परतफेड म्हणून लालूंनी पुढे जेव्हा जनता दलाची साथ सोडून राष्ट्रीय जनता दलाचा संसार मांडला तेव्हा गुजराल यांचे सरकार न पाडता संयुक्त आघाडीमध्येच राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला. उत्तर प्रदेशमध्ये कल्याणसिंग यांचे सरकार उलथवून लावण्यासाठी तेथे राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस गुजराल यांच्या सरकारने केली होती. तत्कालीन राष्ट्रपती के. आर. नारायणन यांनी त्या अध्यादेशावर सही करण्यास नकार दिला होता. पुढे अलाहाबाद उच्च न्यायालयानेही सरकारच्या त्या निर्णयावर ताशेरे ओढले. गुजराल यांच्या राजकीय जीवनात असे अनेक प्रसंग आले. इंदिरा गांधींच्या कारकिर्दीत माहिती व प्रसारण मंत्री असताना संजय गांधींशी त्यांचे बिनसले होते. पुढे कॉंग्रेस सोडून ते जनता दलात गेले. व्ही. पी. सिंग यांच्या सरकारमध्ये परराष्ट्रमंत्री झाले. देवेगौडांकडे पंतप्रधानपद आले तेव्हाही परराष्ट्र मंत्रीपदासाठी गुजराल यांचेच नाव पुढे आले. कॉंग्रेसच्या पाठिंब्याने देवेगौडांचे सरकार आले तेव्हाही गुजराल यांच्याकडे परराष्ट्रमंत्रीपद चालून आले. आखाती युद्धाच्या काळामध्ये सद्दाम हुसेन यांची घेतलेली भेट, काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी मुफ्ती महंमद सईद यांच्या कन्येचे रुबैय्या सईदचे तथाकथित अपहरण केले, तेव्हा तिच्या सुटकेच्या बदल्यात पाच दहशतवाद्यांना सोडून देतानाही मध्यस्थी करण्यासाठी गुजराल यांनाच पाठवले गेले होते. गुजराल यांचे सगळेच निर्णय बरोबर होते असे म्हणता येणार नाही. त्यांच्याकडून अनेकदा चुकीचे निर्णय घेतले गेले. राजकीय दडपणांना ते बळी पडले, परंतु तरीही देशातील एक सुसंस्कृत नेता म्हणून इंद्रकुमार गुजराल यांची छबी कायम राहिली. पंतप्रधानपदावर ते योगायोगानेच आले होते. त्यामुळे त्यांच्या कामगिरीचा विशेष ठसा काही त्यांना देशावर उमटवता आला नाही. पण तरीही देशातील सुसंस्कृत नेत्यांच्या नामावलीत इंद्रकुमारांचे नाव निश्चितपणे आदराने घेतले जाते. ९३ वर्षे वय, प्रकृतीची गुंतागुंत, गेले काही दिवस सुरू असलेले डायलिसिस आणि अलीकडे लावण्यात आलेला व्हेंटिलेटर यामुळे गुजराल यांचे जाणे अनपेक्षित नाही, आणि त्यांच्या जाण्याने पोकळी वगैरे निर्माण होईल एवढे मोठे कर्तृत्वही त्यांना दाखवता आले नव्हते, पण तरीही त्यांच्या जाण्याने एक भली व्यक्ती काळाच्या पडद्याआड गेल्याची हळहळ मात्र नक्कीच व्यक्त होईल. एक जंटलमन नेता आपल्यातून निघून गेला आहे.

