– अंतरा भिडे
आपल्या मुलांच्या गुणांची तुलना रियालिटी शोच्या पारड्यात करणं कितपत योग्य आहे? एवढ्या कोवळ्या वयात गुणांची तुलना करणंच मुळात योग्य आहे का? ही स्पर्धा हेल्थी आहे का? या अशा स्पर्धेचा मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर किती प्रमाणात विपरीत परिणाम होतोय, याची कल्पनाही नाही करू शकणार आपण.
………..
हरयाणाच्या गुगल-बॉय कौटिल्यासंबंधी बरीच जोरात चर्चा चालली होती. एवढ्या सार्या गोष्टी खरंच लक्षात ठेवत असेल तो? कशी काय लक्षात राहतात एवढी सारी नावं त्याला? एवढ्या लहान वयात केवढी प्रसिद्धी मिळाली त्याला नाही? भारतातल्या सगळ्या न्यूज वाहिन्यांवर त्याच्या मुलाखती प्रसारित झाल्या… रोज दोन-तीन मुलाखती होत असतील त्याच्या… तारांबळ उडत असेल… नाही? कमाई होत असेल… ए… किती थकत असेल नाही बिचारा? एवढुस्सा आहे… प्रश्न ऐकून जाम वैताग येत असेल त्याला… आठवणीत असलेलं विसरून जायची पाळी येत असेल…
मलाही खूप दया आली होती त्या कौटिल्याची… प्रत्येक वाहिनीवर त्याच्या एक-दोन मुलाखती पाहून झाल्या होत्या… सुरुवातीला तो खूप उत्साहात होता… मजेशीर हालचाली करत होता… कौतुक वाटत होतं. पण नंतर नंतर तो एवढा दमून गेला होता ना, की अजून एकही उत्तर देण्याची इच्छा दिसत नव्हती त्याच्या चेहर्यावर… खरंच, बिचारा झाला होता अगदी… त्याच्या हुशारीचा सगळे जणू आपला टीआरपी वाढवायला गैरफायदाच घेत होते… आता त्याचं ह्यापुढील आयुष्य बघायलाच नको… कौतुकासोबत येणार्या उच्च अपेक्षांचा मार त्याच्या खांद्यावर, बरोबरच्या मुलांच्या मनातली ईर्ष्या सहन करणं आलंच… इतर मुलांसारखं जगणं… त्याचं बालपण इतक्या कोवळ्या वयात त्याच्याकडून काढून घेतल्यासारखं वाटत होतं… जगाचं ज्ञान त्याला बरंच होतं; पण सत्याची प्रचितीही लवकरच त्याला होणार आहे हे कळत होतं…
कितीतरी लहान मुलांसाठीचे रियालिटी शो… टेलंट हंट टीव्हीवर चालू असतात… त्यात अगदी कोवळ्या कोवळ्या वयाची मुलं भाग घेतात… जिंकतात, बरीच कौतुकंही करून घेतात… हरतात, ढसाढसा रडतातही… कित्येक मुलं ऑडिशन मधनंच बाहेर होतात. काही अंतिम फेरीपर्यंत पोचतात आणि घसरतात. त्यांचं सुख आणि दु:ख जिंकणं आणि हरणं ह्यापुरतंच सीमित होऊन जात असतं.
काय काय बोलायला लावतात त्यांना शोचं शूटिंग चालू असताना? लहान मुलांच्या तोंडी अगदी त्यांच्या वयाला न शोभणारी वाक्यं घुसवतात… त्यांच्या वयाला न शोभणारे कपडे घालायला लावतात, वयाला न शोभणारी गाणी… नाच तर अगदी कुणालाही न शोभणार्या गाण्यांवर असतात… मग त्या गाण्यांसाठी चेहर्यावर विचित्र हावभाव, विचित्र अंगविच्छेप… टीआरपी वाढताना, ह्या सगळ्या गोष्टीमुळे त्या बालमनावर किती विपरीत परिणाम होतो, हे काय त्यांना कळत नाही? पण तरीही… या रियालिटी शोच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षांचं एक मोठ्ठ महाजाल ते विणत असतात… या महाजालात दर वर्षी, दर सीझन मधे, नवेनवे चेहरे गुरफटत जाताना दिसतात. फक्त जिंकण्याच्या आशेने हजारो-लाखो मधमाश्या पोळ्याच्या भोवती घोंघावतात… पण त्या लाखोंपैकी एकालाच त्या पोळ्यात शिरण्याची संधी मिळते… फक्त एकालाच…
खरं पाहायला गेलं तर फार कमी मुलांना मनापासून रस असतो ह्या स्पर्धांमध्ये भाग घेण्याचा… हा अट्टहास खरं तर त्यांच्या पालकांचा असतो. स्पर्धा पालकांमध्ये असते, चुरस लागलेली असते हे दाखवण्याची, की आपलाच मुलगा गुणी आहे. आपलंच पालकत्व थोर आहे. आपणच फक्त नीट जोपासतोय मुलांमधल्या कलागुणांना. मग अशा स्पर्धेत मुलांनी जिंकावं म्हणून त्यांना वर्ग लावायचे… गाण्याचे, नाचाचे… त्यांचे हाल-हाल होईपर्यंत तालमी घ्यायला लावायच्या… त्यांच्या एनर्जीसाठी अनैसर्गिक पेयं, खाद्य… त्यांच्या कपड्या-लत्यांवर अवाढव्य खर्च… शाळेतून आल्यानंतर दोन मिनिटं विश्रांती घ्यायला वेळ नसतो मुलांना… शाळेचा अभ्यास सांभाळत हे सारं करावं लागतं.
मान्य आहे, हे युगच स्पर्धेचं आहे. इथं काहीही मिळवायला, आपल्यासारख्याच हजारोंना हरवत, मागं टाकत पुढं जावं लागतं. रात्रंदिवस उन्हातान्हात रांगेत उभं रहावं लागत असतं, मधे-मधे थकलेल्या मुलांना बाइटसाठी बेशुद्ध पडावं लागत असतं. कितीकडे ओळखी दाखवाव्या लागतात, कित्येकदा तर ओळखी नसूनही त्या पटवाव्या लागतात, वशिले लावावे लागतात. ऑडिशन मध्ये कितीही चांगलं गाता वा नाचता येत असलं, तरी माघार घ्यावी लागत असते. हे काही फक्त जिंकण्यासाठी नाही हं, ह्यातून किती प्रसिद्धी वाढत असते… कितीतरी चाहते मिळत असतात… दरवर्षी त्याच शोसाठी ऑडिशन देणारे कितीतरी असतात. कधीच निवडलं जात नाहीत. अशांना आपण पाहून-पाहून ओळखू लागतो की नाही? काही पालकांचं भागत असेल ह्याच्यावरच समाधान… नाहीतर का आपल्या मुलाला त्याच-त्या ऑडिशनसाठी पाठवलं असतं त्यांनी? काही पालकांचं रसायन वेगळं असतं. त्या शोचं परीक्षण करणारी व्यक्ती आपली आवडती असली, म्हणजे आपल्या पोराला पाठवायचं ऑडिशनला. निवडला गेलाच पोर, तर नंतर कधी मंचावर येऊन बोलायचं – अमुक-अमुक जी, मैं बहुत बडा फैन हूँ आपका| सिर्फ आपसे मिलने के इरादे बच्चे को ऑडिशन देने भेजा था| मग त्या व्यक्तीच्या चेहर्यावरचा आनंद असा ओसंडून वाहत असतो… परीक्षक म्हणतात बहुत टैलंटेट है आपका बच्चा… मजा आहे की नाही?
बरोबर जाहिरातीच्या आधी ते कुणालातरी रडताना दाखवतात. आपल्याला असं वाटून जातं, की आज तो आउट होणार… पण नंतर कळतं की तो रडतोय आपला सोबती आउट झाला आणि त्याची आठवण येणार म्हणून… किती नाटकी आणि फसवं आहे ना हे सगळं? कधी-कधी वाटतं, ह्या रियालिटी शोमध्ये वास्तव एक टक्काही नसेल… सगळं दिग्दर्शक आपल्याला हवं तसं करून घेत असतात… आपल्याला हवी ती वाक्य वदवून घेत असतात… अगदी परीक्षकांकडूनही…. कित्येक वेळा, एखाद्याच्या गुणांच्या नाही, तर सौंदर्याच्या बळावर त्याची निवड होत असते. गाण्याच्या शोमधे तितकासा चांगला न गाणारा, पण अगदी चुणचुणीत, भरपूर बोलणारा मुलगा पुढं पोचत असतो. अशा शो मध्ये भाग घेणार्या मुलाची काय धारणा होत असेल? त्याला वाटत असेल, प्रत्येक स्पर्धा ही अशीच फसवी असते. प्रत्येक परीक्षक असाच कुणाच्यातरी हाताखालचा गुलाम असतो. ह्या जगात कलेची, गुणांची कदर नाही, आहे ती फक्त पैशाची आणि दिखाव्याची. जगाचं हे असंच रूप त्यांना दाखवलं जातंय.
आपण काय, फक्त टीव्हीसमोर बसून बघतो, हळहळतो… जास्तीत जास्त एखाद्या आवडत्या स्पर्धकाला मोबाइलद्वारे वोट वा मत पाठवतो, आणि मोबाइल कंपनीला फायदा करून देतो.
अशा प्रत्येक स्पर्धेगणिक करोडो खर्च होतात, आणि लाखोंची स्वप्नं चकाचूर होतात. फक्त आपण सिलेक्ट नाही झालो म्हणून, आई-बाबांकडून रागावून घ्यावं लागतं म्हणून, त्यांची स्वप्नं पूर्ण नाही करू शकलो म्हणून, ही इवली इवली पोरं कित्येकदा आत्महत्या करतानाही दिसतात… खरं सांगा… आपल्या मुलांच्या गुणांची तुलना रियालिटी शोच्या पारड्यात करणं कितपत योग्य आहे? एवढ्या कोवळ्या वयात गुणांची तुलना करणंच मुळात योग्य आहे का? ही स्पर्धा हेल्थी आहे का? या अशा स्पर्धेचा मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर किती प्रमाणात विपरीत परिणाम होतोय, याची कल्पनाही नाही करू शकणार आपण. टीव्ही वाहिन्या टीआरपी वाढवण्याच्या नादात रियालिटीमधल्या वास्तवालाच विसरत आपल्या देशाचं भविष्य असलेल्या कोवळ्या जीवांच्या रक्ताचे घोट घेताहेत, हे मात्र नक्की.
………..