‘छावा’ सिनेमाचा ट्रेलर गेल्या आठवड्यात रिलीज झाला. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई यांचा लेझीम नृत्य करत असल्याचे एक दृश्य दाखवण्यात आले आहे. याशिवाय संभाजी महाराजांचे नृत्यही पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील राजकारणी आणि शिवप्रेमींकडून या दृश्याला कडाडून विरोध झाल्यानंतर निर्माते व दिग्दर्शकांनी ‘छावा’मधील ते दृश्य काढून टाकले आहे. महाराष्ट्राचे मंत्री उदय सामंत यांनी काल ही माहिती दिली.
छावा चित्रपटाच्या ट्रेलरचे सर्वांनीच भरभरून कौतुक केले; पण यामधल्या नृत्यावर राजकीय क्षेत्रातील काही मान्यवरांनी नाराजी व्यक्त केली आहे. याशिवाय चित्रपटातील काही संवाद देखील नेटकऱ्यांना खटकले आहेत. सिनेमॅटिक लिबर्टीचा वापर करून चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न असल्याची टीका करण्यात आली. तसेच राज्य सरकारनेही काही दृश्यांना आक्षेप घेतला होता.
आक्षेपार्ह दृश्ये दाखवल्यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असून, छत्रपती संभाजीराजांचा अवमान करणारे चित्रपट दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर, निर्माते आणि कलाकार यांच्या विरोधात कारवाई करावी, अशी मागणी काही संघटनांकडून झाली होती. या यानंतर लक्ष्मण उतेकर यांनी मोठा निर्णय घेतला असून, सिनेमातला संभाजी महाराजांचा नृत्य करतानाचा भाग व दृश्य काढून टाकले आहे.

