छत्तीसगडमध्ये 10 नक्षलींना सुरक्षा दलाकडून कंठस्नान

0
4

छत्तीसगडमधील गरियाबंदमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी तब्बल 10 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले आहे. यात तब्बल एक कोटी रुपयांचे बक्षीस असलेला मनोज उर्फ मोडेम बालकृष्ण याचाही समावेश आहे. सुरक्षा दलाच्या जवानांनी बुधवारपासून आपले हे ऑपरेशन सुरू केले होते. गरियाबंद भागात काही नक्षली लपल्याची गुप्त माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. याच माहितीच्या आधारे सुरक्षा दलाच्या जवानांनी ही कारवाई केली. तब्बल 10 नक्षलवाद्यांचा खात्मा झाल्यामुळे नक्षल संपवण्याच्या मोहिमेला आणखी बळ मिळाल्याचे म्हटले जात आहे.

गुप्त माहिती मिळाल्यानंतर लपलेल्या नक्षल्यांचा खात्मा करण्यासाठी बुधवारी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत छत्तीसगडचे पोलीस, केंद्रीय राखीव पोलीस दल, कोबरा बटालीयन आदी सामील होते. या मोहिमेत ठाक करण्यात आलेला मोडेम बालकृष्ण हा ओडिसा राज्य समितीचा वरिष्ठ सदस्य होता. गरियाबंद हा नेहमीच नक्षलवाद्यांचा गड राहिलेला आहे. इथे नेहमी नक्षल्यांच्या कारवाया होत असत. याच भागात अनेकदा सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झालेली आहे.

मनोज उर्फ मोडेम बालकृष्ण हा नक्षलवादी संघटनेतील एक वरिष्ठ नेता होता. त्याला पकडून देणाऱ्याला किंवा त्याची माहिती देणाऱ्याला तब्बल 1 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आलेले होते.