चौथ्या गोवा लघुपट महोत्सवात ‘ब्लर्ड लाइन्स’ ठरला सर्वोत्कृष्ट

0
101

चौथ्या गोवा लघुपट महोत्सवात जुही राजवानी आणि वेदांश श्रीवास्तव दिग्दर्शित ‘ब्लर्ड लाइन्स ’ लघुपटाला सर्वोत्कृष्ट लघुपटाचे पारितोषिक प्राप्त झाले. शुभंकर एकबोटे यांना ‘टू कप्स ऑफ टी’ या लघुपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचे पारितोषिक मिळाले. याच लघुपटाला सर्वोत्कृष्ट लघुपटाचे व सर्वोत्कृष्ट पोस्टर डिझाईनचे पहिले पारितोषिक मिळाले. दिग्दर्शनाचे दुसरे पारितोषिक ‘ब्लर्ड लाइन्स’ लघुपटाला देण्यात आले. ‘अनुभूती’ या लघुपटासाठी निहार सप्रे यांंना सर्वोत्कृष्ट पटकथालेखनाचे पारितोषिक मिळाले.

याच लघुपटासाठी शिवा गणेश भालेकर यांना सर्वोत्कृष्ट संकलनाचे पारितोषिक मिळाले. तांत्रिक विभागामध्ये ‘गोंदण विठुरायाचे’ या लघुपटासाठी चिन्मय भारद्वाज यांना सर्वोत्कृष्ट कॅमेरामनचे पारितोषिक मिळाले. ‘रॅबी अँड टॉच्यु’ हा हृषिकेश जाधव दिग्दर्शित लघुपट सर्वोत्कृष्ट ऍनिमेशनपट ठरला. जगदीश तडाखे यांना ‘दि फॉर्च्युन’ या लघुपटासाठी सर्वोत्कृष्ट संकल्पनेचे पारितोषिक मिळाले.

मराठी चित्रपट परिवार, अदित्य प्रॉडक्शन्स आणि ए. के. फिल्म्सतर्फे आयोजित या महोत्सवाचे गोवा स्टेट लायब्ररी येथे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ साहित्यिक रमेश वेळुसकर, विल्सन वर्ल्ड अकादमीचे व्यवस्थापकीय संचालक उदय ममाणे, निर्माते अदित्य दाढे, अनिल काकडे, संयोजक पद्माकर नष्टे, योगेश बारस्कर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. दोन दिवसीय या महोत्सवात विविध देशांतील शंभरहून अधिक लघुपट दाखविण्यात आले. यांपैकी सर्वोत्कृष्ट दहा लघुपटांना विविध विभागांमध्ये पारितोषिके देण्यात आली.