विरोधकांची आग्रही मागणी; अग्नितांडवाच्या मुद्द्यावरून गदारोळ; नाईटक्लबला बांधकाम परवाना देणाऱ्याचा तपास सुरू
हडफडे येथील ‘बर्च बाय रोमियो लेन’ या नाईटक्लबमधील अग्नितांडव प्रकरणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी चौकशीअंती सादर केलेला अहवाल राज्य सरकारने विधानसभेत सादर करावा, या मागणीसाठी काल विरोधी पक्षांच्या आमदारांनी सभापतींच्या आसनासमोरील हौदात धाव घेतली व घोषणा दिल्या. यावेळी उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी ‘बर्च बाय रोमियो लेन’ला 1999 साली परवाना देण्यात आला होता आणि त्यावेळी तो कुणी दिला होता त्याची चौकशी केली जात असल्याचे स्पष्ट केले.
हडफडे येथील ‘बर्च बाय रोमियो लेन’ या नाईट क्लबला आग लागून या त्यात 25 जण मृत्यूमुखी पडण्याची जी दुर्घटना घडली होती, त्याची चौकशी दंडाधिकाऱ्यामार्फत चालू आहे, अशी माहिती गृहमंत्री या नात्याने बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल विधानसभेत दिली. मिठागरात उभारण्यात आलेल्या या नाईटक्लबच्या इमारतीचे बांधकाम हे 1999 साली करण्यात आले होते, असे यावेळी त्यांनी सांगितले व त्यासाठीचा बांधकाम परवाना तेव्हा कोणी दिला होता याचा तपास करण्याचे काम चालू आहे. या दुर्घटनेसाठी जबाबदार असलेल्या सर्वांवर कडक कारवाई होणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
विधानसभेत काल प्रश्नोत्तराच्या तासाला काँग्रेसचे आमदार कार्लुस फेरेरा यांनी विचारलेल्या त्यासंबंधीच्या तारांकित प्रश्नाचे उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली.
‘बर्च बाय रोमियो लेन’ या नाईट क्लबमध्ये झालेल्या आगीच्या दुर्घटनेसंबंधीचा आपला प्रश्न मांडताना कार्लुस फेरेरा यांनी बर्च बाय रोमियो लेन हा सर्वे क्रमांक 151/0 मध्ये होते आणि मिठागराची ही जमीन खाजन शेतीची असून, तिचा समावेश हा सीआरझेड जमिनीत आहे की नाही, असा प्रश्न केला.
यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, सुरिंदर खोसला नामक इसमाने 1999 मध्ये या नाईटक्लबचे बांधकाम केले होते. हे बांधकाम बेकायदेशीर असून, त्यावेळी त्यांना या बांधकामासाठी कोणी परवाना दिला होता याचा तपास केला जात आहे. 2011च्या किनारपट्टी विभाग व्यवस्थापन नकाशात सदर जमिनीचा समावेश झालेला नाही. त्यामुळे सदर जमीन ही सीआरझेडमध्ये येत नाही.
मिठागर असलेल्या या जमिनीचा समावेश हा निवासी विभागात कुणी केला त्याचा तपास चालू आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळासह ज्या ज्या कुणाचा या गैरकारभारात हात आहे, त्यांना यापूर्वीच निलंबित केले आहे. जमीनमालक सुरिंदर खोसला हा बेपत्ता असून त्याच्याविरुध्द ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
यावेळी आरोप करताना विरोधी पक्षनेते युरी आलेमांव हे म्हणाले की, बर्चमधील आग दुर्घटनेत निष्पाप लोकांचे बळी गेलेले आहेत. त्यामुळे ज्या लोकांमुळे ही दुर्घटना घडली, त्या सर्वांना शिक्षा ही व्हायलाच हवी. पैशांनी भरलेल्या बॅगा घेऊन बेकायदशीररित्या बांधलेल्या ‘बर्च बाय रोमियो लेन’ या नाईटक्लबला परवाने देण्यात आलेले असून, सर्व आरोपींना शिक्षा व्हायला हवी, अशी मागणी देखील आलेमाव यांनी केली. अद्याप कित्येक नाईटक्लब बेकायदेशीरपणे चालू असल्याचा आरोपही त्यांनी केला.
बर्च दुर्घटनेचा इत्यंभूत तपास केला जात असून, या दुर्घटनेला जबाबदार असलेल्यांपैकी एकाचीही सुटका होणार नसून, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
आरोपांवर मुख्यमंत्री म्हणाले की…
युरी आलेमाव यांच्या आरोपांवर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, महसूल खात्याच्या अवर सचिवांनी राज्यभरातील रेस्टॉरंट्स, हॉटेल्स व अन्य आस्थापनांचा ऑडिट अहवाल तयार केलेला असून, बेकायदेशीररित्या चालू असलेली आस्थापने पाडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यात कुणालाही नाईटक्लब सुरू करण्यास परवाने दिलेले नाहीत. रेस्टॉरंटसाठीचे परवाने घेऊन राज्यात नाईटक्लब चालवले जात असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.
बडतर्फ पंचायत सचिव रघुवीर बागकर याला अटक
बर्च या नाईटक्लबमधील अग्नितांडव प्रकरणात बडतर्फ पंचायत सचिव रघुवीर बागकर याला काल हणजूण पोलिसांनी अटक केली. म्हापसा न्यायालयाने बागकर याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर तो गायब झाला होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. त्याने म्हापसा न्यायालयाच्या आदेशाला उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान दिले आहे. या याचिकेवर सुनावणी झाली; मात्र न्यायालयाने त्याला अंतरिम संरक्षण दिलेले नव्हते.
22 बेकायदा आस्थापनांना टाळे
उत्तर गोव्यात रेस्टॉरंट, बार, हॉटेल्स आदी 47 आस्थापनांची तपासणी केली असून, त्यापैकी 17 बेकायदा आस्थापनांना टाळे ठोकण्यात आले आहे. दक्षिणेत 34 आस्थापनांची तपासणी करण्यात आली असून, 5 आस्थापनांना टाळे लावले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.