चोवीस तासांत कोरोनाने ७ बळी

0
4

>> राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या १० हजारांखाली

राज्यात कोरोना महामारीच्या तिसर्‍या लाटेत गेल्या चोवीस तासांत आणखी ७ कोरोना बळींची नोंद झाली आहे. तसेच, नवीन ८२६ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. राज्यात बाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण २८.७७ टक्के एवढे आहे. चोवीस तासांत स्वॅब चाचण्यांच्या प्रमाणात घट झाली आहे. राज्यातील सक्रिय रूग्णसंख्या दहा हजारांच्या खाली आली असून सक्रिय रूग्णसंख्या ९ हजार ६५८ एवढी झाली आहे.

कोरोना बळींची एकूण संख्या ३६८२ एवढी झाली आहे. शनिवारी कोरोनामुळे १० जणांचा बळी गेला होता. कोरोना बळींमध्ये कोविड लस न घेणार्‍याची संख्या जास्त आहे.

काल झालेल्या मृत्यूंमध्ये बांबोळी येथे गोमेकॉमध्ये ५ कोविड बाधितांचा बळी गेला. दक्षिण गोव्यातील खासगी इस्पितळात एकाचा तर एका कोरोना बाधिताला मृतावस्थेत उत्तर गोवा जिल्हा इस्पितळात आणण्यात आले होते. कोरोना बळींतील ४ जणांनी कोविड लस घेतली नव्हती. २ कोरोना बळींनी कोविड लशीचे दोन्ही डोस घेतले होते. तर, एका कोरोना बळीने कोविड लस घेतल्याची माहिती उपलब्ध नाही. कोरगाव येथील ७५ वर्षीय महिला रुग्णाला मृतावस्थेत उत्तर गोवा जिल्हा इस्पितळात आणण्यात आली.

४६ जण इस्पितळात
राज्यात चोवीस तासांत ४६ जणांना इस्पितळांत दाखल करून घेण्यात आले असून बर्‍या झालेल्या २८ जणांना इस्पितळातून घरी पाठविण्यात आले आहे. इस्पितळात दाखल होणार्‍या कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. चोवीस तासांत नवीन २८७१ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यातील ८२६ नमुने बाधित आढळून आले.

१५८२ जण कोरोनामुक्त
गेल्या काही दिवसात नवीन बाधितांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या जास्त आहे. चोवीस तासांत १५८२ जण कोरोनामुक्त झाले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.४० टक्के एवढे आहे.