चोरांचा पाहुणचार

0
130

केंद्रीय गुप्तचर विभागाचे संचालक रणजित सिन्हा यांच्या घरी विविध सीबीआय खटल्यांतील आरोपींचा राबता होता असा गौप्यस्फोट ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांनी सिन्हांच्या घरच्या व्हिजिटर्स बुकच्या साह्याने केल्यापासून सीबीआय संचालक अडचणीत आले आहेत. कोळसा घोटाळ्यापासून टूजी स्पेक्ट्रम घोटाळ्यापर्यंतच्या विविध प्रकरणांना सीबीआय हाताळत असताना त्यातील काही आरोपींनी रणजित सिन्हा यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेण्याचे कारणच काय असा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो. खटल्यांसंदर्भात काही अधिकृत काम असते, तर या मंडळींनी सिन्हा यांना त्यांच्या कार्यालयात जाऊन भेटणे उचित ठरले असते. परंतु कार्यालयामध्ये इतर तपास अधिकारी वा पर्यवेक्षक अधिकार्‍यांंच्या समक्ष गाठीभेटी घेण्याऐवजी चोरीछुपे आपल्या २, जनपथ या शासकीय निवासस्थानी या सार्‍या संशयास्पद पार्श्वभूमी असलेल्या मंडळींना सिन्हा यांनी भेट दिली, यातून त्यामागील इराद्यांबाबत संशय बळावल्यावाचून राहात नाही. सिन्हांची भेट घेणार्‍यांमध्ये बड्या बड्या असामी आहेत आणि त्यांच्या त्या चोरट्या भेटींतून काय काय खलबते झाली, सीबीआयने दाखल केलेल्या खटल्यांसंदर्भात काही पळवाटा काढल्या गेल्या का, त्यासंदर्भात काही अर्थपूर्ण व्यवहार घडला का, या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याची जबाबदारी आता रणजित सिन्हा यांची आहे. आपल्या घरी ये – जा असलेल्यांशी आपली अनेक वर्षांची मैत्री आहे हा त्यांचा युक्तिवाद असला, तेव्हा जेव्हा त्यांच्या नेतृत्वाखालील यंत्रणेद्वारे त्या व्यक्तींची चौकशी सुरू असते, तेव्हा हे मैत्र जोपासण्याचे मुळात कारण काय? ही तर सरळसरळ आपल्या कर्तव्यांशी केलेली प्रतारणाच म्हणायला हवी. मुळात सिन्हा यांची आजवरची कारकीर्द अनेकदा प्रसंगपरत्वे वादग्रस्त ठरत आलेली आहे. बिहारमधील कुख्यात चारा घोटाळ्यासंदर्भात सीबीआयने तयार केलेला अहवाल तत्कालीन संचालकांना सादर करण्यापूर्वीच तो सौम्य करण्याचे पुण्यकर्म याच रणजित सिन्हांनी केले होते. एवढेच कशाला, अगदी अलीकडे कोळसा घोटाळा प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाला अहवाल सादर करण्याआधीच तो केंद्रीय कायदामंत्र्यांना दाखवून त्यांची मान्यता घेण्याचे इतिकर्तव्यही याच सिन्हांनी बजावले होते. आपल्या वरिष्ठांची मर्जी सांभाळण्याची ही धडपड म्हणायची की आणखी काय म्हणायचे? बिहारचे माजी मुख्यमंत्री व राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांची सिन्हा यांच्याशी असलेली मैत्री जगजाहीर आहे. लालूंनीच त्यांना बिहार भवनात खास पद निर्माण करून दिल्लीत आणले होते आणि त्यांची सीबीआय संचालकपदासाठी इतरांना डावलून वर्णी लावण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचा संशय आहे. आपल्या घराचे दार आपणच तपास करीत असलेल्या प्रकरणांतील आरोपींसाठी सदैव उघडे ठेवण्याचा प्रकार तर त्याहून गंभीर म्हणायला हवा. अनेक बड्या धेंडांनी सिन्हा यांची त्यांच्या सरकारी निवासस्थानी बिनदिक्कत गाठभेट घेऊन त्यांच्यापाशी रदबदली केलेली असू शकते. सीबीआय संचालकांनी विविध प्रकरणांमध्ये घेतलेल्या भूमिकेची पडताळणी होण्याची गरज त्यामुळे निर्माण होते. हे केवळ आपले पाहुणे होते असे म्हटल्याने ते स्वतःला या प्रकरणापासून अलिप्त ठेवू शकणार नाहीत. पाहुणा चोर आहे हे ठाऊक असूनही त्याचा कोणी पाहुणचार करतो का. मोईन कुरेशी नामक एका हवाला ऑपरेटरनेही सिन्हांची त्यांच्या घरी पंधरा महिन्यांत नव्वद वेळा भेट घेतल्याचे प्रशांत भूषण यांनी प्रस्तुत केलेले व्हिजिटर्स बुक दर्शवते. सिन्हांची सर्वाधिक वेळा भेट घेणारा मिथिलेशकुमार हा तर कोळसा विषयक तज्ज्ञ मानला जातो. तो सिन्हांना कोळसा घोटाळा सुरू असताना २७५ वेळा भेटलेला आहे. जी जी मंडळी सिन्हांच्या भेटीसाठी गेली, त्यांची येण्या – जाण्याची वेळ, त्यांच्या वाहनांचे क्रमांक, त्यांचे फोन क्रमांक हा सगळा तपशील या नोंदवहीमध्ये आहे, त्यामुळे आपल्याला गोवले गेले जाते आहे असा बचाव सिन्हा घेऊ शकणार नाहीत. ही सगळी मंडळी आपल्याला विविध खटले सुरू असताना घरी येऊन का भेटत होती, याचा जबाब सिन्हांनी द्यायला हवा. त्यांना त्याचे समाधानकारक उत्तर देता येत नसेल, तर विविध घोटाळ्यांतील आरोपींचा पाहुणचार करणार्‍या या महाशयांची तात्काळ गच्छन्तीच झाली पाहिजे.