चेंगराचेंगरीला आरसीबीच जबाबदार : कॅट

0
13

वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांचे निलंबन रद्द करण्याचा आदेश

आयपीएलचे विजेतेपद जिंकल्यानंतर विजयी मिरवणुकीदरम्यान चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीसाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) टीम जबाबदार असल्याचे केंद्रीय प्रशासकीय प्राधिकरणाने (कॅट) म्हटले आहे. एवढ्या कमी वेळात गर्दी नियंत्रित करायला पोलीस काही जादूगर नाहीत किंवा त्यांच्याकडे ‘अल्लादिनचा चिराग’ नाही, असेही कॅटने म्हटले. या प्रकरणी सरकारने निलंबित केलेल्या वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांचे निलंबन रद्द करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
आयपीएल जिंकल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या समर्थनार्थ 4 जून 2025 रोजी चिन्नास्वामी स्टेडियममध्ये एक कार्यक्रम ठेवण्यात आला होता. मात्र या स्टेडिअमबाहेर चेंगराचेंगरीची घटना झाली आणि त्यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला होता.
बंगळुरुमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीसाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांनी बंगळुरुच्या पोलीस आयुक्तांसह अनेक पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित केले होते, त्या विरोधात आयपीएस अधिकारी विकास कुमार यांनी कॅटमध्ये धाव घेतली होती.
बंगळुरुमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीसाठी कॅटने प्रथमदर्शनी आरसीबी टीम व्यवस्थापनाला जबाबदार ठरवले आहे. आरसीबीने सोशल मीडियावर विजयी मिरवणुकीचे आमंत्रण पोस्ट केले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी जमली. मात्र, पोलिसांना योग्य व्यवस्था करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही, कारण आरसीबीने पोलिसांची पूर्वपरवानगी किंवा संमती घेतली नव्हती.
कॅटने वरिष्ठ आयपीएस अधिकारी विकास कुमार यांचे निलंबन रद्द केले आहे. त्यांना या चेंगराचेंगरी प्रकरणात निलंबित करण्यात आले होते. राज्य सरकारने निलंबनाचा निर्णय घाईघाईने आणि पुरेशा पुराव्यांशिवाय घेतल्याचे कॅटने म्हटलं आहे. पोलिसांकडे ‘अलादीन का चिराग’ नाही की ते 12 तासांत 3 लाख लोकांची व्यवस्था करू शकतील, असेही कॅटने म्हटले आहे.