लि यांच्या बरोबर सरकारी अधिकारी, उद्योजक अशा मान्यवरांचा सहभाग असलेले शिष्टमंडळ आले आहे. काल दु. ३ वा. येथील विमानतळावर त्यांचे आगनमन झाल्यानंतर केंद्रीय विदेश व्यवहार राज्यमंत्री ई. अहमद, विदेश सचिव रंजन मथाई व अन्य वरिष्ठ अधिकार्यांनी त्यांचे स्वागत केले.
लि यांच्या या तीन दिवसीय भारत दौर्या दरम्यान त्यांच्या डॉ. मनमोहन सिंग यांच्याशी महत्त्वाच्या चर्चेच्या फेर्या झडणार आहेत. डॉ. सिंग या दरम्यान लियांच्या सन्मानार्थ मेजवानी देणार असून यावेळी भाजप, समाजवादी पक्ष यांच्यासह अन्य प्रमुख पक्षाचे नेतेही उपस्थित राहणार आहेत.
भारतात दाखल झाल्यानंतर लि यांनी आपल्या दोन दशकांपूर्वीच्या भारत भेटीच्या आठवणींना उजाळा दिला.
उद्या उभय देशांच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळासह उभय पंतप्रधानांदरम्यान चर्चेस प्रारंभ होणार आहे. आंतरराष्ट्रीय, प्रादेशिक व द्विपक्षीय महत्त्वाच्या विषयांवर ही चर्चा होईल अशी माहिती संयुक्त विदेश सचिव गौतम बंबवाले यांनी दिली. सीमा प्रश्न, पाणी प्रश्न तसेच आर्थिक व्यवहार यांचाही यात विशेषत्वाने समावेश असेल.
भारत–चीन सीमा प्रश्नाच्या अनुषंगाने भारतातर्फे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेबाबत स्पष्टीकरणावर भर दिला जात आहे. अलीकडेच चीनकडून भारतीय हद्दीत जी सैनिकी घुसखोरी झाली. त्या पार्श्वभूमीवर या विषयाला बरेच महत्त्व दिले जात आहे. अशा प्रकाराची पुनरावृत्ती होऊ न देण्यासाठी हा मुद्दा जोरदारपणे चर्चेस येणे आवश्यक असल्याचे सूत्रांनी सांगितले. भारत–चीन दरम्यानच्या व्यापार संबंधांनाही मोठे महत्त्व आहे. २०११ पर्यंत चीनने या क्षेत्रात भारतात ५७५.७० दशलक्ष अमेरिकी डॉलर्स एवढी गुंतवणूक केली होती. तर भारताची चीनमधील ही आकडेवारी ४४१.७० दशलक्ष डॉलर्स होती.
ब्रह्मपुत्रा नदीचा उगम तिबेटमधून होत असून या नदीवर धरण बांधण्याचा चीनचा प्रस्ताव आहे. हा मुद्दाही भारतातर्फे या चर्चे दरम्यान उठविला जाणार आहे. उभय देशा दरम्यानच्या पाणी प्रश्नावर पाणी आयोगाची स्थापना किंवा आंतर सरकार बोलणी असे प्रस्ताव भारताने ठेवले आहेत.