– डॉ. राजेंद्र रामचंद्र साखरदांडे
त्या रस्त्यावरून जाताना उगाचच घाबरगुंडी उडायची. लोकांच्या अंधश्रद्धेमुळे कित्येक वावड्या उडत होत्या. ज्यांनी ते पाहिले होते, तेच चारचौघांना सांगितले होते. माझ्याही कानावर त्या वेदना यायच्या. मला ते मान्य नव्हते. कारण त्याचा अनुभव नव्हता. ‘भुताटकी असते’ यावर मला भाष्य करायचे नाही. असे असले तरी त्या निर्मनुष्य रस्त्यावरून पहाटे सहाला जाणे म्हणजे काळजाची धडधड व्हायची. मी पहाटे पावणेसहाला घरातून एकटाच बाहेर पडायचो. रात्री मोठी असल्यास काळोखातच स्वारी बाहेर निघायची. पंधरा-वीस मिनिटांनंतर ते वळण यायचे. त्यानंतर ती दहा-वीस मिनिटांची वाट चालणे जड जायचे. त्या वाटेवर लोकांना कितीतरी वाईट अनुभव आले होते. कुणी झाडीतून अंगावर दगड फेकायचे. मोठमोठ्याने हसण्याचे, रडण्याचे आवाज ऐकू यायचे. कुणी व्यक्ती सफेद कपडे घालून समोरून चालत झाडीत जायची. शिमग्यात हे प्रकार वाढायचे.
त्या दिवशी झपाट्याने चाललो होतो. डॉक्टरांनी सांगितले होते – चालून घाम फुटला पाहिजे. हृदय कसे धडधडायला हवे. इथे तर घाम फुटतच होता व त्या रस्त्यावर हृदयाची धडधड वाढतच होती. रस्त्यावरचे काहीही दिसत नव्हते. सर्वत्र काळोख होता. रस्त्यावर विजेच्या खांबावरती ट्युबलाइट पेटत होती. ही सांगत होती, ‘अहो ऐकलंत का? शिमग्याचे दिवस आहेत. भुते मोकाट फिरत असतात. तेव्हा तुम्ही ह्या दिवसांत बाहेर रपेट मारायला जाऊच नका.’ ऐकायला हवे होते तिचे, नाहीतर ही अवदसा समोर आली नसती. एक बाईमाणूस त्याच रस्त्यावरून समोरून चालत आली. मी रस्त्याच्या एका बाजूला तर ती दुसर्या! जसजशी ती त्या बाजूने जवळ आली तसे माझ्या काळजाचे ठोके वाढले. अंगावर सरर्कन काटा उभा राहिला. दरदरून घाम फुटला. मी शिवी हासडली, ‘‘हडळ मेली!’’ तिच्याकडे न बघता मी सरळ चालत राहिलो. हडळीचे दर्शन तर घडले नव्हते. तिच्या पायाकडे बघायचे राहूनच गेले. खरे तर त्या काळोखात तिचा चेहरा बघितलाच नाही. एवढ्या सकाळी काळोखात रस्त्यावरून एकटे जाण्याचे धाडस एक बाईमाणूस करेल, या तिच्या धाडसाचे नवल वाटले. ती बाई ‘हडळ’ निघून गेली. तो रस्त्यापलिकडचा झाडीतील विलक्षण वाडा जास्तच भयानक वाटत होता.
तो परीसरच भयानक होता. तो वाडा सोडला तर जवळपास एकही घर नव्हते. कुणी का बरे तिथे घर बांधत नव्हते? पक्षांचा किलबिलाट, कावळ्यांची कावकाव तिथे पोचताक्षणी नाहीशी व्हायची. अंगाला झोंबणारा वाराही स्तब्ध व्हायचा. निसर्गात घडणारा बदल जाणवत होता. मग वातावरण गंभीर व्हायचे. रस्त्यापलिकडे ती बागाईत… नंतर ती दाट झाडी व त्या दाट झाडीमागे तो वाडा…. चिरेबंदी वाडा! तिथे कुणाचीही हालचाल दिसत नव्हती. माणूस नावाचा प्राणी तिथे राहत असेल याची कल्पनाही करवत नव्हती. बाहेर गेटजवळ पेरूचे मोठे झाड होते. त्यावर पेरू लटकलेले असायचे. ते पिकून खाली पडायचे. कुणीही काढत नव्हते. हाताजवळ लटकणारे पेरू तोडायचे धारिष्ट कुणालाही होत नव्हती, का?
त्या वाड्यात पाच व्यक्ती राहत – बाप, मुलगी व तीन मुलगे. गडी माणूस असावेत. पण नसावे कदाचित. त्या गेटमधून आत शिरलेले मी बघितले नव्हते. गेटवरची माती भुसभुशित होती. आत गेलेल्या गाडीच्या चाकांच्या खुणा दिसत होत्या – परतायच्या नाहीत म्हणजे आत गेलेल्या गाड्या परतल्याच नाहीत. पालापाचोळा सर्वत्र पसरलेला. त्या वाड्याचे मालक विशिष्ट होते. तो व्यक्ती गेल्या दहा वर्षांत गावच्या बाजारातदेखील दिसला नव्हता. बाजारहाट बहुधा त्याचा छोटा मुलगाच करत असावा. मोठाले दोन नोकरी करत असत. छोट्याचे वय ४०, त्यावरचा ४५, त्यावरचा ४८. आणखी त्यांची बहिण वय वर्षे ४२. तिचे लग्न ठरत नव्हते. बाकीचे भाऊ तिच्याकरता थांबले होते. तो वाडा, तिथली माणसे, बघायची फार इच्छा होती. काळ माझी वाटच बघत होता, ह्याची जराशीही कल्पना मला नव्हती. अखेर ती इच्छाही पुरी झाली.
सांजवेळ झालेली. दारी रुग्णांची रांग लागलेली. डोके शांत ठेवत तपासणी करत होतो. डॉक्टरकी करायची म्हटल्यावर डोके शांत ठेवण्याची गरज होती. शेवटी पेशंट संपले. घड्याळावर ७ चा ठोका पडला. एक व्यक्ती बाहेर बसली होती. हो, हाच तो थोरला. त्या वाड्यावरचा थोरला मुलगा. वडिल आजारी होते. बाहेर सांजवेळ थांबलेली. काळोख नुकताच आपली ओळख सांगत होता. कपाळावर आट्या पसरल्या. अंगावर काटा सरर्कन गेला. मी अंग झाडले. माझी बॅग त्याच्या हातात दिली व निघालो. आमच्या हिच्या डोळ्यांत भीतीची झलक जाणवत होती. मला चिंता नव्हती. फक्त धाकधूक वाटत होती.
मी त्याच्या गाडीतून निघालो. गेटमधून आत जाणारी गाडी हीच असावी. त्याने स्वत:च गाडी थांबवून गेट उघडली. गडद झाडी पार करून गाडी वाड्याच्या दरवाज्यावर थांबली. दरवाज्यावरची लाइट पण पेटत नव्हती. हल्लीच वाड्याची डागडुजी केली असणार. भिंतींवर रंग चढवलेला होता. तिथल्या माणसाप्रमाणेच ते रंग होते. भडक… डोक्याचा पारा चढवणारे! वाडा मोठा होता. तळमजल्यावर कुणी राहत नसावे. जमिनीवर झाडूचा हात लागला नव्हता. त्या मुलाने दिवाणखान्याचा देखावा ढकलून उघडला. दार करकरत, तक्रार करत उघडले. जोर लावल्यावरच ते आत लोटले गेले. पुरातन असा मोठा सोफा ऐसपैस पसरला होता. कितीतरी मोठमोठ्या मिश्यांच्या धिप्पाड व्यक्ती त्यावर विराजमान झाल्या असाव्यात. सोफ्यावरची उजव्या बाजूची गादी चेपलेली होती. सर्वजण तिथेच बसून गेले असावेत. मीही तिथेच बसलो. थोड्या वेळाने घरमालक हळूहळू चालत खाली आले.
चेहरा ऐसपैस… मनात आणलेली मिशी गायब… डोळे धारदार… डोक्यावर सगळे केस शाबूत… पांढरे… साहेब त्या समोरच्या सोफ्यावर बसले. किंचित बोलले. मलाही बोलायचे नव्हते. मी ठरवलेले… जो माणूस आपले बोलणे बिसरलेला आहे, त्याला बोलते करू नये… नाहीतर तो बोलतच राहील व मला मग ते सगळे ऐकावे लागणार. मुकाटपणे त्यांची तपासणी पुरी केली. त्याची प्रकृती ठीक नव्हती. वय तर झालेच होते. एकेकाळची बेफिकीरीची ती नजर क्षीण झाली होती. आवाजात दम नव्हता. मनगटातला जोर कमी होता. त्यांची ती डबल बॅरेल बंदुक कुठे दिसत नव्हती. सगळीकडे भयाण शांतता पसरली होती. मला लवकरात लवकर तिथून पळायचे होते. कसला तरी कुबट वास सर्वत्र पसरलेला होता. मी समजलो – त्या मुलाला मला वरच्या मजल्यावर न्यायचे नव्हते, का? वर काय दशा होती, याची मिमांसा करायची गरज नव्हती. मी निघालो. हात धुऊन घेतले. पाणी चक्क बर्फासारखे थंडगार होते. नजर वरच्या मजल्यावर वळली. खिडकीमागे हालचाल झाली. दोन डोळे लुकलुकत होते. ते डोळे त्या मुलीचे तर नसणार…! मी परत मागे वळत वर बघायचे टाळले. बाहेर काळोख दाटलेला. त्या घनदाट झाडीकडे मला बघायचे नव्हते. उगाचच मला भास होऊ लागला, कितीतरी भयानक डोळे माझ्याकडे लागलेले असावेत.
मी सरळ गाडीत बसलो. गाडी गेटकडे वळली. त्या रस्त्यावर दूर तो विजेचा दिवा पेटलेला होता. रात्रीचे ८ वाजले असणार… अंधुक प्रकाशात एक सावली चालताना दिसत होती. तीच ती बाई होती… काळोखात परतीच्या वाटेवर चाललेली…! गाडी पोहोचेपर्यंत ती बाई नाहीशी झाली होती. अंगावर कांटा उभा राहिला. हृदय धडधडू लागले. मला लवकरात लवकर तिथून निघायचे होते. गाडी गावाच्या दिशेने धावत होती. वाडा मागे राहिला होता. आता वारा अंगाला झोंबत होता!
…………