– उदय नरसिंह म्हांबरे, वळवई
कोकणीची जमेल तशी सेवा करता करता मी कधी गोवा मराठी चित्रपट महोत्सवाच्या आयोजनाशी जोडला गेलो ते समजलेच नाही. एवढ्यात सहाव्या मराठी चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनाचा दिवस उजाडलादेखील!
तसे पाहू गेल्यास,आपल्या गोव्यात महोत्सव आणि संमेलने पायलीला पन्नास होतात. पावसाळ्यात उगवणार्या चार्यासारखे. आमचाही महोत्सव खरे म्हणजे दरवर्षी मृगाच्या पहिल्या सरीसोबत येतो. यंदा थोडा उशीर झाला खरा, परंतु कधी कधी मृगाचा पाऊसही वेळेवर येत नाही, परंतु उशिरा येणार्या पावसातही जोर असतो, तस्साच यंदाचा महोत्सव होईल यात शंकाच नाही. हा महोत्सव सुरू करण्याची कल्पना ज्यांना सुचली ते ‘विन्सन ग्राफिक्स’ चे संजय शेट्ये आणि ज्ञानेश मोघे यांना खरोखरच सलाम करावासा वाटतो.
पावसाळ्यातील हा महोत्सव पावसाळी अळंब्यांसारखा न ठरता या गोव्याच्या भूमीत आपली पाळेमुळे खोल रुजवताना दृष्टीस पडतो ही आल्हाददायक गोष्ट आहे. जमिनीत रुजलेल्या बियांचे रोप जसे हळूहळू वृक्ष बनते, तसाच! या वृक्षाच्या फांद्यांवर बसून आनंदाचे झोके घेणारे आयोजक, प्रायोजक, निर्माता, दिग्दर्शक, प्रेक्षक, कलाकार आणि धुंवाधार पावसातही घामाने चिंब भिजून वावरणारे कार्यकर्ते ही या महोत्सवाची जमेची बाजू असते.
या महोत्सवाच्या अगदी सुरवातीपासून मला त्याच्या आयोजनात सहभाग घ्यायची संधी मिळाली याचा मला सार्थ अभिमान वाटतो. आयोजनातील अडचणी, अडथळे, यश, आनंदाचे क्षण आणि क्वचित फजितीचे क्षणही! अशा कैक अनुभवांची शिदोरी मला मिळाली. या अनुभवांचा उपयोग सामाजिक जीवनात वावरताना तर होतोच, किंबहुना वैयक्तिक जीवनातही होतो.
२००८ साली पहिला महोत्सव झाला. ती आठवण तर आम्ही कोणीही, कधीही विसरू शकणार नाही. महोत्सवात चित्रपट कोणते असावेत? निमंत्रित कोण असतील? उद्घाटन कोणाच्या हस्ते? पाहुणे कोण? व्यासपीठावर कोण कोण? कोण कुठे उभे राहतील? कुठला चित्रपट कोणत्या चित्रपटगृहात? नंतर चर्चा कोण संचालित करणार? चित्रपटांतील कलाकारांना योग्य वेळी कोण कसा व कोठून हुडकून आणणार? चित्रपटांची रिळे योग्य वेळी योग्य चित्रपटगृहात कशी पोचवायची? व्यासपीठावरील तयारी, फुले कोण देणार? समई कोण आणणार? वेगवेगळ्या निर्माता, दिग्दर्शक, कलाकारांची येण्या जाण्याची, राहण्याची व्यवस्था, त्यांचे रागरंग सांभाळणे… अरे बापरे! हजार प्रश्न, हजारो उत्तरे. आयोजकांच्या डोक्याचा अगदी स्फोट व्हायची पाळी!
आता या प्रश्नांची तशी सगळ्यांनाच सवय होऊन गेली आहे. वेळ येईल तेव्हा स्वतःचे काम सांभाळून इतर अतिरिक्त जबाबदारी सांभाळण्याची कला सर्वांनीच आत्मसात केली आहे.
चित्रपट महोत्सवाला हजर राहून चित्रपट पाहणे आल्हाददायक तर आहेच, परंतु आयोजकांतील कोणालाही कधी चित्रपटाचा आस्वाद घेता येत नाही हे त्रिवार सत्य आहे. आजवर कित्येक नामवंत, राष्ट्रीय कीर्तीच्या मराठी, हिंदी कलाकारांनी, दिग्दर्शकांनी या महोत्सवाला हजेरी लावली आहे. बहुतेक कलाकार समंजस असतात, पण काही कलाकारांचे रागरंग सांभाळताना दोरीवरची कसरत होते!
चित्रपटगृहात अलोट गर्दी होणे हे तर आता नित्याचे झाले आहे. त्यामुळे आता कला अकादमी, मॅकेनिझ पॅलेस १ व २ या बरोबरच आयनॉक्समध्ये चित्रपट दाखवले जात आहेत. पण तरी काही प्रेक्षक एकाचवेळी एकच चित्रपट पाहण्यासाठी गर्दी करतात, त्यामुळे गोंधळ उडतो. पाहुणे उशिरा आल्याने उद्घाटन सोहळा लांबला तर आयोजकांचा अक्षरशः फुटबॉल होतो! उद्घाटन सोहळ्यानंतर चित्रपटाचा खेळ असतो. व्यासपीठावरील पाहुण्यांसाठी, कलाकार व राजकारण्यांसाठी काही आसने राखून ठेवावी लागतात. पाहुण्यांना सोयीस्कर व्हावे म्हणून आधी पुढची आसने ठेवावी लागतात व नंतर चित्रपट पाहण्यासाठी मागे आसने राखावी लागतात. पण अशा वेळी काही असमंजस लोक आयोजकांशी हुज्जत घालतात. पण सुदैवाने इतर समंजस लोक त्यांना समजावतात आणि विषय संपतो.
एकाच वेळी चार ठिकाणी चित्रपट सुरू असतात. त्यावरील चर्चेसाठी कलाकारांना शोधून आणणे हेही एक दिव्य असते, कारण त्यांनाही इतर चित्रपट निवांतपणे पाहण्याची इच्छा असते. चर्चा संपल्यावर चित्रपटगृह खाली झाले पाहिजे, पण काही प्रेक्षक थिएटरबाहेर जाण्याचे नाव काढत नाहीत. अशा वेळी बाहेर आलेल्या प्रेक्षकांचा गडबड – गोंधळ! अशावेळी आयोजकांचाही नाईलाज होतो. सक्तीने वागणे शक्य होत नाही. आयनॉक्स आणि कला अकादमीत आत व बाहेर जाण्यासाठी दोन दरवाजे असल्याने व त्यांचे स्वतःचे दरवान असल्याने काही प्रमाणात सुलभ होते, परंतु मॅकनिज पॅलेसमध्ये वादावादी होते. प्रत्येक चित्रपट संपल्यावर प्रेक्षकांनी बाहेर जाऊन परत शिस्तीत आत येणे ही आयोजकांची माफक अपेक्षा आहे व त्यात गैर काही नाही, परंतु बरेच प्रेक्षक एकाच जागी बसून पूर्ण दिवसाचे चारही चित्रपट पाहू इच्छितात. त्यामुळेच गोंधळ वाढतो.
महोत्सवाच्या उद्घाटन आणि समारोप सोहळ्याचे नियोजन मा. परेश जोशी हे करतात. दोन्ही कार्यक्रमांची रूपरेषा, मिनिट टू मिनिट कार्यक्रम आणि नंतर रंगीत तालीम. या तालमीच्या निमित्ताने का होईना, एका क्षणासाठी कोण मुख्यमंत्री, तर कोण नाना पाटेकर तर कोणी सचिन खेडेकर होतो! किती भाग्यवान आम्ही!
गेल्या पाच वर्षांत कमीत कमी पन्नास ते साठ चित्रपटांचे प्रदर्शन या महोत्सवातून झाले, परंतु आयोजकांतील जास्तीत जास्त लोकांनी केवळ एकच चित्रपट पाहिला, तो म्हणजे ‘देऊळ!’ या चित्रपटात देवाधर्माची विटंबना आहे असा आक्षेप घेऊन एका संस्थेने विरोध केला होता म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून आयोजकांनी गृह खाते व पोलिसांना कल्पना दिली व बंदोबस्त ठेवला. थिएटरच्या आत काही गडबड होऊ नये म्हणून आयोजक व कार्यकर्ते चित्रपट संपेपर्यंत आत बसून राहिले. निषेध तर कोणी केला नाही, परंतु त्या निमित्ताने आम्हाला एका तरी चित्रपटाचा आस्वाद घेता आला.
गेल्या पाच मराठी चित्रपट महोत्सवांचे हे घवघवीत यश पाहून कधीकधी माझे मन मला स्वस्थ बसू देत नाही. असाच आणि इतकाच भव्य दिव्य, सुंदर कोकणी चित्रपट महोत्सवही घडून यावा असे मनोमन वाटते. आज कोकणी चित्रपटांची संख्या कमी असली तरी कोकणी चित्रपटांच्या उज्ज्वल भविष्यकाळाची स्वप्ने पडल्याविना राहात नाहीत. असाच किंबहुना याहूनही सुंदर कोकमी चित्रपट महोत्सव भविष्यात होईल आणि त्याच्या आयोजनातही आम्ही कुठेच कमी पडणार नाही, याविषयी मनात शंका नाही.