मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता : मुख्यमंत्र्यांची माहिती
काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गोवा सरकारची प्रशासन स्तंभ ही गगनचुंबी इमारत चिंबल येथे उभारण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यापूर्वी गोवा सरकारने ही इमारत राजधानी पणजी शहरात अथवा पर्वरी येथे उभारण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, काही कारणांमुळे पणजी किंवा पर्वरीत हा प्रकल्प उभारण्याचा निर्णय सरकारला बदलावा लागला होता. तब्बल 75 मीटर एवढ्या उंचीची ही इमारत 15 मजली असेल व त्यावर 300 कोटी रु. एवढा खर्च येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
या इमारतीसाठी चिंबल येथील आयटी खात्याची 25 हजार चौ. मीटर एवढी जागा सर्वसामान्य प्रशासन खात्याकडे हस्तांतरीत करण्यास काल राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दोन वर्षांपूर्वी राज्य अर्थसंकल्पातून ‘प्रशासन स्तंभ’ प्रकल्पाची घोषणा केली होती.
दरम्यान, प्रशासन स्तंभासाठीच्या जमिनीचा जो सर्वे क्रमांक आहे त्याच सर्वे क्रमांकातील 6250 चौ. मी. एवढी आयटी खात्याची जमीन पर्यटन विषयक सुविधा उभारण्यासाठी पर्यटन खात्याला हस्तांतरीत करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याचे सावंत यांनी सांगितले.
दरम्यान, पशुवैद्यकीय महाविद्यालयासाठी कुर्टी व कोडार या ठिकाणची 1 लाख 60 हजार चौ. मीटर एवढी जमीन हस्तांतरीत करण्यासाठी मंत्रिमंडळाने काल मान्यता दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
कर्करोग इस्पितळाला मान्यता
बांबोळी येथे गोवा वैद्यकीय महाविद्यालय परिसरात 310 कोटी रु. खर्चून कर्करोग इस्पितळ उभारण्यासाठीच्या प्रस्तावालाही मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
टॅक्सी व्यवसायात शिस्तीसाठी सुधारणा
राज्यातील टॅक्सी व्यवसायात शिस्त आणण्याची आवश्यता असून त्यासाठी टॅक्सी व्यवसायात आमुलाग्र आशा सुधारणा घडवून आणण्याचा सरकारचा विचार आहे, असे काल मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. राज्यातील टॅक्सीवाल्यांना कायदा हातात घेता येणार नाही. पर्यटकांना मारहाण करण्यासारखे प्रकार टॅक्सीवाल्यांकडून घडले तर ते सहन केले जाणार नाही. टॅक्सीवाल्यांना ॲपवर यावे लागणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. पोलीस व आरटीओंना सक्त आदेश दिले असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.