Home Featured चिंबलवासीयांसोबत मुख्यमंत्री उद्या करणार चर्चा

चिंबलवासीयांसोबत मुख्यमंत्री उद्या करणार चर्चा

0

आल्तिनो पणजीत खास बैठक, युनिटी मॉलला ग्रामस्थांचा विरोध कायम

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी चिंबल येथील नियोजित युनिटी मॉलच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी येत्या बुधवार 21 जानेवारी रोजी सकाळी 11.30 वाजता आल्तिनो पणजी येथे खास बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीला ग्रामस्थांच्या 5 जणांच्या शिष्टमंडळाला बोलावण्यात आले आहे. चिंबल येथील नियोजित युनिटी मॉलला ग्रामस्थांचा विरोध कायम आहे, अशी माहिती चिंबल जैवविविधता मंडळाचे अध्यक्ष आणि आंदोलनातील प्रमुख कार्यकर्ते गोविंद शिरोडकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान, 23 व्या दिवशी नागरिकांचे आंदोलन सुरूच होते.

चिंबल ग्रामस्थांनी गेल्या 15 जानेवारीला विधानसभेवर मोर्चा काढला होता. तथापि, पोलिसांनी सदर मोर्चा मेरशी येथील सर्कलजवळ अडविला. त्यावेळी ग्रामस्थांनी युनिटी मॉल रद्द करण्यासाठी दिवसभर निदर्शने केली होती. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांची त्याच दिवशी रात्री उशिरा भेट घेऊन मंगळवारपर्यंत युनिटी मॉलच्या विषयावर चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे मंगळवारपर्यंत युनिटी मॉलच्या विषयावर तोडगा निघेल, अशी अपेक्षा स्थानिक ग्रामस्थ बाळगून होते. तथापि, ही बैठक एक दिवसाने लांबणीवर पडली आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे सध्या दिल्ली दौऱ्यावर असल्याने बुधवार दि. 21 जानेवारी रोजी सकाळी 11.30 वाजता युनिटी मॉलच्या विषयावर बैठक घेतली जाईल, असे ग्रामस्थांना अधिकृतरीत्या काल कळविण्यात आल्याचे शिरोडकर यांनी सांगितले.
आरजीपी या प्रादेशिक पक्षाचे प्रमुख मनोज परब, आपचे माजी प्रदेशाध्यक्ष ॲड. अमित पालेकर व इतरांनी काल चिंबलवासीयांच्या धरणे आंदोलनात सहभागी होऊन पाठिंबा जाहीर केला.
सरकारने चिंबल हा युनिटी मॉल उभारण्याचा प्रस्ताव रद्द करावा, अशी मागणी ॲड. पालेकर यांनी केली.

आंदोलनाचा 23 वा दिवस
चिंबल येथे नियोजित युनिटी मॉलच्या प्रश्नावरून गेले 23 दिवस धरणे आंदोलन सुरू आहे. चिंबलमधील नियोजित युनिटी मॉल रद्द करण्याची नागरिकांची मागणी कायम आहे. तोयार तळ्याच्या संवर्धनासाठी हे आंदोलन सुरू आहे, असे गोविंद शिरोडकर यांनी सांगितले.