चिंबलवासीयांच्या आंदोलनास ‘गाकुवेध’ महासंघाचा पाठिंबा

0
6

चिंबल येथील युनिटी मॉल या गोवा सरकारच्या प्रस्तावित प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या चिंबलवासीयांना काल रविवारी ‘गाकुवेध’च्या गावडा, कुणबी, वेळीप व धनगर महासंघाने आपला पाठिंबा व्यक्त केला. त्यामुळे हे आंदोलन आता आणखी बळकट झाल्याचे मत या आंदोलनातील नेत्यांनी व्यक्त केले आहे. युनिटी मॉलविरूद्धच्या आंदोलनाचा काल 22 वा दिवस होता.

युनिटी मॉलमुळे चिंबल येथील तलावाजवळील निसर्ग व जैवविविधता यांचा विनाश होण्याची भीती चिंबलवासीयांनी व्यक्त केली असून कोणत्याही परिस्थितीत तेथे केंद्र सरकारच्या योजनेखालील हा युनिटी मॉल होऊ देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. युनिटी मॉलच्या प्रश्नावरून चिंबलवासीयांनी 16 जानेवारी रोजी आपल्या आंदोलनाची तीव्रता वाढवताना गोवा विधानसभेवर मोठ्या नेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. मात्र, यावेळी त्यांना पोलिसांनी चिंबल जंक्शनजवळ अडवून ठेवल्यानंतर त्यानी तेथेच रस्त्यावर ठाण मांडून वाहतूक अडवली होती. आंदोलनकर्ते त्या दिवशी उशिरा रात्रोपर्यंत रस्त्यावर बसून राहिल्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपण या प्रश्न केंद्र सरकारशी बोलणी करून 19 अथवा 20 जानेवारी रोजी आंदोलनकर्त्यांना युनिटी बॉल प्रकल्पाविषयी सरकार काय भूमिका घेऊ इच्छित आहे ते सांगणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे आज सोमवारी की उद्या मंगळवारी मुख्यमंत्री चर्चेसाठी बोलावतील ते पहावे लागणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी काल दै. नवप्रभाशी बोलताना सांगितले. सध्या मात्र, हे आंदोलन चालूच असून काल आंदोलनाचा 22 वा दिवस होता.