चिंता सोडा; मानसिक आरोग्य राखा!

0
15
 • मनाली महेश पवार

आजच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. मानसिक आरोग्य बिघडले तर आपले विचार, अनुभव आणि आपल्या वागण्यावर त्याचा परिणाम होतो. पर्यायाने कुटुंबाची वाताहात होते. परिपूर्ण आणि संतुलित जीवन जगण्यासाठी मानसिक आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

आजच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. मानसिक आरोग्य म्हणजे काय, तर आपले भावनिक, मानसिक आणि सामाजिक कल्याण. मानसिक आरोग्य बिघडले तर आपले विचार, अनुभव आणि आपल्या वागण्यावर त्याचा परिणाम होतो. आपण तणाव कसा हाताळतो, कोणत्या गोष्टींची निवड करतो आणि इतरांशी कसे संबंध ठेवतो यावरदेखील परिणाम होतो. मानसिक आरोग्य चांगले राखणे कुटुंबातील सगळ्यांच्याच हिताचे ठरते, नपेक्षा आपल्या दैनंदिन जीवनातील विविध पैलूंवर त्याचा परिणाम होतो. यावर मात करण्यासाठी आव्हानांशी सामना करणे, लवचिकता निर्माण करणे आणि आवश्यकतेनुसार समर्थन मिळवणे आवश्यक असते. परिपूर्ण आणि संतुलित जीवन जगण्यासाठी मानसिक आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
आपली विचारप्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. आपण आपल्याबाबत जसा विचार करू तसे आपल्या मेंदूत बदल होत असतात आणि आपण तसेच घडत जातो. विचारप्रक्रियेमध्ये आपला मेंदू निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी, निर्णय घेण्यासाठी आणि समस्यांचे निराकरण करण्यासाठी आपले अनुभव, धारणा आणि आठवणींमधून माहितीचे विश्लेषण, मूल्यमापन आणि प्रक्रिया करण्यात गुंतलेल्या संज्ञानात्मक क्रियाकलापांचा समावेश असतो. यात धारणा, लक्ष, स्मृती, तर्क, समस्या सोडवणे आणि निर्णय घेणे यांसारख्या विविध मानसिक प्रक्रियांचा समावेश होतो. आपले विचार आपला विश्वास, भावना आणि पूर्वीच्या ज्ञानाद्वारे आकार घेतात, जे आपण आपल्या सभोवतालच्या जगाचा कसा अर्थ लावतो आणि त्याला प्रतिसाद देतो यावर प्रभाव टाकतात.

अनेक शारीरिक आजारांच्या मुळाशीसुद्धा मानसिक ताण आणि असंतुलन कारणीभूत असते. मात्र अनेक वेळा आपण आपल्या मानसिक आरोग्यात होणाऱ्या बिघाडांकडे दुर्लक्ष करतो. किंबहुना अनेक वेळा हे बदल आपल्या लक्षातही येत नाहीत. त्यामुळे आजाराची तीव्रता वाढते आणि मग त्यावर उपचार घेणे अधिक अवघड होते जाते.

भूक आणि मानसिकता
योग्यवेळी आणि पुरेशी भूक लागणे हे आपल्या चांगल्या मनस्वास्थ्याचे लक्षण असते. याउलट अन्नावरची वासना उडणे, अजिबात भूक न लागणे किंवा सतत खाई खाई सुटणे हे मानसिक स्वास्थ्य बिघडले असल्याचे लक्षण आहे. खूप ताण असेल तरी आपली भूक मरते. डिप्रेशन किंवा चिंतारोग अशा आजारांमध्येदेखील आपल्या भुकेवर परिणाम होतो. असे रुग्ण स्वतःहून खायला मागत नाहीत. त्यांची भुकेची जाणीव खूप कमी होते. समोर अन्न अनेक तास तसेच राहू शकते.

झोपेवर परिणाम
नियमित वेळेला आणि शांत झोप लागणे तसेच 7-8 तासांनंतर आपणहून जाग येणे आणि उठल्यावर ताजेतवाने वाटणे हे निरोगी मनाचे लक्षण आहे. निद्रानाश, अस्वस्थ झोप, रात्रभर झोपून उठल्यावरही थकवा जाणवणे, अति झोप येणे हे मानसिक रोगाचे निर्देशक असू शकते. एखादी चिंता भेडसावत असेल तर निद्रानाश जडण्याची शक्यता असते. मनातल्या विचारांना नियंत्रित करता येत नसेल तर झोप लागत नाही. काही कारणांमुळे किंवा मानसिक रोगामुळे जर व्यक्ती अतिउत्तेजित झाली असेल तरही झोपेवर परिणाम होऊ शकतो. डिप्रेशन किंवा असह्य ताण असेल तर झोपेची वारंवारता वाढते. हे रुग्ण सलग दिवसभरसुद्धा झोपून राहू शकतात. त्यांना उठून बसण्याचे किंवा खाण्यापिण्याचेही भान राहत नाही.

विचारांत बदल
स्वच्छ आणि योग्य विचार करता येणे, समस्यांकडे वस्तुनिष्ठपणे पाहता येणे, त्यामुळे आलेल्या ताणतणावांचे योग्य संतुलित नियोजन करता येणे हे मानसिक स्वास्थ्य ठीक असल्याचे दर्शवते. योग्य तिथे रिस्क घेण्याची आणि त्यातून आरामात सुटण्याची तयारी असणे हे मानसिकदृष्ट्या आपण बलवान असल्याचे लक्षण आहे. छोटे-छोटे प्रश्न आले तर हात-पाय गळणे, सततचा वैचारिक गोंधळ, आव्हानांपासून सतत पळ काढणे, वैचारिक आणि भौतिक आवाक्यातून बाहेर पडायला घाबरणे, असुरक्षित वाटणे मानसिक असंतुलन दर्शवते. घरात जर काही अप्रिय घटना घडली (उदा. काही गंभीर आजार, अपघात, अकाली मृत्यू, आर्थिक संकट इ.) तर काही माणसे सैरभैर होतात आणि आपली विचारशक्ती गमावून बसतात. काही माणसे एकदम बधीर होऊन जातात. काही घडलेच नाही अशा मनोभावनेमध्ये अडकतात. याउलट काही माणसे अशा परिस्थितीत जास्त खंबीर बनतात आणि परिस्थितीचा सामना करतात. आपल्या मनाचा तोल कोणत्याही परिस्थितीत जाऊ न देणे आणि तरीही संवेदनशील असणे हे मानसिकदृष्ट्या निरोगी असण्याचे लक्षण आहे.

अपयशातून नैराश्य
अपयश पचवता येणे आणि त्यातून बाहेर पडून पुन्हा प्रयत्न करणे तसेच यशाने हुरळून न जाणे संतुलित मानसिकता दर्शवते. साध्या अपयशानेदेखील खचून जाणे, प्रत्येक अपयश हे व्यक्तिगत मानणे किंवा यश मिळाल्यावर वाहवत जाणे हे मानसिकदृष्ट्या अप्रगल्भतेचे लक्षण आहे. पौगंडावस्थेतील मुलांमध्ये हे लक्षण खूप जास्त दिसून येते. परीक्षेतले किंवा प्रेमातले अपयश, एवढेच नव्हे तर साध्या मागण्यांनाही आलेले नकार पचवता न येणारी अनेक मुले अपयशाच्या गर्तेत जातात. अशा मुलांमध्ये डिप्रेशनासारखे आजार खूप जास्त आढळून येतात. ही मुले यशाचे दरवाजे बंद करून घेतात.

नात्यांचे नियोजन
कुटुंब आणि मित्रमंडळींसोबत निरोगी नातेसंबंध टिकवता येणे हे संतुलित मानसिकता दर्शवते. नात्यांची गरज ओळखता येणे, प्रत्येक नात्याला त्याच्या गरजेप्रमाणे योग्य प्रतिसाद देता येणे, नात्यातले छोटे-छोटे गुंते सोडवण्याची क्षमता ठेवणे आपल्या मानसिक आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. आपल्या माणसांशी सतत कुरबुरी, हेवेदावे, इगो, इतरांशी पटवून न घेता येणे, सतत इतरांकडून अवास्तव अपेक्षा ठेवणे, माफ करण्याची किंवा सोडून देण्यात असमर्थता आपल्या मानसिक आरोग्यासाठी घातक आहे. तुटलेल्या कुटुंबामधून आलेल्या मुलांना पुढे जाऊन नाती जोडणे कठीण जाऊ शकते. अति सुरक्षित वातावरणात वाढलेल्या मुलांनादेखील नाती जोडताना काही समस्या येऊ शकतात.

समाजात मिसळून राहणाऱ्या आणि स्वतःचे मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकांशी चांगले संबंध असणे आपल्या मानसिक आरोग्यासाठी हितकारक असते. माणूस हा समाजप्रीय प्राणी आहे आणि आपले मानसिक संतुलन चांगले राहण्यासाठी आपल्याला माणसांची गरज असते.

सतत एकटे राहणाऱ्या, माणसांपेक्षा यंत्रांमध्ये रमणाऱ्या, आपल्या कुटुंबीयांबरोबर वेळ न घालवणाऱ्या व्यक्तींनाही मानसिक आजार जडण्याची शक्यता असते. सतत काम करणे, कधीही सुट्टी न घेणे, पूर्ण वेळ घरात राहणे, कला, पर्यटन, क्रीडा, वाचन किंवा इतर छंदांची आवड नसणे मानसिक आजारांना आमंत्रण देऊ शकते.

आपल्या आजूबाजूला असलेल्या व्यक्तींमध्ये ही लक्षणे आढळून येत असतील तर त्यांच्यावर लक्ष ठेवले पाहिजे. गरज असेल तर अशा व्यक्तींसाठी मानसोपचारतज्ज्ञ, समुपदेशक किंवा अगदी मनोविकारतज्ज्ञाचीसुद्धा मदत घ्यायला हवी.
योग्य वेळी मदत मिळाली तर यांपैकी अनेकजण आनंदी आणि निरोगी मानसिक आयुष्य जगू शकतात.
तणाव हाताळण्याचे तंत्र

 • दीर्घ श्वास घेण्याच्या व्यायामाचा सराव.
 • शारीरिक व्यायाम.
 • आपल्या कार्यांना प्राधान्य द्या आणि ते नीट करा.
 • विश्रांती तंत्रांचा सराव करा
 • मित्र किंवा कुटुंबातील व्यक्तींशी तुमचे मन मोकळे करा.
 • तणाव वाढवणाऱ्या गोष्टींपासून दूर रहा. उदा. अल्कोहोल, कॉफी यांसारख्या पदार्थांचे मर्यादित सेवन करा.
 • पुरेशी झोप घ्या.
 • तणाव जास्त असेल तर व्यावसायिक तज्ज्ञांकडून समुपदेशन किंवा थेरपी घ्या.
  तुमच्या तणावाची मूळ कारणे ओळखणे आणि तुमच्यासाठी सर्वोत्कृष्ट काम करणारे निरोगी उपाय शोधणे आवश्यक आहे.
  मानवी संबंध विकसित करण्यामध्ये इतरांशी सकारात्मक संबंध निर्माण करणे आणि राखणे याचा समावेश आहे. लोकांशी तुमचे संबंध सुधारण्यात मदत करण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवा ः
 • इतर व्यक्ती बोलत असताना त्याकडे पूर्ण लक्ष द्या. आवड दाखवा आणि योग्य प्रतिसाद द्या.
 • इतरांचा दृष्टिकोन आणि भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा, सहानुभूती आणि समर्थन दर्शवा.
 • स्वतःला स्पष्टपणे आणि आदरपूर्वक व्यक्त करा. इतरांशी खुल्या आणि प्रामाणिक संवादाला प्रोत्साहन द्या.
 • इतरांसोबत आदर आणि दयाळूपणाने वागा. त्यांच्या मतांचा आणि सीमांचा आदर करा.
 • तुमच्या कृती आणि वचनांमध्ये सातत्य ठेवा.
 • तंटे, विवाद यांना रचनात्मकपणे सामोरे जा. समस्या वाढवण्याऐवजी त्यातून मार्ग कसा निघेल हे शोधा.
 • इतरांच्या प्रयत्नांबद्दल आणि योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करा.
 • भिन्न व्यक्तिमत्त्वे आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याची इच्छा बाळगा.
 • आपल्या स्वतःच्या आणि इतरांच्या सीमांचा आदर करा.
 • विविध परिस्थितीमध्ये आत्मविश्वासाने संवाद साधण्यासाठी चांगली सामाजिक कौशल्ये विकसित करा.