चिंताजनक

0
6

आजवर दरोडे, अपघात आणि गुन्हेगारी टोळ्यांतील संघर्षाच्या वार्तांनी हादरलेला गोमंतकीय आता खून आणि दुहेरी हत्यांच्या बातम्यांनी आणखी धास्तावला आहे. मोरजी येथे स्थानिक जमीनमालकाचा निर्घृण मारहाणीमुळे झालेला मृत्यू आणि त्यापाठोपाठ साळगाव येथे झालेला दुहेरी खून ह्या दोन्ही घटना गोव्याच्या शांततामय प्रतिमेला मोठा तडा देणाऱ्या आहेत. गेल्या काही महिन्यांतील वर्तमानपत्रांची पहिली पाने तपासली तर सातत्याने गुन्हेगारी डोके वर काढत असल्याचे दिसते. शांत, सुशेगाद गोवा ही गोव्याची ओळख केव्हाच पुसली गेली आहे आणि त्याजागी हाणामाऱ्या, खंडणीखोरी, गुन्हेगारी टोळीयुद्धे, दरोडे आणि हत्या अशा घटनांनी गोव्याचे एकेकाळचे शांत, सौहार्दपूर्ण समाजजीवन ढवळून निघाले आहे. विशेष म्हणजे ह्या गुन्हेगारीमध्ये परप्रांतीयांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर दिसतो आहे आणि ती विशेष चिंतेची बाब आहे. अनिर्बंध पर्यटन आणि परप्रांतीय कामगारांची सतत चाललेली आवक ह्यातून गोव्याची सांस्कृतिक ओळख तर पुसली गेली आहेच, परंतु गोवेकरच येथे उपरा ठरेल की काय अशी भीती निर्माण झाली आहे. मोरजी येथे नुकतीच झालेली स्थानिक जमीन मालकाची हत्या काय दर्शवते? आपल्याच जमिनीमध्ये कोणीतरी जेसीबीद्वारे डोंगर कापतो आहे म्हणून जाब विचारायला गेलेल्या ह्या वृद्ध गृहस्थांना कंत्राटदाराचे कामगार जीव जाईस्तोवर मारहाण करतात? त्यांची हिंमतच कशी होते? ह्या गुंडगिरीला पाठराखण कोणाची आहे? साळगावातील दुहेरी हत्या प्रकरणातही परप्रांतीय संशयित रेल्वेने पळून गेल्याचे प्रथमदर्शनी दिसते. दोनापावला आणि म्हापशातील दरोड्यांतील गुन्हेगार तर थेट बांगलादेशात पळून गेले हेोते. कोणीही यावे, लुटावे, खून पाडावेत आणि बिनबोभाट निघून जावे अशी ही गोव्याची धर्मशाळेगत स्थिती बनली असेल तर कायदा आणि सुव्यवस्था राखणे ही ज्यांची जबाबदारी ते पोलीस दल कुठे झोपा काढते असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जाणारच. गोव्याच्या अस्मितेवर, संस्कृतीवर सरेआम घाला घातला जात असताना त्याविरुद्ध आवाज उठवणाऱ्या रामा काणकोणकर यांच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यावर दिवसाढवळ्या प्राणघातक हल्ला झाला. त्याच्यावर मारेकरी घालणारा सूत्रधार अजूनही संभावितपणे वावरतो आहे. रामा काणकोणकर यांची हत्या काय किंवा मोरजीतील ताजे खून प्रकरण काय, स्थानिकांच्या हिताला निर्माण झालेले आव्हानच दर्शवते आहे. राज्यात गेल्या काही वर्षांत दिल्लीवाल्यांचा सुळसुळाट वाढला आहे. जमिनीमागून जमिनी खरेदी केल्या जात आहेत, सदनिका घेतल्या जात आहेत. गोव्यातील जमिनींचे आणि सदनिकांचे दर एवढे अस्मानाला भिडले आहेत की स्थानिकांच्या आवाक्यात राहिलेले नाहीत. गावेच्या गावे विकली जात आहेत. नुकतीच दक्षिण गोव्यातील एका मतदारसंघात उमेदवारी कन्नडिगांस दिली जावी अशी मागणी परप्रांतांतून स्थायिक झालेल्यांच्या एका मोठ्या गटाने पुढे केली. आज कित्येक ग्रामपंचायती आणि पालिकांच्या प्रभागांमधून मूळ परप्रांतीय मंडळी एकगठ्ठा मतांच्या बळावर सहज निवडून येत आहेत. गोंय, गोंयकार आणि गोंयकारपणाच्या नुसत्या बाता मारणाऱ्या राजकारण्यांचाच ह्या सगळ्याला वरदहस्त दिसतो. केवळ एकगठ्ठा मतांच्या सोयीसाठी हे अड्डे निर्माण केले जात आहेत. राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये मोठे निर्णय घेतले जाण्याची आज आवश्यकता आहे. राज्यात संघटित गुन्हेगारी वाढली आहे. टोळ्या आपसात भिडू लागल्या आहेत, सुपाऱ्या घेऊ लागल्या आहेत. गुंडांच्या तडिपारीची मागणी जनतेकडून मोठ्या प्रमाणात झाल्याने अखेरीस राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू करण्यात आला. आता किती गुंडांना हा कायदा लावला जातो आणि त्यांची तडिपारी होते हे पाहायचे आहे. गोव्यात डोके वर काढू लागलेली संघटित गुन्हेगारी समूळ नष्ट करण्याची ही शेवटची संधी आहे. अन्यथा येणाऱ्या काळात ही कीड वाढत आणि गोव्याला पोखरत जाईल. मोपा विमानतळासंदर्भात समाजमाध्यमावर अफवा पसरवली, निवडणुकीच्या कामासाठी गैरहजर राहिला असल्या क्षुल्लक कारणांसाठी अभियंत्यावर थेट अटकेची कारवाई करणारे पोलीस गुंडपुंडांच्या अटकेस का धजावत नाहीत? राज्याची कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्यासाठी तातडीने काही गोष्टी करणे आवश्यक आहे. पहिली बाब म्हणजे पोलीस गस्त वाढवावी. रात्री अपरात्री गुंडपुंड आणि गुन्हेगार मोकळेपणाने फिरत आहेत त्यांना धाक बसवावा. पर्यटक आणि स्थलांतरित यांच्यावर निर्बंध असावेत. गोवा हे गुन्हेगारी करून पळून जाण्याचे सोईस्कर ठिकाण असा जो समज झाला आहे तो खोटा पाडावा. गुप्तचर विभागाला गुन्हेगारांमागे लावावे, गोव्याची शांत, सुरक्षित ही ओळख पुसली जात आहे, ती पुनर्प्रस्थापित करावी. तो विश्वास जनतेला द्यावा.