राजकीय निरीक्षकांना धक्का
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला कालपासून प्रारंभ झाल्यानंतर सरकारच्या विविध निर्णयांना जोरदार विरोध करण्याची सुवर्णसंधी असताना प्रमुख विरोधी कॉंग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी संसदेत गैरहजर राहणे टाळल्याने राजकीय निरीक्षकांसाठी तो एक आश्चर्याचा धक्का ठरला आहे. विशेष म्हणजे सत्तेवर येऊन नऊ महिने पूर्ण केलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने जारी केलेला भूसंपादन अध्यादेश व अन्य निर्णयांमुळे मोदी प्रचंड दबावाखाली आहेत. विरोधकांसाठी अशी अनुकूल स्थिती असताना राहुल गांधी रजेवर गेल्याचे चित्र पहायला मिळाल्याने कॉंग्रेस नेत्यांनाही धक्का बसला असल्याचे सांगण्यात आले. सध्याच्या अनुकूल स्थितीमुळे विरोधक मोदी सरकारचे संसदेत वाभाडे काढील अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात कॉंग्रेसच्या उपाध्यक्षांच्या अनुपस्थितीमुळे मोदी यांना ही बाब शुभवार्ता ठरली असल्याची चर्चा राजकीय निरीक्षकांत सुरू आहे.
ऐन मोक्याच्यावेळी राहुल गांधींनी घेतलेला रजेचा निर्णय म्हणजे सवंगपणा असल्याच्या प्रतिक्रियाही व्यक्त होत आहेत. राहुल गांधी यांनी कॉंग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे रजेचा अर्ज दिल्याचे सांगण्यात येते.
दरम्यान, लागोपाठच्या निवडणुकांमध्ये पक्षाला आलेल्या अपयशामुळे चिंतन करण्यासाठी राहुल गांधी यांनी रजा घेतल्याची माहिती स्वत: सोनिया गांधी यांनी दिली आहे.

