चावी

0
30
  • – प्रा. संदेश राघोबा नाईक-गावकर

माणसाने केवढीही मिजास केली तरी या जगती माणूस शेवटी पराधीनच आहे. सायन्सच्या बळावर नियतीला जिंकता येणार नाही. माणसाला रोखण्याची चावी निसर्गाकडे आहे. माणूस हा चार दिवसांचा तर निसर्ग हा नेहमीचाच शाश्‍वत आहे.

अचूक चावी लावली की कुलूप उघडते. इवलेसे कुलूप संपूर्ण घराचे रक्षण करते. कुलूप मोडून अथवा दरवाजा फोडून जेव्हा दरोडा घातला जातो, तेव्हा चावी व कुलूप दोन्हीही निरुपयोगी ठरतात.
खूपदा वेगवेगळ्या समस्यांनी आपण चक्रावून गेलेलो असतो. कोणत्या समस्येला कोणती चावी लावावी हे आपल्या लक्षात येत नाही. विचार करताना कोणत्या समस्येला कोणता क्रम द्यावा, अग्रक्रम कोणाचा हेही आपल्याला समजत नाही. मनातील गोंधळ मनातच ठेवून सगळी कामं आपण करत असतो. लक्ष एकीकडे व काम दुसरीकडे असेदेखील अधूनमधून घडतच असते.

आपल्या व्यथा मनमोकळेपणी दुसर्‍याला सांगताही येत नाहीत. दुसरे हसतील व आपली टिंगल-टवाळी करतील ही एक भीती असते. कित्येकदा आपण एका अर्थाने व एका उद्देशाने सांगत असतो; पण ऐकणारे त्याचा दुसराच अर्थ लावतात व अर्थाचा अनर्थ घडतो. आपण न बोललेलेच बरे होते. प्रामाणिकपणे बोलायला गेलो आणि भलत्याच संकटात सापडलो असेदेखील कित्येकदा घडते.

आपल्या मनातील आशय समजून घेणारी प्रगल्भ विचारांची माणसे आज अपवादानेच भेटतात. खोल व उदात्त विचारांची माणसे संपून उथळ व ठिसूळ विचारांच्या माणसांचा आजच्या समाजात सुळसुळाट फारच माजलेला दिसून येतो. कोणाला तरी चांगले सांगायला गेल्यास ऐकणारी माणसे त्यातील आशय समजून घेत नाहीत, तर सांगणार्‍याकडे चमत्कारिक चर्येने पाहतात, तेव्हा सांगणाराच अगोदर भांबावून जातो व सांगणेच अर्धवट सोडावे लागते. अशी आपल्या समाजाची जडण-घडण का बरे झाली आहे? प्रत्येकाच्या विचाराला चुकीची चावी लावल्यावर त्यातून चुकीचाच निष्कर्ष निघत असतो.

आजच्या मुलांच्या वागण्याला कोणती चावी लावावी हे पालकांना कळणे कित्येकदा कठीण जाते. खोटे बोलणे हे अगदी सहज वेड झालेले दिसून येते. कॉलेजमध्ये जातो म्हणून सांगून दुसर्‍याच भानगडीत वेळ घालवणारी तरुण मुले आज दिसून येतात. कॉलेजमध्ये वर्गात शिकवलेले न ऐकता दंगा करणार्‍या पोरा-पोरींची गर्दी आज वाढताना दिसते.

वागण्यातील विनम्रता हा अलंकार आपल्या संस्कृतीत शतकानुशतके आपण मिरवत होतो, पण आजच्या समाजात उर्मटपणाला बहर आलेला दिसून येतो. शिक्षेचा दंडक कधीच हद्दपार करण्यात आला आहे. विद्यार्थी शिक्षकाला उर्मटपणे प्रत्युत्तरे देतात. लहान मुले घरातील जाणत्याशी बोलताना उर्मटपणाची मर्यादा ओलांडतात. सभ्यपणाची व सौजन्यशीलतेची आपली परंपरा भंग होऊन असभ्यपणाची नवी तर्‍हा मूळ धरत आहे. कोठेतरी आपण चुकतो ही खंत मनाला अस्वस्थ करत आहे.

कोरोना विषाणूने हजारो माणसे पटपट मेली. या जागतिक रोगापासून वाचण्यासाठी सगळी माणसे व सगळी राष्ट्रे आटोकाट प्रयत्न करू लागली. एकमेकांशी संपर्क टाळण्याची खबरदारी घेत राहिली. गर्दीचे सगळे मेळावे रद्द केले. ‘लॉकडाऊन’चे हत्यार सगळ्या आस्थापनांना लावले. सगळे मार्केट बंद, रहदारीची सगळी साधने बंद. भाज्या, फळे, मांस, मासे, दूध यांची आयात-निर्यात बंद. हे सगळे सांगणे सोपे आहे, पण घरातील आबालवृद्धांनी दिवस कसे काढावेत ही तर फारच मोठी अडचण होऊन बसली.

भेळ-पुरीचे, ऑमलेट-भज्यांचे हातगाडे चालवणार्‍यांचे पोट दिवसाच्या कमाईवर चालत असते. त्यांनी बहुतेक दिवस उपाशीच काढले. ज्यांचे बँकेत पैसे होते त्यांचे ठीक. दिवसाच्या मिळकतीवर पोट भरणार्‍यांची करुण अवस्था कोणी बरे पाहिली? तोंडाने शब्दांचे बुडबुडे सगळ्यांनीच काढले पण पैशांचा आधार देऊन कोलमडलेल्या कुटुंबांना कोणी बरे सावरले?
थॉमस रोबर्ट माल्थस या अर्थशास्त्रज्ञाची येथे प्रकर्षाने आठवण होते. त्याने सांगितले की लोकसंख्या झपाट्याने वाढते पण खाण्याच्या वस्तू सावकाश वाढत असतात. जेव्हा लोकसंख्या निसर्गिक नियंत्रणापलीकडे जाते तेव्हा निसर्गाकडूनच आपत्ती येते व पटापट माणसे मरतात आणि लोकसंख्येची नियंत्रण-रेषा आपोआप नियतीकडून साधली जाते.

आज माणसाने आपल्या सामंजस्याने आणि हुशारीने युद्धे रोखली. युद्धांमध्ये होणारा लाखो माणसांचा संहार रोखला; पण दुसर्‍याच मार्गाने माणसे मरायला लागली. माणसाला ज्याचे औषध लवकर मिळाले नाही त्या विष्णाणूने अथवा व्हायरसने असंख्य माणसांचा बळी घेतला.

पहिल्या विश्‍वयुद्धाने अथवा दुसर्‍या विश्‍वयुद्धाने माणसे मेली नाहीत त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त माणसांचा बळी अवघ्या काही दिवसांतच गेला. आज दूरदर्शनने आणि इंटरनेटने जग अगदीच जवळ आले आहे. जगाच्या कोणत्याही कोपर्‍याला घडलेली घटना काही क्षणातच सगळ्यांपर्यंत पोचत आहे. मोबाईल व टीव्हीवर सगळ्या घटना सचित्र दिसत आहेत. टी. आर. माल्थस यांचा भविष्यवेध किती अचूक होता हे आज कळत आहे. सगळ्या जगाच्या वर्तनाची चावी त्यांना सापडली होती असेच म्हणावे लागेल.

काही प्रश्‍न आपल्या हातात असतात व काही प्रश्‍न आपल्या हातात असतच नाहीत. माणसाने केवढीही मिजास केली तरी या जगती माणूस शेवटी पराधीनच आहे हे सत्य मान्य करायलाच हवे. विज्ञानालादेखील मर्यादा आहे. सायन्सच्या बळावर नियतीला जिंकता येणार नाही. माणसाला रोखण्याची चावी निसर्गाकडे आहे. माणूस हा चार दिवसांचा तर निसर्ग हा नेहमीचाच शाश्‍वत आहे.
कळसुत्री बाहुलीला जसे नाचवले जाते तशी चावी देऊन आजच्या माणसाला निसर्ग नाचवतो असेच म्हणावे लागेल. माणूस व निसर्ग या दोहोंमध्ये सर्वश्रेष्ठ कोण, या प्रश्‍नाचे उत्तर निसर्गच सर्वश्रेष्ठ असे द्यावे लागेल.