>> मुख्यमंत्री; मिरामार येथे जागतिक रेबीज दिन
राज्य सरकार मनुष्यावर हल्ला करणारे विविध जातीचे कुत्रे घरात पाळण्यावर बंदी घालण्यावर विचार करीत आहे. नागरिकांनी घरी पाळण्यासाठी परराज्यातून कुत्रे आणण्यापूर्वी कुत्र्यांचे लसीकरण करावे. गोवा राज्य रेबिजमुक्त असून आता भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून कुत्र्यांच्या निर्बीजीकरणावर भर दिला जात आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जागतिक रेबीज दिनानिमित्त रेबीजमुक्त गोवा स्टॅटिक पॉइंट लसीकरण मोहिमेचा शुभारंभ केल्यानंतर मिरामार येथे काल केले.
राज्यात भटक्या कुत्र्यांमुळे दरदिवशी साधारण एक-दोन अपघाताची नोंद होते. ताळगाव येथे पाळण्यात आलेल्या एका कुत्र्याने रस्त्यावरून जाणाऱ्या मुलांवर हल्ला करण्याची घटना घडली आहे. अशा घटना घडू नयेत म्हणून कुत्रा पाळणाऱ्यांनी योग्य खबरदारी घ्यावी. रेबीजमुक्त गोवा मोहीम यशस्वी करण्यासाठी लोकांना आपल्या कुत्र्याचे लसीकरण करा. बाहेरील राज्यांतून कुत्र्यांना आणताना नियमित लसीकरण करून खबरदारी घ्या असे आवाहन केले.
मिशन रेबीज इंडियाचे संचालक मुरुगन अप्पुपिल्लई यांनी मिशन रेबीजचे महत्त्व विशद केले. प्रकल्प संचालक मिशन रेबीज ज्युली कार्फमॅट यांनी मार्गदर्शन केले. यावेळी महापौर रोहित मोन्सेरात, पशुवैद्यकीय सेवा संचालनालयाचे सचिव गिल, संचालक डॉ. आगोस्तिन्हो मिस्किता, सोनाली चौधरी, संजीव नाईक, श्वेता सरदेसाई उपस्थित होत्या.