– वासुदेव नरहरी कारंजकर
दिनांक १५ जून २०१३. आमचा बद्रीनाथहून परतीचा प्रवास सुरू झाला. पुढे येणार्या संकटांची पूर्वसूचना देणारी चिन्हे दिसू लागली होती. आमच्या प्रवासाचे वेळापत्रक बिघडायला सुरुवात झाली होती. याचे कारण म्हणजे एकसारखा पडणारा झिमझिम पाऊस. काल बद्रीनाथला होतो तेव्हा तिथे खूपच थंडी होती. सगळीकडे चिखल होता. तिथेही सारखा पाऊस होता. त्यामुळे बसमधले अर्ध्याहून अधिक लोक खोकत होते. थंडी-पावसामुळे सगळ्यांना सर्दी-पडशाचा त्रास होत होताच, पण पोटेही बिघडली होती. लोमोटिन, क्रोसिन या गोळ्यांची बसमधील प्रवाशांत देवघेव सुरू होती.
आतापर्यंत आम्ही दोन लॅण्ड-स्लाईड अनुभवले होते. दोन्ही ठिकाणी चार ते पाच तास अडकलो होतो. लॅन्ड-स्लाईडच्या दोन्ही बाजूंस कित्येक किलोमीटर लांब गाड्यांची रांग लागायची. पण लवकरच सायरन वाजवत पोलिसांची जीप यायची. ते शिट्या वाजवून बघ्यांना पाठी हाकलायचे आणि मग जवळच्या जेसीबीला निरोप जायचा. जेसीबी उपलब्ध असला तरी त्याला लॅन्ड-स्लाईडपर्यंत यायला प्रत्येकवेळी दोन-अडीच तास लागत होते.
अरुंद रस्त्यावर थांबलेल्या वाहनांना ओव्हरटेक करत तिथे पोहोचणार्या जेसीबीला पाहताच सगळ्यांचे मन हलके व्हायचे. बायका टाळ्या वाजवायच्या. जेसीबी लॅन्ड-स्लाईडच्या ठिकाणी जाऊन रस्त्यावर पसरलेले दगड आणि माती दरीत ढकलायचे. लांबवर गाड्यांच्या रांगांमधून खोळंबलेले, आंबलेले लोक दुतर्ङ्गा उभे राहून जेसीबीचे कौशल्य आणि दरीत पडणारे दगड पाहायचे. अतिउत्साही लोकांना मागे हटवताना शिट्या वाजवून-वाजवून पोलिसांची दमछाक व्हायची. रस्ता मोकळा झाला की गाड्यांची रांग हळूहळू पुढे सरकायची. एका वेळेस एका बाजूची काही वाहने आणि नंतर दुसर्या बाजूची. एखादा ट्रक किंवा बस असली तर ती जागोजागी अडायची. कारण रस्ता अरुंद होता. सतत एकीकडे खोल दरी तर दुसर्या बाजूस दगड किंवा उभा कडा.
आधीच दोन-तीन दिवसांचा प्रवास अशा या लॅन्ड-स्लाईडमुळे लांबलेला होता. त्यामुळे दरवेळी रात्रीच्या मुक्कामासाठी लॉजवर पोहोचायला उशीर होत होता. आम्हाला वाटेत जोशीमठ येथे श्री शंकराचार्यांच्या मठात दर्शन घेऊन संध्याकाळी पिपलकोट येथे हॉटेलमध्ये मुक्कामास जायचे होते.
सुरुवातीच्या प्रवासात असे काही होत नव्हते. पाऊस नव्हता. गाड्यांची रांग नव्हती. तेव्हा हाच प्रवास ङ्गार मनोहर होता. सगळीकडे उंचउंच डोंगर. त्यांच्यामागे काही ठिकाणी बर्ङ्गाच्छादित शिखरे. यांना डोंगर म्हणण्यापेक्षा पर्वत म्हणणे त्यांच्या महाकाय आकाराने योग्य ठरेल. त्यांच्यावर वळणावळणाचा रस्ता. एका पर्वतावरून उतरले की लगेचच पुढच्या पर्वतावर चढायचे. मध्ये सपाट अशी थोडीही जमीन नाही. प्रत्येक दोन डोंगरांमध्ये वेगाने वाहणारी नदी ठरलेली! त्यांच्यावर ‘मिलिट्री’ किंवा ‘बॉर्डर रोड’वाल्यांनी बांधलेला लोखंडी पूल. एक डोंगर चढून वर गेलो की पुढे दुसरा डोंगर तयार! प्रत्येक डोंगर आपल्याकडील आनमोड घाटाच्या डोंगरापेक्षा चार-पाच पट मोठा. एकीकडे खोल दरी तर दुसर्या बाजूस अगदी जवळून घासून जाणारे कडे. हे कडे आपल्या इथल्यासारखे एकसंध काळ्या लाव्हारसाच्या दगडाचे नव्हेत, तर पिवळ्या रंगाच्या ठिसूळ दगडांचे. बर्याच ठिकाणी यात पिवळ्या रंगाच्या मातीत असंख्य वेगवेगळ्या आकाराचे दगड-गोटे असलेले दिसत होते.
डोंगरांच्या उतारावर काही ठिकाणी झुडपे तर काही ठिकाणी पाइन वृक्षांचे विरळ जंगल दिसते. डोंगरात जागोजागी लहानमोठे ओढे, धबधबे. पहिले पाच-सहा दिवस असा निसर्गरम्य, ङ्गक्त दिवसाचा प्रवास आम्ही अनुभवला होता. ऋषिकेशहून बद्कोटमार्गे यमुनोत्री, मग उत्तरकाशीमार्गे गंगोत्री, त्यानंतर रुद्रप्रयाग- गौरीकुंड-मार्गे केदारनाथचा खडतर प्रवास आणि तिथून परत येताना आमच्या प्रवासातील संकटे सुरू झाली होती. त्यांच्यावर मात करीत, जागोजागी संध्याकाळऐवजी रात्री बारा-एक वाजता पोहोचूनही आम्ही सकाळी लवकर म्हणजे चार-पाच वाजताच प्रवास सुरू करत होतो. कारण टूर कंपनीचे वेळापत्रक, लॉज सोडायची ठरलेली वेळ सांभाळणे भागच होते. अपुरी झोप बसच्या प्रवासादरम्यान पुरी करता येणे शक्य होते. पण आम्ही आराम मिळण्यासाठी म्हणून जर कुठे जास्त वेळ थांबलो असतो तर आमचे तीन महिन्यांपूर्वी केलेले दिल्लीहून परतीचे राजधानीचे बुकिंग वाया गेले असते. पुढच्या तिकिटासाठी दिल्लीतच अडकून राहावे लागले असते. केदारनाथहून मुक्कामाच्या ठिकाणी रामपूर नावाच्या गावी परतल्यावर दुसर्या दिवशी त्रिगुणी नारायण करून आम्ही पिपलकोटीमार्गे बद्रीनाथ करून परत पिपलकोटीला चाललो होतो.
महाभयंकर संकट आमच्या पाठोपाठच विद्ध्वंस करीत होते. पण आम्हाला त्याची काहीच बातमी नव्हती. आम्ही अगदी निसटते पुढे पुढे जात होतो. सतत बसमध्ये असल्याने आमच्या मागे केदारनाथला काय झाले त्याची आम्हाला कल्पनाही नव्हती. त्याच-प्रमाणे बद्रीनाथ सोडल्यावर तिथेही भयंकर आपदा आली याची कल्पना आम्हापैकी कोणालाही नव्हती.
पाऊस एकसारखा पडत होता आणि प्रवासात पुन्हा पुन्हा अडथळे येत होते. जणू सलग अशी अनंत किलोमीटर लांब वाहनांची रांग झाली होती. बस आठ-दहा फूट पुढे जायची, पुन्हा दहा-वीस मिनिटे थांबायची, असा अखंड प्रवास सुरू होता. अंधार पडला. अंधार पडल्यावर बाहेरचा निसर्गही दिसेनासा झाला. न संपणार्या अंधार्या गुहेतला ठेचकाळत ठेचकाळत प्रवास सुरू झाला. अजून १२० किलोमीटर, अजून ८५ किलोमीटर असे हताश उद्गार काढीत आम्ही बसमध्ये खोकत होतो. चहा, जेवणाची वेळ आणि जागा यांचे गणित चुकले होते. त्याशिवाय आता सर्वांना दिल्लीहून सुटणार्या रेल्वेची/विमानाची काळजी होती. कारण काहीजणांचे विमानाचे बुकिंग होते तर बाकीच्यांचे रेल्वेचे. आम्ही सर्व ठाण्याच्या एका टूर कंपनीतर्फे या यात्रेला आलो होतो. बहुतेकजण ४ जूनला मुंबई सेन्ट्रलहून निघाले होते. आम्ही उभयता आणि आमचे शेजारचे पती-पत्नी असे आम्ही चौघे ङ्गोंडा (गोवा) येथून आलो होतो. आमच्या बसचा ड्रायव्हर तिथला स्थानिक होता. त्याला आमच्या परतीच्या बुकिंगची कल्पना होती. तसेच इतक्या भयानक परिस्थितीतही तो पूर्णपणे संयम बाळगून होता. तिथल्या प्रवासातील अडचणींची त्याला माहिती होती. प्रवासाचा तो दिवस आम्ही चहाशिवाय, जेवणाशिवाय काढला. काहीजणांकडे बिस्किटे वगैरे होती, त्यावर गुजराण केली.
शेवटी सकाळऐवजी संध्याकाळी सात वाजता जोशीमठ आले. निम्म्या प्रवाशांनी रिमझिम पावसात, अंधारात, चिखलातून धावतपळत शंकराचार्यांचे दर्शन घेतले आणि पुढे प्रवास सुरू झाला. आता मुलांचे, नातलगांचे ङ्गोन येऊ लागले. ‘तुम्ही खुशाल आहात का?’ असे. नेहमीसारखे असतील अशी कल्पना करून आमचा पुढचा प्रवास सुरू झाला. पण लगेचच वाटेत पूर आलेल्या गंगेने आम्हाला श्रीनगर (उत्तराखंडमधील) येथे गाठलेच. याच गंगेचे मनोहारी दर्शन आम्ही सहा-सात दिवसांपूर्वी येताना ऋषिकेश येथे पहिले होते. घाटावर गंगेची आरती होत असताना आपल्या संथ प्रवाहात द्रोणातून हळुवार सोडलेल्या आणि प्रवाहाबरोबर डुलत जाणार्या शेकडो ज्योती पहिल्या होत्या. पुढे गंगोत्रीला प्रचंड वेगाने वाहणारे गंगेचे पाणी पहिले होते. एरवी पर्यटनाला गेल्यावर डोळ्यांत साठवून ठेवावे अशी दृश्ये आपण अनुभवतो, पण निसर्गाचा रुद्रावतार थरकाप उडवणारा. गंगेचा, अलकनंदेचा प्रवाह खाऊ की गिळू अशा भयानक राक्षसाचे रूप घेऊन अवतरलेला दिसत होता. आमची बस प्रवाहाच्या कडेकडेने मार्ग आक्रमित होती. पाण्याकडे पाहायचीही भीती वाटत होती. मार्गात येईल ते सर्व स्वाहा करीत, त्याला गिळंकृत करीत चाललेला तो जलराक्षस. गुरे, ढोरे, घोडे, उन्मळून पडलेली झाडे, ओंडके सारे कस्पटासमान भासत होते. निसर्गापुढे आपण किती क्षुद्र आहोत याचा साक्षात्कार आम्हाला झाला.
आता न थांबता मिळेल त्या मार्गाने लवकरात लवकर दिल्ली गाठायची सूचना आमच्या टूरमॅनेजरला हेड ऑङ्गिसकडून मिळाली. आम्हा सर्वांच्या मोबाईलचे चार्जिंग संपत आले होते. टूरमॅनेजरने मोबाईलचे रेशनिंग केले. आता एकादोघांचे मोबाईल जिवंत होते ते ङ्गक्त इमर्जन्सीसाठी- हेड ऑङ्गिसशी बोलण्यापुरते वापरायचे असे ठरले. गाड्यांची रांग त्या अंधारात अगदी हळूहळू पुढे जात होती. रात्रीचे दहा वाजले होते. बाहेरचे काहीच दिसत नव्हते. पोलीस शिट्या वाजवत, गाड्यांच्या पत्र्यावर लाठ्या आपटत धावून आले. सुरुवातीस काही कळले नाही. पोलीस सगळ्या गाड्या मिळतील तिथे मागे हाकलायचा प्रयत्न करीत होते. पुढे एक-दीड किलोमीटरवर गंगेवर पूल होता. त्यावरून पाणी वाहत होते. आम्हाला ऋषिकेशला जाण्यासाठी या विलंबामुळे परतीची गाडी चुकू नये म्हणून ऋषिकेशला मुक्काम, तिथे त्रिवेणी घाटावर ङ्गेरङ्गटका, शॉपिंगसाठी भरपूर वेळ असा कार्यक्रम ‘बङ्गर’ म्हणून अनुभवी टूर कंपनीने आखला होता. पण हा ‘बङ्गर’ वेळ पण आता वाया जाणार होता. नाईलाज झाल्याने ‘आता आहे तसे झोपून जा, सकाळ झाल्यावर पाहू’ असे सांगून, सगळ्या लाईट ऑङ्ग करून दमलेला ड्रायव्हर त्याच्या सीटमागेच झोपी गेला. आमच्या पुढेही काहीच मार्ग नव्हता. बसमध्ये पाच-सहाजणांना ताप होता. बरेच जण खोकत होते. बाहेर अंधार होता. पाऊस पण होताच. एकच छत्री होती. ती घेऊन दोघजण उत्साही रस्त्याची किंवा पुराची ‘प्रत्यक्ष परिस्थिती’ पाहायला गेले. दीड-दोन तासांनी परत आल्यावर त्यांनी सांगितले की आमची बस रांगेत दहा पंधरा मिनिटे पुढे असती तर आम्ही सर्व वाहून गेलो असतो. पुलाच्या अलीकडेच पूर्ण बुडायला एक फूट कमी असलेला एक ट्रक त्यांनी पहिला होता. म्हणजे पोलिसांची दांडगाई योग्यच होती.
सकाळ झाल्यावर त्या अडकलेल्या रांगेतून बर्याच गाड्यांनी बाहेर पडून, दिशा बदलून माघार घेतली. आमच्या बसच्या चालकानेही मग बस बाहेर काढली आणि श्रीनगर गावाबाहेरच्या एका मिलिट्रीच्या शाळेपुढे आणली. ही शाळा बंद होती. तिथल्या कनवाळू शिपायाला सर्वांची दया आली. तेथे आम्हा सर्वांची प्रातर्विधीची सोय झाली. पुढे काही अंतरावर एक छोटे हॉटेल होते. तेथे सर्वांनी चहा-नाश्ता केला. एकसारखे गाडीत बसून अंग आंबून गेले होते. कधी एकदा गरम-गरम पाण्याने आंघोळ करतो असे झाले होते.
तिथे मी वर्तमानपत्र कुठे मिळेल याची चौकशी केली. पण लॅन्ड-स्लाईडने ट्रङ्गिक जाम असल्याने पेपर आला नाही असे कळले. तिथल्या लोकांना, त्या हॉटेलच्या मालकाला, कोणालाही केदारनाथ किंवा बद्रीनाथला झालेल्या हाहाकाराची कल्पना नव्हती तर आम्हाला कुठून असणार! आमच्या पुढे एकच चिंता होती, ती म्हणजे मुंबईला कधी व कसे पोहोचणार? काल रात्री आमच्या मागे रांगेत असलेल्या गाड्या आता बसच्या मागे उभ्या होत्या. होता होता शेकडो गाड्यांची रांग लागली. बहुतेक टाटा सुमो, क्वालीस, स्कर्पिओसारख्या गाड्या होत्या. मला वाटले त्यांचे पण चारधाम पूर्ण झाले असेल व ते परतीच्या प्रवासाला असतील. पण ते सगळेच जण लॅन्ड-स्लाईडमुळे परत ङ्गिरले होते. आमचे चारधाम पूर्ण होऊन आम्ही परत चाललोय याचे त्यांना आश्चर्य वाटत होते. ‘बहुत भाग्यवान हो आप, आपको नसीब हुवा’ असे ते म्हणत होते. दरम्यान, ड्रायव्हरने काही लोकांशी चर्चा केली. आता आम्हाला ऋषिकेश रद्द करून डायरेक्ट दिल्ली गाठायची होती. तरच आम्हाला रेल्वे/ विमान गाठता येणार होते. शेवटी ड्रायव्हरने ङ्गक्त दिवसा प्रवास करता येण्याजोगा, अतिशय अरुंद असलेला, डोंगी नावाच्या गावामार्गे देहरादूनला जायचा मार्ग धरायचे ठरविले आणि त्या दिशेने प्रवास सुरू झाला. अजून अडीचशे-तीनशे किलोमीटर अंतर कापायचे होते. अतिशय प्रचंड असे दोन डोंगर सुरुवातीस लागले. हा रस्ता सांगितल्या गेल्याप्रमाणे ङ्गारच बिकट होता. आमच्या सुदैवाने विरुद्ध दिशेने येणारी वाहने नव्हती. पण आमच्या रांगेतीलच काही बेशिस्त लहान गाडीवाले ओव्हरटेक करून पुढे जायची घाई करीत होते. चहा-नाश्त्याचा दिलासा मिळाल्याने आता आम्ही सर्व प्रवासी ड्रायव्हरच्या करामतीकडे पाहत होतो. प्रत्येक वळणावर, जेव्हा बसचा मागचा टायर खचलेल्या कडेपासून अवघ्या दोन-तीन इंचावरून जाई तेव्हा पोटात भीतीचा गोळा येई. आमच्या नशिबाने या रस्त्यावरही दोन ठिकाणी लॅन्ड-स्लाईडमुळे तीन-चार तास खोळंबून राहावे लागले. न थांबविता दिवसभर- रात्रभर गाडी प्रवास करीत होती. शेवटी सकाळी सहा वाजता नवी दिल्ली रेल्वेस्थानक आले.
आरक्षणाच्या क्यूमध्ये उभे राहून गोवा एक्सप्रेसची आम्ही चार तिकिटे वेटिंग लिस्टची मिळवली आणि रेल्वेच्या टॉयलेटच्या दाराजवळ बॅगवर बसून वीस-बावीस तास प्रवास केला. चुकलेल्या राजधानीचे तिकीट दाखवून आणि आम्ही चारधाम यात्रेहून आलो आहोत हे पाहून दयाळू टीसीने आम्हाला तिथे तरी बसायला परवानगी दिली.
या लांबच्या घाणेरड्या रेल्वेप्रवासाने आमचे उरलेले धैर्यही संपून गेले. पुण्याला आमचा मुलगा आम्हाला घ्यायला स्टेशनवर आला होता. आमचे सोबती तसेच पुढे मडगावपर्यंत जाणार होते. त्यांना कधी एकदा ङ्गोंड्याला घरी जातोय असे झाले होते. कारण ते दोघेही आजारी होते. सुदैवाने त्यांना पुण्याला रेल्वेत बर्थ कन्ङ्गर्म झाला.
पुण्याला मुलाकडे जेव्हा टीव्हीवर बातम्यात केदारनाथ, बद्रीनाथला झालेल्या उत्पाताची दृश्ये पाहिली तेव्हा धक्का बसला. इतका भीषण प्रलय झाला असेल याची कल्पनाच नव्हती. १२ जूनला आम्ही केदारनाथला होतो आणि १४ जूनला बद्रीनाथला. आमची टूर दोन दिवस उशिराची असती तर? किंवा आम्ही मध्येच प्रवास थांबविला असता तर? प्रत्येकी तीस-पस्तीस हजार रुपये खर्च करून आम्हाला चारही धाम दर्शन करता आले, पण इतर कित्येकांना ‘जीवच’ खर्ची घालून तेही शक्य झाले नाही.
अशी आपदा का? याचे उत्तर जाणकारांना माहीत असेल, पण मी जी परिस्थिती पहिली त्यावरून असे वाटते कीअशा ठिकाणी निसर्ग असा रुद्रावतार धारण करणारच. हजारो माणसांचे तिथे काय काम? उद्या माउंट एव्हरेस्टवर हजारो माणसे गेली आणि वादळ आले तर तिथे त्यातली नऊशे- साडेनऊशे मरणारच. तीन-चार वर्षांच्या लहान मुलांना घेऊन लोक पिकनिक, टूर म्हणून जातात, तर तिथले लोकही तकलादू लॉजेस अगदी नदीच्या पात्राजवळ बांधणार. गौरीकुंड गावाला रुंदी नाहीच. एकीकडे पर्वताची चढण तर दुसरीकडे नदीचे खोल पात्र. अशा ठिकाणी नदीला पूर आला तर पळायचे कुठे? केदारनाथ-बद्रीनाथ अतिशय दुर्गम. ङ्गक्त पायी जाण्यासाठीच असण्यायोग्य असायला हवे होते, जसे पांडव स्वर्गारोहणास पायी या मार्गाने गेले, जसे गिर्यारोहक पायी दुर्गम ठिकाणी जातात. असे झाले असते तर कदाचित शेकडो लोकांना जीव द्यावा लागला नसता.